( indian era of science ) आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे, असे नेहमी म्हटले जाते. अणूपासून ब्रह्मांडापर्यंत निसर्गनियमांचे मानवास जे आकलन झाले आहे आणि मानवी व्यवहार सुलभ व्हावेत, त्यासाठी जी तंत्रज्ञानाची प्रगती झाली आहे ते सर्व पाहता, हे विधान स्वाभाविकपणे योग्य वाटते. आजच्या विज्ञानाचा समग्रतेने विचार केल्यास त्यात काही महत्त्वाचे असे अंतर्विरोध आहेत. परंतु, व्यवहाराच्या पातळीवर या अंतर्विरोधांचा परिणाम नगण्य आहे. त्यामुळे या ‘विज्ञान युग’ संकल्पनेची फारशी चिकित्सा होत नाही. ही संकल्पना वैचारिक वसाहतवादाचा जागतिक प्रभाव कसा पुढे नेते, ते आपण विस्ताराने पाहिले आहे. तरी इथे पुन्हा थोडक्यात उजळणी करू.
स्लामी (आणि काही प्रदेशांमध्ये ख्रिस्ती) आक्रमणाखाली पिचलेल्या भारतीय समाजाची विज्ञान परंपरा क्रमाक्रमाने नष्ट होत गेली आणि याच सुमारास चर्चचे जोखड झुगारून देऊन पुनरुत्थान करणार्या युरोपने नवी विज्ञान परंपरा जोपासली. युरोपच्या वैज्ञानिक पुनरुत्थानामागे अल-ख्वारिझ्मीसारख्या पर्शियन गणिततज्ज्ञांनी युरोपात नेलेले भारतीय गणित हा एक महत्त्वाचा घटक होता, हे आपण पाहिले. परंतु, ते योगदान आज विस्मृतीत गेले आहे. या ऐतिहासिक घटनाक्रमाचा परिणाम म्हणून युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती आणि वसाहतींच्या आर्थिक पिळवणुकीतून आलेली संपन्नता, यामुळे युरोप वैज्ञानिकदृष्ट्या उर्वरित जगाच्या पुढे निघून गेला. युरोपने या काळात अवलंबलेल्या ‘श्रेयनाम’ पद्धतीमुळे आज असा सार्वत्रिक समज आहे की, सर्व वैज्ञानिक प्रगतीचे मूळ युरोपीय आहे. त्यामुळे इतर संस्कृती भूतकाळात कितीही श्रेष्ठ पदास पोहोचल्या असतील, तरी भविष्यकाळ हा युरोपने जगास दिलेल्या वैज्ञानिक देणगीचा आहे आणि संपूर्ण जग हे त्याकरिता एक प्रकारे युरोपच्या ऋणात आहे. अन्य संस्कृतींचा या वैज्ञानिक प्रगतीतील हातभार नाकारल्याने युरोपेतर जगात या वैज्ञानिक प्रगतीविषयीची समाजमनातील कल्पना स्वाभाविकपणे न्यूनत्वाची आहे.
विज्ञानामधील आणि गणितामधील अनेक विषयांमधील प्राचीन भारतीय विद्वानांचे योगदान आपण विस्ताराने पाहिले. परंतु, ‘विज्ञानयुग’ असा विचार करताना विज्ञान म्हणजे काय? या मूलभूत तत्त्वज्ञानात्मक विषयाचा विचार आवश्यक आहे. भारतीय तत्त्वचिंतन विज्ञानाकडे काय दृष्टीने पाहते आणि युरोपच्या तुलनेत त्यात काही फरक आहे का? जो यापुढील वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो, यासंबंधीच्या काही मुद्द्यांचा यापुढील काही भागांत आपण विचार करू.
‘विज्ञान’ या विषयाचा संस्कृतीसापेक्ष अर्थ लक्षात घ्यायचा असेल, तर आपल्याला प्रामुख्याने दोन विषयांकडे पाहावे लागेल. पहिले म्हणजे, त्या त्या संस्कृतीची ‘विश्व’ संकल्पना. यामध्ये विश्वनिर्मिती, विश्वातील सर्व पदार्थांच्या निर्मितीचे कारण व प्रक्रिया, सर्व पदार्थांच्या मूलभूत गुणधर्मांच्या विषयीच्या कल्पना, विश्वाच्या अंताविषयीचे विचार आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर वाहणार्या काळाच्या प्रवाहाचे आकलन या विषयांचा विचार केला पाहिजे. दुसरा विषय म्हणजे, या सर्व सृष्टीतील मानवाचे स्थान, त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन आणि या प्रयोजनास पूर्ण करण्यासाठी आवश्यक असे मानवी समाजाच्या वर्तनाचे नियम. यापैकी पहिला विषय म्हणजे ‘विश्व’ संकल्पना आज आपण थोड्या विस्ताराने पाहू.
