( Suvarnabharari Sarika Nagare ) ‘सुवर्णभरारी’ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सारिका नागरे यांचे समाजसेवेचे व्रत अविरत सुरू आहे. सारिका यांनी समाज आणि परिस्थितीशी सामना करत आपली हक्काची जागा निर्माण केली. आता इतर महिलांसाठीही त्या हक्काचे माहेरघर निर्माण करत आहेत. समाजातील शोषित, पीडित, वंचित, अन्यायग्रस्त महिलांसाठी आयुष्यभर काम करत राहणार असल्याचा त्यांनी निश्चय केला असून त्यांना ‘सासुरवाशिणींची सारिका माय’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
ध्येय नक्की असले की, आयुष्यामध्ये उंच भरारी घेण्यासाठी पंख आणि बळ परमेश्वराकडून आपोआप मिळते. यासोबतच आपले आप्तस्वकीय, मित्र-मैत्रिणी, परिचितांकडून पाठीवर मिळालेली मायेची थाप आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय नक्की करून जाण्यासाठी प्रेरणा देणारी असते. अशीच प्रेरणा नाशिकमध्ये महिला आणि ‘लव्ह जिहाद’साठी काम करणार्या सारिका नागरे यांना मिळत गेली. जन्म देणारे मातापिता आणि श्री श्री 1008 महामंडलेश्वर दत्तात्रय दहीवाळ महाराज यांचे आशीर्वादामुळेच सारिका यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. पतीचे निधन झाल्यानंतर उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाल्याने घर कसे चालवायचे आणि मुलांचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेत सारिकाताई होत्या. त्यातच सासरच्यांनी संपत्तीवरून वाद करण्यास सुरुवात केल्याने माहेरच्यांनी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. मात्र, मुले लहान असल्याने हा चुकीचा निर्णय घेणे, त्यांच्या मनाला शिवले नाही.
यातूनच त्यांनी स्वतःसाठी बाहेर पडत आपले अस्तित्व निर्माण करण्याची मनाशी खूणगाठ बांधली. त्यातूनच विधवा निवृत्तिवेतनासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला. तेथे गेल्यानंतर त्यांच्यापेक्षा अधिक गरजू आणि दुःखी महिला निवृत्तिवेतनासाठी हेलपाटे मारत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सारिकाताईंनी आपली निवृत्तिवेतन सुरू करण्यासाठी दीड वर्ष चकरा मारल्या. पण, निवृत्तिवेतन काही सुरू झाले नाही. मधल्या काळात सारिका यांनी आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी घरातच ‘प्ले स्कूल’ सुरू केली. नर्सरी ते बारावीपर्यंतच्या मुलांचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. यासोबतच आपले शिक्षणदेखील पूर्ण करत होत्या.
मात्र, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे कठीण झाल्यानंतर त्यांनी आपले शिक्षण थांबवले. इकडे निवृत्तिवेतन सुरू होत नसल्यामुळे चकरा मारून उद्विग्न झाल्याने त्यांनी थेट मंत्रालयात धडक दिली. तेथे आपली व्यथा मांडली. मग मात्र मंत्रालयातून दट्ट्या बसल्यानंतर सारिकाताईंचे निवृत्तिवेतन सुरू झाले, मात्र फक्त माझेच निवृत्तिवेतन सुरू न करता, इतरही महिलांचे निवृत्तिवेतन सुरू करण्याचा पवित्रा सारिका यांनी घेतल्याने इतर दहा महिलांचे निवृत्तिवेतन सुरू झाली. पहिल्या लढाईतच झकास विजय मिळाल्याने सारिका यांनी मग महिलांच्या समस्या सोडविण्यासाठीच स्वतःला वाहून घेतले. कामाला सुरुवात केल्यानंतर अनेक समाजसेवक त्यांच्यासोबत जोडले गेले.
घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर त्यांना जाणवले की, आपल्यापेक्षा इतरांच्या समस्यांची व्याप्ती अधिक मोठी आहे. पती गेल्यानंतर एक वर्षातच ‘कोविड’ची महामारी आली. ‘कोविड’काळात सारिका यांनी हातावर पोट असलेल्या अनेकांना मदतीचा हात दिला. लोकांचे लाखो रुपयांचे रुग्णालयाचे देयक कमी केले. शहरातील एका रुग्णालयाने पैशांअभावी एका मुलाचा मृतदेह 20 तास अडकावून ठेवला. त्या कुटुंबाला आधार देत रुग्णालय प्रशासनाला गुडघे टेकवण्यास भाग पाडत मृतदेह कुटुंबाच्या हवाली केला.
यामुळे सारिका यांच्याकडे अनेक तक्रारी येऊ लागल्या. याच काळात त्यांनी ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकालेल्या अनेक तरुणींना स्वगृही आणण्याचे काम केले. एका केसमध्ये तर एक मुलगी ऐकायलाच तयार नव्हती. मग तिला ‘लव्ह जिहाद’मध्ये मुलींचा कसा छळ केला जातो, हे सांगितल्यानंतर ती मुलगी परत आपल्या मातापित्याकडे परतली. घरगुती हिंसेमुळे माहेरी राहात असलेल्या अनेक मुलींचे संसार सुरू केले. यामध्ये अगदी छोट्याशा कारणावरून सासरच्यांनी माहेरी काढून दिलेल्या मुलींना परत सासर मिळवून दिले. त्याच काळात ‘विश्व हिंदू परिषदे’मध्ये काम करणारे देवकाते यांनी दोन महिलांचे प्रश्न सोडवण्यास सांगितले. त्या मुलींना न्याय मिळवून देण्यास हातभार लावला. सारिका यांच्या या कामामुळेच ‘विश्व हिंदू परिषदे’च्या पदाधिकार्यांबरोबर ओळख वाढत गेली.
सारिका यांच्या कामाचा आवाका बघून ‘विश्व हिंदू परिषदे’च्या ‘नाशिक जिल्हा मातोश्री’सह संयोजिका या पदाची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली. पतीच्या निधनानंतर पीडित महिलांनाच आपले कुटुंब समजणार्या सारिका यांनी मागील सात वर्षांपासून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी काही संघटनांमध्ये काम केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, फक्त पैसा आणि जागा पदरात पाडून घेण्यापुरत्याच या संस्था काम करत आहेत. त्यामुळेच विचारांती अशा संघटनांबरोबर काम करण्यापेक्षा सारिका यांनी स्वतःचीच संस्था निर्माण केली. ‘सुवर्णभरारी’ असे तिचे नाव. 2022 साली स्थापन केलेल्या या संस्थेच्या माध्यमातूनच लोकांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. सारिका यांना आपल्या पंखांनी सुवर्णभरारी घ्यायची आहे, त्यामुळेच त्यांनी आपल्या संस्थेचे नाव ‘सुवर्णभरारी’ ठेवल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
सारिका यांनी खूप हाल सोसत आतापर्यंतचा प्रवास केला आहे. पतीच्या निधनानंतर 14व्या दिवशी सारिका यांनी घरोघर पेपर टाकण्याचे काम केले. या कामामुळेच जग ओळखता आल्याचे त्या सांगतात. येथेच विधवा व निराधार महिलांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप चुकीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणतीही संघटना, पक्ष किंवा स्वतःच्या नातेवाईकांमध्येही विधवा महिलेकडे घाणेरड्या नजरेने बघितले जाते. फक्त गरीबच नाही, तर श्रीमंताघरच्या आणि नवीन लग्न झालेल्या मुलींनादेखील खूप त्रास सहन करावा लागतो. परिस्थितीमुळे त्यातल्या काही महिलांचा पाय चुकीचा पडतो. त्यामुळेच विधवांनी चुकीचा निर्णय घेऊ नये, यासाठी त्यांना आधार देण्यासाठी ‘सुवर्णभरारी’ संस्था सुरू केल्याचे सारिका सांगतात.
