मानवाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य अत्यंत कमकुवत झाले आहे. हवामान बदलताच, लोक पटकन आजारी होतात. आजार वेगाने का वाढत आहेत, या समस्येबद्दल तुम्ही कधी गांभीर्याने विचार केला आहे का? काय कारण असू शकते? निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्याला दररोज पुरेशा प्रमाणात शुद्ध ऑक्सिजन, स्वच्छ पाणी आणि पौष्टिक अन्न मिळते का? म्हणूनच स्वस्थ समाजासाठी गरज आहे सशक्त सामाजिक आरोग्याची...
जच्या आधुनिक युगात माणसाने जशी प्रगती केली आहे, त्याच प्रमाणात, आरोग्याशीही तडजोड झाली आणि ती काळानुसार सतत वाढत आहे, ज्याचे कारण मानव स्वतः आहे. हृदयरोग, मेंदूचा झटका, कर्करोग यांसारखे प्राणघातक आजार झपाट्याने वाढत आहेत, त्यासोबतच मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, अशक्तपणा, आहारात पोषक तत्त्वांचा अभाव या समस्या शिगेला पोहोचल्या आहेत. त्यामुळे अकाली मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही क्षणांपूर्वी पूर्णपणे निरोगी दिसणारी व्यक्ती, प्रौढांपासून ते लहान मुलांपर्यंत, खेळताना किंवा व्यायाम करताना किंवा बसल्याबसूनदेखील बेशुद्ध पडते आणि अनेकदा त्यांचा मृत्यू झाल्याचे कळते. दशकापूर्वी आपण ज्या प्राणघातक आजारांबद्दल क्वचितच ऐकायचो, ते आता आपल्या नातेवाईक, शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचले आहेत. दुसरीकडे प्रदूषण आणि अस्वच्छता आपला श्वास रोखत आहेत. 2024च्या ‘एअर क्वालिटी इंडेक्स’च्या आकडेवारीनुसार, भारत जगातील पाच सर्वांत प्रदुषित देशांमध्ये समाविष्ट आहे.
भारतातील सुमारे 70 टक्के पाणी प्रदुषित आहे आणि देशातील जवळजवळ अर्ध्या नद्या पिण्यासाठी किंवा सिंचनासाठी असुरक्षित आहेत. यामुळे 2024च्या जागतिक जल गुणवत्ता निर्देशांकात भारत 122 देशांपैकी 120व्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये ‘बीएमजे’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, भारतात दरवर्षी 2.18 दशलक्ष मृत्यू बाहेरील वायुप्रदूषणामुळे होतात. लॅन्सेट 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, भारतात पाच लाखांहून अधिक मृत्यू जलप्रदूषणामुळे झाले आहेत. देशात हजारो कोटी रुपयांच्या बनावट औषधांचा मोठा व्यवसाय आहे. मोठ्या सरकारी रुग्णालयांमध्येही रुग्णांना बनावट औषधे वाटली जातात. आशियातील सर्वांत मोठ्या रुग्णालयांमध्ये समाविष्ट असलेल्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ही घटना नुकतीच उघडकीस आली.
धान्य पिकवण्यापासून ते आपल्या ताटात वाढण्यापर्यंत, त्यांना अनेक हानिकारक रासायनिक प्रक्रियांमधून जावे लागते. देशात अशुद्ध अन्न आणि अस्वच्छतेची समस्या खूप मोठी आहे. लोक स्वार्थ आणि लोभात इतके आंधळे झाले आहेत की, ते एका रुपयाच्या फायद्यासाठीदेखील इतरांना विष पाजण्यास तयार आहेत. अलीकडेच कोल्हापूरमधून बातमी आली की, मृतदेहांवर वापरला जाणारा बर्फ बाजारात मिळणार्या थंड पेयांमध्ये वापरला जात आहे. आश्चर्यकारक आहे की, आपल्या देशात जेवढे दूध उत्पन्न होत नाही, त्यापेक्षा जास्त दूध विकले जाते. देशातील 68.7 टक्के दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रदूषक आढळून आले आहेत. तेल, तूप, गोड, नमकीन आणि मैदा यांसारख्या अन्नपदार्थांची मोठी मागणी आहे, जेव्हा की या पदार्थांचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. मध, मसाले, चहापत्ती, तेल, दूध, मिठाई, तूप आणि केशर यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आहे. बाहेरील खाद्यपदार्थांचे रंग खूपच चटक आणि आकर्षक दिसतात. बहुतेक खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठी नैसर्गिक रंगांऐवजी हानिकारक कृत्रिम रंगांचा वापर केला जातो.
अन्नपदार्थांमध्ये वापरले जाणारे बाह्य बर्फ, पाणी, चटण्या, सॉसेज, खाद्यतेल हे बहुदा कमाल दर्जाच्या मानकांची पूर्तता करत नाहीत. देशातील बहुतेक ‘स्ट्रीट फूड’विक्रेत्यांना हातमोजे न घालता थेट अन्नपदार्थांना स्पर्श करण्याची खूप वाईट सवय आहे. याचे गंभीर परिणाम ग्राहकांच्या आरोग्याला भोगावे लागत आहेत. जे अन्न प्राण्यांसाठीही योग्य नाही, म्हणजेच प्राणघातक कचरायुक्त आहे, ते मानव मोठ्या आवडीने खात आहे.
