नवी दिल्ली (Dr.Mohanji Bhagwat, ABVP) “जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज
आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी
परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे
प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले.
‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप)
प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल)
नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे
उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ.
मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले
की, “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’त काम
करणारे बहुतांशी विद्यार्थी आहेत. त्याचवेळी शिक्षक आणि प्राध्यापकही
येथे जोडले गेले आहेत. दिल्लीसारख्या ठिकाणी चांगले कार्यालय
उभारणे हे नक्कीच विशेष काम आहे. कार्यालयाचे नाव यशवंत ठेवले.
यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्याचे उद्घाटन झाले आहे.
यशवंतराव केळकर हे नेहमीच कार्यकर्त्यांना प्रेरणा देत असत. त्यामुळे हे कार्यालय म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावनेची वास्तू आहे.
त्यासोबतच जबाबदारीदेखील आहे.
जगातील
सर्वात मोठी विद्यार्थी संघटना ‘अभाविप’ ठरली आहे. मात्र, भारताची व्याप्ती
आणि भारताचे शिक्षण क्षेत्र पाहता, अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
देशातील विद्यार्थ्यांमध्ये भावनिक एकात्मता साध्य करण्याची मोठी जबाबदारी
‘अभाविप’वर आहे. ‘अभाविप’ने आपल्या कार्याद्वारे सामाजिक परिवर्तनास गती द्यावी,” असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
“अभाविप’
म्हणजे काय, हे जाणून घ्यायचे असेल, तर त्याच्या कार्यकर्त्यांकडे बघावे,” असे सरसंघचालकांनी
सांगितले. ते पुढे म्हणाले की, “संघटनेचे
गुणधर्म हे कार्यकर्त्यांमध्ये येतात. विद्यार्थी परिषद ही कार्यकर्त्यांनी
घडवली आहे. राष्ट्रपुनर्निर्माण रा. स्व.
संघ करत होता. मात्र, अनुचित
घटक विद्यार्थी जीवनात प्रभावी ठरू नयेत, यासाठी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे काम सुरू झाले.
अर्थात, परिषदेची जडणघडण ही कार्यकर्ते आणि त्यांच्या
अनुभवातून झाली आहे. कार्यकर्ता हा परिषदेचा प्राण आहे,”
असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार आणि कृष्णगोपाल, अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, सहप्रचारप्रमुख नरेंद्र ठाकूर, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि पीयुष गोयल, गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि सुनील बन्सल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, ‘अभाविप’चे अध्यक्ष राजशरण शाही, राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान यांच्यासह ‘अभाविप’चे आजी-माजी कार्यकर्ते उपस्थित होते.
जगाची
आशा भारतावर
“देशाच्या
भाग्यात परिवर्तन होत आहे, तसेच जगातही होत आहे. जग आता थकले असून अडखळत आहे. त्यामुळे जग आता भारताकडे
आशेने बघत आहे. भारताच्या तरुण पिढीच्या मनातही देशाला पुढे नेण्याचे
स्फुल्लिंग पेटले आहे. त्यासाठी नवा मार्ग देण्यासाठी काम करावे
लागेल. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून देऊन भारतीय विचार
पुढे न्यावा लागेल. त्यासाठी तरुण पिढीमध्येच अफाट क्षमता आहे.
त्या क्षमतेला दिशा देण्यासाठी एकात्मता सर्वात महत्त्वाची आहे;
कारण त्यातूनच ज्ञाननिर्मिती होते. एकात्मतेची
भावना विविधतेस एकाच धाग्यात बांधून ठेवते; त्यातूनच
‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही भावना प्रबळ होते.
राष्ट्राची भारतीय कल्पना आहे, ती परकीय संकल्पनेसारखी
नाही. आज आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा आज कालसुसंगत वापर करणे
आवश्यक आहे. हीच शिकवण ‘अभाविप’च्या ‘ज्ञान, शील, एकता’ या मूळ भावनेतून मिळते,” असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.