( lata guthe ) साहित्यासह निरनिराळ्या प्रांतांमध्ये मुशाफिरी करणार्या, तसेच यशाला गवसणी घालणार्या लता गुठे यांची गोष्ट
विचारांचे संचित आणि आचरणाचे सामर्थ्य या दोन गोष्टी एकत्र आल्या की काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे लता गुठे यांचे आयुष्य. एकाच व्यक्तीने विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होणार्यांची उदाहरणेही आहेतच. परंतु, आपल्या अवतीभोवती काही अशी माणसे आहेत, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकच वेळी अनेक कार्यक्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. प्रकाशन व्यवसायामध्ये लता गुठे हे नाव आज सुपरिचित. परंतु, त्यांची ओळख केवळ प्रकाशक एवढीच नसून, त्यांच्या परिचयाला एक व्यापक पार्श्वभूमी आहे.
लता गुठे यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे झाला. बालपणापासून संस्कारांचे आणि अध्यात्माचे बाळकडू लता यांना मिळाले होते. बालपणापासूनच अक्षरओळख झाल्यानंतर, पुस्तकांच्या रंगीबेरंगी जगात त्या वाढत गेल्या. गावच्या शाळेतील वाचनालयात, पहिल्यांदा साहित्याचे संस्कार त्यांच्यावर झाले. आपल्या बालपणीच्या दिवसांबद्दल बोलताना लता म्हणतात की, “तेव्हा असलेल्या सांस्कृतिक वातावरणामुळे माझे जीवन समृद्ध झाले.” काही कौटुंबिक कारणास्तव लता या नववीत असताना, त्यांच्या विवाहाचा निर्णय त्यांच्या घरच्यांकडून घेण्यात आला. त्यावेळेस निराशेच्या गर्तेत अडकलेल्या लता यांना त्यांच्या आजींनी समजावले. आयुष्यामध्ये जे काही घडेल, त्याला धैर्याने सामोरे गेले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
आयुष्याच्या वळणावर आलेले हे नवीन आव्हानसुद्धा लता यांनी स्वीकारले.
लग्नानंतर त्या मुंबईला आल्या. नोेकरी करता करता, त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. आयुष्यातला रोजचा व्यवहार जगताना साहित्याची भूमी त्यांना खुणावत होती. अशातच निर्मितीच्या प्रेरणेमुळे त्या लिहित्या झाल्या. त्यांच्या लेखन कामाची त्यांना वेळोवेळी पावतीसुद्धा मिळत गेली. त्यांच्या ‘जीवनवेल’ या काव्यसंग्रहाला ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा ‘वसंत सावंत विशेष पुरस्कार’ प्राप्त झाला. 2016 साली नाशिकचा ‘कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय पुरस्कार’ त्यांना मिळाला. यानंतर ‘पुन्हा नव्याने’, ‘जगण्याच्या आरपार’, ‘हुंकार अस्वस्थ जाणिवांचे’ हे त्यांचे काही कवितासंग्रहसुद्धा प्रसिद्ध झाले. कथालेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिव्यक्तीची वेगळी छाप साहित्याविश्वात सोडली. त्यांच्या ‘शोध अस्तित्वाचा’ आणि ‘सोलमेट’ या पुस्तकांचे साहित्य वर्तुळात विशेष कौतुक झाले.
आपल्या लिखाणाच्या प्रवासात दुर्दैवाने लता यांना काही प्रकाशकांकडून व्यावहारिकदृष्ट्या वाईट अनुभवही आले. परंतु, यामुळे त्या खचून गेल्या नाहीत. पुस्तक प्रकाशनाच्या प्रक्रियेतील व्यवहारांचा त्यांनी अभ्यास केला व स्वतःचे प्रकाशनगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. अखेर ‘भरारी प्रकाशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘भरारी प्रकाशना’च्या माध्यमातून अनेक नवोदित तथा मान्यवर लेखकांचे लिखाण वाचकांसमोर ठेवण्यात आले. त्यांच्या प्रकाशन व्यवसायातील कामाची दखल घेत 2018 सालचा ‘द पिलर ऑफ हिंदुस्थान सोसायटी’चा ‘उत्कृष्ट महिला प्रकाशक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या ‘भरारी प्रकाशना’च्यावतीने नवोदित लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक निशुल्क कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.
प्रकाशन व्यवसाय करीत असतानाच, आपल्या सामाजिक बांधिलकीची जपणूक त्यांनी केली. दरवर्षी किमान एका आदिवासी शाळांना पुस्तक भेट देण्याचे, तथा अभिवाचनाचे कार्यक्रम त्या आयोजित करत असतात. ‘भरारी प्रकाशना’च्यावतीने आतापर्यंत 200पेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन त्यांनी केले आहे. ‘बालसाहित्य’ या प्रकारासाठी त्यांनी केलेले कामदेखील वाखणण्याजोगे. मराठी आणि इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी त्यांनी ‘चेरी लॅण्ड’ या बालमासिकाचे संपादन केले आहे. ‘शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन’च्यावतीने, जळगावच्या खांबगाव येथे दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवले. या व्यतिरिक्त विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी सदर लेखनसुद्धा केले. ‘कोविड’ काळात 65पेक्षा अधिक ई-बुक्सचे संपादन त्यांनी केले. या व्यतिरिक्त अनेक ध्वनिमुद्रिकांची निर्मितीसुद्धा त्यांनी केली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत विविध वृत्तवाहिन्या तसेच, आकाशवाणीवरसुद्धा त्यांची मुलाखत घेण्यात आली.
साहित्य विश्वातील त्यांच्या कार्यासोबतच मान्यवर संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवरसुद्धा त्या कार्यरत आहेत. ‘युवा साहित्य प्रतिष्ठान’ येथे त्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, विलेपार्ले शाखा येथे त्या कार्यवाह म्हणून कारभार सांभाळत आहेत. साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी करणार्या लता गुठे यांनी सिंगापूर येथे भरलेल्या ‘जागतिक मराठी विश्व साहित्य संमेलना’तील परिसंवादात व चर्चासत्रामध्ये भाग घेतला.
ग्रामीण भागातून मुंबईत व मुंबईतून थेट सातासमुद्रापार भरारी घेणार्या लता गुठे यांचा प्रवास निश्चितच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशाला गवसणी घालणार्या लता या युवकांना, उद्योजकांना मार्गदर्शन करताना म्हणतात की, “माणूस हा त्याच्या विचारांनी मोठा होत असतो. त्यामुळे आपले विचार बदलले की, आपसूकच त्याचे रूपांतर योग्य त्या कृतीमध्ये होते. आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे, आपण आपली ऊर्जा त्यामध्ये खर्च करावी. धरसोड वृत्तीमुळे केवळ आपल्याच वेळेचे नुकसान होते. यशस्वी होण्यासाठी संयम राखणे आणि सातत्याने हाती घेतलेल्या गोष्टींचा अभ्यास करत राहणे, याचे महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे.
बर्याचदा कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना लोकं आपल्या वयाचा विचार करतात. परंतु, वय म्हणजे फक्त एक आकडा आहे. काम करण्याची आपली जर तयारी असेल, तर इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करू नये.” वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणार्या लता गुठे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भरपूर शुभेच्छा!