यासाठी स्वतःबरोबरच दुसर्यांसाठी उभे राहणार्या अनेकांना सोबत घेत सारिका यांनी मोठे संघटन उभे केले आहे. सारिका यांचे नाव आता राज्याच्या कानाकोपर्यात पोहोचले असून अनेक ठिकाणांहून समस्येबाबत महिलांचे फोन येतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना दिल्ली येथील ‘मॅजिक बुक ऑफ अॅवॉर्ड’ या संस्थेने मानद ‘डॉक्टरेट’ ही पदवी बहाल केली. कोल्हापूरमधील एका इसमाला “कंपनी सुरू करून देतो,” असे सांगून फसवणूक करणारी व्यक्ती सारिका यांनी पोलिसांच्या हवाली केली. त्या व्यक्तीनेच फेसबुकवरून सारिका यांच्या कामाची फाईल तयार करत ‘मॅजिक बुक ऑफ अॅवॉर्ड’ या संस्थेकडे सुपूर्द केली. सारिका यांच्या कामाने प्रभावित होऊन या संस्थेने त्यांना ही पदवी बहाल केली. पदवी घेत असताना महाराष्ट्रातून सारिका या एकमेव होत्या.
आता पुढील काळात सारिका यांना महिलांसाठी हक्काचे माहेरघर उभारायचे आहे. यासाठी नाशिकजवळच्या सामनगाव येथे साडेआठ गुंठे जमीन विकत घेतली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. कोणत्याही महिलेच्या मनात आले की, मला माहेराची गरज आहे, अशा प्रत्येक महिलेला येथे वाटेल तितके दिवस राहता येणार असल्याचे सारिका यांनी सांगितले. समाजाचा विरोध पत्करत तावून-सुलाखून निघालेल्या सारिका समाजाला संदेश देताना म्हणतात की, एखादी महिला विधवा होते, हा तिचा दोष नसतो, तर ते नियतीने ठरवलेले असते. पती गेल्यानंतर मी जे अनुभवले आहे, ते जुन्या काळापेक्षाही भयानक आहे. विधवा परपुरुषासोबत बोलताना दिसली, तरी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. तिच्याकडे संशयाने बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे. विधवा आणि सौभाग्यवती हा भेदभाव करणे सोडून दिल्यानंतरच त्यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल. त्यांच्या या कार्यासाठी आतापर्यंत 50च्या आसपास पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
कोविडच्या काळातही सारिका यांनी कर्ज काढून गरिबांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतागृहांची खूप मोठी समस्या आहे. त्यादृष्टीने मुलींसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करून देत सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले. बचतगट निर्माण करत महिलांना कर्जपुरवठा उभारून दिला. तसेच शासकीय योजना मंजूर करून दिल्या. याच माध्यमातून महिलांसाठी लघुउद्योग उभारला जाणार असून 150 महिलांचा गट तयार करण्यात आला आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवत नोकरी मिळवून दिली. आता त्या महिला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून नाही.
संपूर्ण आयुष्यात कधीही घराचा उंबरठा न ओलांडणार्या 200 महिलांना एकत्रित करत सामाजिक कार्यात सहभागी करून घेत हनुमान जयंती, श्रीराम नवमी, शिवजयंती साजरी केली जाते. स्वतःला समाजसेवेसाठी समर्पित केलेल्या सारिका या प्रत्येक शोषित, पीडित, वंचिताच्या मनामध्ये स्थान मिळवत अडीअडचणी दूर करून त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस निर्माण करण्यासाठी झटत आहेत. अनेक थोरामोठ्यांचे अनुभव आणि आशीर्वाद ही माझ्यासाठी शिदोरी असल्याचे सारिका अभिमानाने सांगतात. त्यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
विराम गांगुर्डे
9404687608