विश्वनिर्मितीविषयी अनेक भारतीय संकल्पना प्रचलित आहेत. परंतु, त्या सर्व संकल्पनांमध्ये प्रारंभी एका अनादि स्थितीची कल्पना केलेली आहे, जी निर्गुण स्वरूपात आहे. या स्थितीमध्ये प्रत्यक्ष ईश्वरीय तत्त्वही निर्गुण आणि कर्महीन अवस्थेत असते. या अवस्थेतून नेमकी विश्वाची उत्पत्ती का, कधी आणि कशी होते? याविषयी विविध दर्शनांमध्ये तपशिलाचे फरक दिसतात. परंतु, विविध कारणे ही ईश्वराच्या इच्छेवर किंवा क्रियेवर अवलंबून आहेत. त्रिगुणात्मक प्रकृतीची कल्पना करणारी दर्शने विश्वाच्या निर्मितीबरोबर तिन्ही गुणांचा उद्भव होऊन निर्गुण स्थितीचा विलय होतो असे मानतात. इथे भारतीय संकल्पना आणि युरोपीय अब्राहमिक संकल्पनेत फरक करणे आवश्यक आहे. दोन्हीकडे ‘विश्वोत्पत्ती’ हे ईश्वराचे कार्य असले, तरी पाश्चात्य संकल्पनेतील ईश्वर सगुण स्वरूपात विश्वाच्या आधी अस्तित्वात आहे आणि त्याने स्वतःच्या इच्छेने आणि चिंतनाने विश्व निर्माण केले आहे. ‘सगुण-निर्गुण’ या संकल्पना नसल्याने पाश्चात्य परमेश्वराच्या इच्छाही मानवी स्वरूप घेताना आपण कित्येकदा पाहतो. भारतीय चिंतन ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाची कल्पना करू शकत असल्याने, विश्वोत्पत्तीची कारणे तर्कबुद्धीच्या पलीकडची असू शकतात, ही कल्पना सहज स्वीकारते. याविषयी सर्वात अभिनव कल्पना ऋग्वेदातील ‘नासदीय सूक्त’ मांडते. या सूक्तात विश्वाच्या प्रारंभी कोणत्याही प्रकारचे अस्तित्व असल्याचे आणि नसल्याचेही नाकारले आहे. कोणत्याही प्राकृतिक गुणधर्म असल्याला नाकारले आहे आणि ते नसल्यालाही. पण, मग अशा अवस्थेतून हे विश्व निर्माण कसे झाले? असा प्रश्न विचारून हे सूक्त शेवटी म्हणते की, “या सर्वांच्या निर्मात्या परमेश्वरालाही ही उत्पत्ती प्रक्रिया माहीत आहे का कोणजाणे किंवा कदाचित नसेलही.”
‘सांख्य दर्शन’ प्रकृतीतत्त्व पुरुषतत्त्वापासून वेगळे मानून भौतिक जगाच्या स्वतंत्र अस्तित्वाची कल्पना मांडते. विश्वोत्पत्तीची कारणे अज्ञात असली, तरी त्याचा विकास प्राकृतिक गुणधर्मांच्या अनुसार होत राहतो. पुरुषतत्त्व हे केवळ निरीक्षकाची भूमिका बजावते. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही वेगळी तत्त्वे असताना त्यांचा परस्पर संबंध कसा येतो, हे ‘सांख्य तत्त्वज्ञाना’त विस्ताराने विशद केले आहे. आधुनिक भौतिकशास्त्रातील ‘पुंजवाद सिद्धांता’त जे निरीक्षकाचे स्थान आहे, त्याच्याशी या संकल्पनेचे साम्य जाणवल्यावाचून राहात नाही. पारंपरिक पाश्चात्य विज्ञान संकल्पना ही निरीक्षक-निरपेक्षतेवर भर देते. किंबहुना, कोणत्याही वैज्ञानिक तत्त्वाच्या सत्यतेची खरी कसोटी म्हणजे निरीक्षक-निरपेक्ष पद्धतीने केलेल्या प्रयोगांवरून ते तत्त्व सिद्ध होणे. विज्ञानाविषयीच्या या संकल्पनेमुळे आईनस्टाईनसह कित्येक वैज्ञानिकांनी सुरुवातीस ‘पुंजवादा’ला विरोध केला होता. ‘पुरुष-प्रकृती संकल्पना’ आणि ‘जीव-शिव संकल्पना’ यामुळे भारतीय चिंतन मात्र एकाच वेळी ‘निरीक्षकसापेक्ष’ आणि ‘निरीक्षकनिरपेक्ष’ अशा दोन्ही सत्यतांचे अस्तित्व एकाच वेळी मान्य करू शकते.
विश्वाची निर्मिती कशी आणि का झाली, हे निश्चित सांगता येत नसले, तरी ती कधी झाली याविषयी जगात मतांतरे आहेत. ‘बायबल’मधील जेनेसिसनुसार, ईश्वराने सहा हजार वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती केली. या निर्मितीस सहा दिवस लागले आणि सातव्या दिवशी त्याने विश्रांती घेतली. यातील मानवाची निर्मिती सर्वांत शेवटी आणि सर्वाधिक अचूक होती. सहा हजार वर्षांची विश्वाची कालगणना ही युरोपमधील वैज्ञानिक प्रगतीसाठी एक अडथळा बनून राहिली होती. विशेषतः जेव्हा भूगर्भशास्त्राने पृथ्वीचे वय काही अब्ज वर्षांचे असल्याचे दाखवले आणि जीवशास्त्राने काही कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांचा अभ्यास केला, तेव्हा या विज्ञानावर पाश्चात्य जगतात प्रचंड टीका झाली. अजूनही अमेरिकेत ‘बायबल’मधील निर्मितीचे ज्ञान उत्क्रांतीच्या सिद्धांताऐवजी शाळेत शिकवावे, म्हणून मागणी होते. यावरून या संकल्पनेचा समाजाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावरील परिणाम स्पष्ट होतो.
