मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्गातील जंगलात शुक्रवार द. ४ एप्रिल रोजी दिसलेल्या निमवयस्क वाघाला 'क्रिप्टोरकिडिझम' म्हणजेच गुप्तवृषणता नामक अनुवांशिक विकार असल्याचे समोर आले आहे (Cryptorchidism in sindhudurg tiger). कारण, या नर वाघाचे वृषण विकसित झाले असले तरी ते शरीराबाहेर आलेले नाहीत (Cryptorchidism in sindhudurg tiger). ज्यामुळे या नर वाघाला वंध्यत्व येण्याची शक्यता आहे. (Cryptorchidism in sindhudurg tiger)
शुक्रवार द. ४ एप्रिल रोजी रात्री मालवणचे दर्शन वेंगुर्लेकर, अक्षय रेवंडकर, स्वप्नील गोसावी आणि संजय परुळेकर हे जिल्ह्यातील एक जंगलात फिरण्यासाठी गेले होते. रस्त्याने वाहनावरून जाताना त्यांना रस्त्यालगतच्या झाडीत हालचाल दिसली. वाहन थांबवताच झाडीतून एक पट्टेरी वाघ त्यांच्यासमोर आला. दर्शन वेंगुर्लेकर यांनी लागलीच कॅमेरा काढून या वाघाचे छायाचित्र टिपले. हे छायचित्रण त्यांनी सोमवार दि. ४ एप्रिल रोजी आपल्या समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केले. या छायाचित्रणात ज्यावेळी वाघ वळून पुन्हा झाडीत जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी वाघाचे अंडकोष दिसत नाहीत. या प्रकारामुळे हा वाघ नसून ती वाघिण असल्याचा समज मुलांना झाला. मात्र, सह्याद्रीत वाघांवर अभ्यास करणारे संशोधक गिरीष पंजाबी यांनी वाघाचे छायाचित्रण तपासले असता, त्यांनी हा वाघ शरीरयष्टीवरुन नर वाघ असल्याचे सांगितले. या वाघाचे नाक गुलाबी असल्याने तो निमवयस्क असून त्याचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षांच्या दरम्यान असल्याचे पंजाबी म्हणाले. यापूर्वी हा वाघ जानेवारी महिन्यात वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपला गेला होता.
वेंगुर्लेकर यांनी टिपलेल्या व्हिडीओमध्ये वाघाचे अंडकोष दिसत नसले तरी, त्याच्या शिश्नाचा भाग दिसतो. मात्र, अंडकोष दिसत नसल्याने 'क्रिप्टोरकिडिझम'चा अनुवांशिक विकार झाल्याची माहिती वन्यजीव संशोधकांनी दिली आहे. सिंधुदुर्गात साधारण आठ ते दहा वाघांचे अस्तित्व आहे. येथील जंगलामधून जाणारा वन्यजीव भ्रमणमार्ग राधानगरीद्वारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जाऊन मिळतो. त्यामुळे सिंधुदुर्गातील वाघांचे अस्तित्व हे सह्याद्रीतल्या वाघांच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे आहे.
'क्रिप्टोरकिडिझम'मध्ये नर सस्तन प्राण्यांमध्ये वृषण हे अंडकोषात उतरत नाही. हा कोणताही आजार नसून तो अनुवांशिक विकार आहे. यामध्ये वृषण इनग्विनल कॅनालमधून अंडकोषात न उतरता ते नर सस्तन प्राण्याच्या शरीरातच राहतात. ज्यावेळी वृषण हे शरीराबाहेरील अंडकोषात असतात, तेव्हा वृषणाचे तापमान नियंत्रित राहून त्यामध्ये विकसित होणारे शुक्राणू हे गर्भधारणेसाठी योग्य बनतात. मात्र, ज्यावेळी वृषण हे शरीराअंतर्गत असतात, तेव्हा उच्च तापमानामुळे त्यामधील शुक्राणू हे गर्भधारणेसाठी पोषक नसतात. ज्यामुळे वंध्यत्व येते. - ओंकार पाटील, वन्यजीव संशोधक, पीएआरसी - वाईल्डलाईफ रिसर्च डिव्हिजन