देशातील बहुतेक अन्नपदार्थ पॅकिंग आणि गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर केला जातो, जो आरोग्यासाठी धोकादायक आहे. ‘एफएसएसएआय’च्या मते, अन्न पॅकेजिंग साहित्य म्हणून शोषक कागदाऐवजी वर्तमानपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने भारतीयांमध्ये अन्नविषाक्तता हळूहळू पसरत आहे. रिफाइन्ड केलेले पीठ अर्थात मैदा रासायनिकरित्या ब्लीच केलेले (घातक) असते, त्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ जास्त असतो, ज्यामुळे टाईप-2 मधुमेह होऊ शकतो आणि फायबरच्याकमतरतेमुळे ते पचनसंस्थेसाठी अडथळा ठरते. ‘जंक फूड’ तयार करण्यासाठी खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर केला जातो. तेल वारंवार गरम केल्याने लिपिड्सचे ऑक्सिडेटिव्ह ब्रेकडाऊन होते. पुन्हा गरम केलेल्या तेलाने बनवलेले अन्न दीर्घकाळ सेवन केल्यास व्यक्तीच्या अॅण्टिऑक्सिडंट संरक्षण नेटवर्कवर गंभीर परिणाम होऊ शकतो, यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि रक्तवाहिन्यांच्या जळजळासारखे विकार होऊ शकतात, नंतर पुढे घातक आजार होतात. ‘जंक फूड’ किंवा बाहेरील अन्नामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे नुकसान, लठ्ठपणा, यकृताचे आजार, कर्करोग, दातांचे नुकसान, नैराश्य, पोटाचे विकार, त्वचारोग इत्यादी समस्यांचा धोका वाढतो. पॅकबंद अन्न आणि पेयांमुळे बहुदा आपण ‘मायक्रोप्लास्टिक’चे सेवन करत आहोत. भारतातील 56 टक्के आजार हे अस्वास्थ्यकर आहाराशी संबंधित आहेत. आयुर्वेद म्हणतो की, जर आहार योग्य नसेल, तर आरोग्य सुधारण्यासाठी औषधही काम करणार नाही.

‘स्ट्रीट फूड’चे आचारी किंवा अन्नविक्रेत्यांनी सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. हात चांगले धुवा, स्वच्छ भांडी आणि उपकरणे वापरा, दुकानात स्वच्छता ठेवा, कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा, अन्न तयार करण्यासाठी पिण्याचे पाणी वापरा. अन्न तयार करताना आणि वाढताना स्वच्छ धुतलेले कपडे घाला, हातमोजे आणि ‘एप्रन’ घाला. काम करताना तोंड आणि केस झाकून ठेवा. तसेच, चेहरा, डोके, केस किंवा शरीराच्या इतर भागांना स्पर्श करणे किंवा खाजवणे टाळा. नखे कापा व स्वच्छता ठेवा. सुरक्षित तापमानात अन्न साठवा, चांगल्या दर्जाचा कच्चा माल निवडा, स्थानिक सरकारी नियमांनुसार कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. तळण्यासाठी त्याच तेलाचा पुनर्वापर करू नका, अन्नपदार्थ झाकून ठेवा, शिळे अन्नपदार्थ विकू नका. हे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. स्वच्छतेसाठी आणि गुणवत्तेसाठी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागले, तरी ठीक, पण आरोग्याशी तडजोड करू नका.
मरण्यासाठी आता आपल्याला फार दूर जाण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि आपली जीवनशैली आपल्याला अकाली मृत्यूकडे वेगाने घेऊन जात आहे. देशातील अनेक व्हायरल फूड व्हिडिओ आणि बातम्यांमध्ये अन्नपदार्थांमधील अशुद्धता, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, धोकादायक रासायनिक प्रक्रिया, विषारी रंग आणि भेसळ यांबद्दल माहिती मिळतेच. बंद खोल्यांमध्ये तयार होणार्या अनेक अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण होते, तरीही हे अन्नपदार्थ रस्त्यावर, रेल्वेवर, बसस्थानकांवर आणि सार्वजनिक ठिकाणी खुलेआम विकले जातात. देशात मोठ्या प्रमाणात भेसळीबरोबरच बनावट कंपन्यांचे अन्न आणि पेयेही विकली जातात. आपले आरोग्य आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घेणे, ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. चवीच्या लोभापायी आपले अमूल्य आरोग्य पणाला लावू नका. घरी बनवलेल्या अन्नाला प्राधान्य द्या, दररोज व्यायाम, पुरेशी झोप, स्वच्छता आणि पौष्टिक आहाराची काळजी घ्या. गरम पेये आणि अन्नासाठी प्लास्टिक आणि छापील टाकाऊ कागद वापरू नयेत. शिळे अन्न, तळलेले, मसालेदार, गोड, मैदा असलेले, कृत्रिम रंग, पॅक केलेले अन्न आणि रासायनिक प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांपासून दूर राहा. गरज पडल्यास, प्रवास करताना किंवा बाहेर जाताना घरून पिण्याचे पाणी आणि जेवणाचा डबा सोबत ठेवा. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आरोग्याची काळजी घ्या, निरोगी आयुष्य जगा.
डॉ. प्रीतम गेडाम
8237417041