मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चंद्रपूर जिल्ह्यातील लाहोराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जवळपास हजार किलोच्या नर रानगव्याचा मृत्यू झाला आहे (indian gaur killed). सोमवार दि. ७ जानेवारीच्या रात्री झालेली ही धडक एवढी जोरदार होती की, रानगवा ३० फूट रस्त्याच्या खाली फेकला गेला. (indian gaur killed)
चंद्रपूर-मूल हायवे हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पच्या जंगलाला लागूनच आहे. त्यामुळे नेहमीच या महामार्गावर वन्यप्राणी रस्ता ओलांडताना दिसतात. हा महामार्ग NH -930 नॅशनल हायवेकडे येत असल्याने 'हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटी'ने या महामार्गाच्या लगतचे झुडुपं काढून टाकण्याची विनंती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. जेणेकरून वाहतूक करणाऱ्या लोकांना रस्त्यावर येणार वन्यप्राणी निदर्शनास येती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने झुडुपांमधून बाहेर पडलेला अजस्त्र गवा चालकाला दिसला नाही आणि वाहनाच्या धडकेच त्याचा मृत्यू झाला. 'हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटी'चे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.
चंद्रपूर - मूल हा महामार्ग वन्यजीवांचा भ्रमणमार्ग असून तो कावल व्याघ्र प्रकल्प-कन्हाळगाव अभयारण्य-ताडोबा व्याघ्र प्रकल्प - उमरेड कऱ्हांडला या जंगलांना जोडलेला आहे. या महामार्गावर उपशमनयोजना अनेक वर्षपासून प्रस्तावितच आहे. या महामार्गावर गेल्या सात ते आठ वर्षात लोहारा आणि मामला फाटा परिसरात रानगवा जातीचा वन्यप्राण्याचा हा तिसरा बळी आहे. घटनास्थळी दिनेश खाटे,अमित देशमुख ,नाजिश अली,ओंकार मत्ते वनपरिक्षेत्र अधिकरी नायगमकर, तिजारे आणि पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडसेलवार उपस्थित होते.