शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर सिंधुदुर्गातील हत्तीला पकडण्याचे वन विभागाचे निर्देश; हत्तीला नेणार याठिकाणी

    09-Apr-2025
Total Views | 333
sindhudurga elephant



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यू झाला (capture sindhudurg elephant). या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी हल्ला करणाऱ्या टस्कर हत्तीला पकडण्याचे आदेश जारी केले आहेत (capture sindhudurg elephant). गावकऱ्यांनी शेतकऱ्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने वन विभागाला हत्तीला पकडण्याचे आदेश द्यावे लागले आहेत. (capture sindhudurg elephant)


दोडामार्ग जिल्ह्यातील मोर्ले गावातील ६५ वर्षीय शेतकरी यशवंत गवस हे मंगळवारी काजू बागेत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी पायवाटेच्या वरच्या बाजूला ओमकार नावाचा निमवयस्क तस्कर हत्ती फणस खात होता. गवस हे हत्तीच्या नजेरस पडताच त्याने गवस यांचा पाठलाग केला. बांबू बेटामध्ये त्यांना पकडून फेकून दिले. पुढे सोंडेने हात मोडला आणि नंतर त्यांच्या शरीरावर पाय ठेवला. हत्तीच्या या जोरदार हल्ल्यामुळे गवस यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जोपर्यंत हत्ती पकड मोहिम राबविण्याची लेखी हमी देत नाही, तोपर्यंत गवस यांचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर वन विभागाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्यासोबत चर्चा करुन ओमकार नामक टस्कर हत्तीला पकडण्याची परवानगी घेतली आहे. ३० जूनपर्यंत या हत्तीला पकडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गवस यांच्या परिवाराला २५ लाख रुपयांची भरपाई वन विभागाकडून देण्यात येणार आहे. वन विभागाने मंगळवारी तात्काळ १० लाख रुपयांचा धनादेश गवस यांच्या कुटुंबियांना दिला असून उर्वरित १५ लाख काही दिवसात देण्यात येणार आहेत. ओमकार हा टस्कर हत्ती निमवयस्क आहे. त्याला बारक्या म्हणूनही ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वीच तो मुख्य कळपापासून वेगळा झाला असून चंदगड आणि दोडामार्ग अशा दोन्ही जिल्ह्यात त्याचा वावर आहे. निमवयस्क असल्याने त्याच्याकडून लोकांच्या मागे लागण्याचे प्रकार चंदगड तालुक्यातही घडले आहेत. २००९ आणि २०१५ साली सिंधुदुर्गात हत्ती पकड मोहिम राबविण्यात आली होती. २०१५ साली राबविण्यात आलेल्या हत्ती पकड मोहिमअंतर्गत तीन हत्तींना पकडण्यात आले होते. त्यामधील दोन हत्तींचा मृत्यू पाळीव करण्याच्या प्रशिक्षणादरम्यान झाला आणि भीम नामक नर हत्तीची रवानगी म्हैसूर येथे करण्यात आली. त्यानंतर या हत्तीला कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये हलविण्यात आले. सद्यपरिस्थितीत हा हत्ती जामनगर येथील वनतारा येथे आहे.

हत्तीला कसे पकडणार ?
वन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या हत्तीला पकडण्यासाठी कर्नाटकातील तज्ज्ञ टीमला सिंधुदुर्गात बोलविण्यात येईल. ही टीम प्रशिक्षित हत्तीच्या माध्यमातून ओमकार या टस्कर हत्तीला पकडेल. त्यानंतर या हत्तीला कर्नाटक राज्यातील हत्ती कॅम्पमध्ये हलविण्यात येईल. मात्र, ओमकारच्या वावराचा वेग पाहता, त्याला पकडताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा घाम निघणार एवढे मात्र नक्की.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121