भारतीय संकल्पनेनुसार, आपण काळाच्या लहानात लहान भागापासून चक्राकार कल्पना करीत महायुग आणि मन्वंतर संकल्पना मांडली आहे. हे चक्र साधारण काही अब्ज वर्षांचे असून, सध्याच्या विश्वाचे वय जे साधारण 13 अब्ज वर्षे मानले जाते, त्याच्याशी मिळतेजुळते आहे. मात्र, सांख्यिक निकटता हा मुद्दा येथे गौण आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, भारतीय चिंतनातील कालगती ही चक्राकार आहे. जसे चंद्र-सूर्याचे भ्रमणकाल निश्चित असून ते ठराविक काळाने पुन्हा नक्षत्रचक्रात त्याच ठिकाणी दिसतात, त्याचप्रमाणे संपूर्ण विश्व हे उत्पत्ती स्थिती आणि विलय या चक्रातून जाते. ही चक्राकार कालसंकल्पना भारताच्या विज्ञानविषयक दृष्टिकोनावर फारच प्रभाव टाकते. याउलट पाश्चात्य कालसंकल्पना एकरेषीय असून, त्यात मानवी प्रयत्नातून सतत गुणवृद्धी होत राहते. या कालरेषेच्या अंतास सर्व मानवांच्या पाप-पुण्याचा निवाडा होऊन त्यांना स्वर्ग अथवा नरकाची प्राप्ती होते. भारतातील चक्रीय संकल्पनेमुळे जन्म-मृत्यू हेही एक चक्रच मानले जाऊन, पाप-पुण्याचे भोगही सतत मिळत राहतात. काळाच्या प्रवाहाच्या भिन्न संकल्पना सृष्टीच्या प्रयोजनाविषयी टोकाच्या भिन्न युरोपीय आणि भारतीय चिंतनातून निर्माण होतात.
विश्वाची निर्मितीप्रक्रिया जरी नेमकेपणाने सांगता येत नसल्याचे मान्य झाले, तरी निर्मितीच्या नंतरही विविधतापूर्ण सृष्टी कशी निर्माण झाली? यावर भारतीय दर्शने सखोल विचार मांडतात. यात प्रामुख्याने ‘वैशेषिक दर्शना’ने विस्ताराने चर्चा केली आहे. सहा प्रकारच्या पदार्थांची आणि नऊ प्रकारच्या द्रव्यांची कल्पना करून संपूर्ण जडसृष्टीचे गुणधर्म निश्चित करण्याचा प्रयत्न वैशेषिक दर्शन करते. या नऊ द्रव्यांमध्ये पृथ्वी, वायू यांसारखी पंचमहाभूते आहेतच. पण, दिक् आणि काल यांचाही अंतर्भाव आहे. त्याचबरोबर मन आणि आत्म्याचा द्रव्य म्हणून समावेश करून हे दर्शन केवळ भौतिक न राहता मानसिक अवस्थांचाही संकल्पनात्मक विचार करते. या सर्व द्रव्यांचे अणुस्वरूपातील गुणधर्म काय असतील, त्यांचे परस्परसंबंध आणि अभिक्रिया कशाप्रकारे होतील, सृष्टीच्या निर्मितीक्षणापासून त्यांची क्रमबद्ध उत्पत्ती कशी झाली आणि कल्पांताच्या वेळी त्यांच्या विलयाचा क्रम काय असेल, यांचे सिद्धांतन वैशेषिक दर्शनाने केले आहे. वस्तूच्या भौतिक गुणधर्मांचे कारण पदार्थांची गती, त्यांची स्पंदने आणि त्यापासून होणार्या ध्वनीचे गुणधर्म याचाही विचार वैशेषिक दर्शनाने केला आहे. भौतिक जगाचे वर्णन करणारे वैशेषिक दर्शन आणि तर्कशास्त्राचा पाया घालणारे न्यायदर्शन अशा न्याय-वैशेषिक जोड दर्शनामध्ये भारताच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया आहे, असे एक प्रकारे म्हणता येईल.
आज चालू असलेली अनिर्बंध वैज्ञानिक घोडदौड आणि त्यामुळे उभी राहणारी मानवी समाजापुढील आव्हाने, याचे उत्तर शोधण्यासाठी वेगळी वाट धरणे भाग आहे. वैचारिक वसाहतवादाचे जोखड त्याचबरोबर पाश्चात्य वैज्ञानिक दृष्टिकोनाचे ओझेही घेऊन उभे आहे. दोन्ही दूर केल्याशिवाय नवी वाट दिसू शकणार नाही.
डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
9769923973