वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीला मिळाला दोन तासांत उपचारखर्च

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता

    09-Apr-2025
Total Views | 18
 
Chief Minister
 
मुंबई : ( Chief Minister's Relief Fund Cell help )बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. मात्र, गावकऱ्यांच्या तत्परतेने, सरपंचाच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या त्वरित मदतीमुळे या मुलीचे प्राण वाचले. अवघ्या दोन तासांत १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.या मदतीमुळे हवालदिल झालेल्या मुलीच्या कुटुंबाला आधार मिळाला.
 
घटना घडली त्या दिवशी दुपारी रसवंती चालवताना मुलीचे केस अचानक मशिनमध्ये गुंतले आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिच्या आईने हंबरडा फोडला. गावकरी आणि सरपंच निवृत्ती कठोरे यांनी तात्काळ पुढाकार घेत मुलीला जालना येथील कलावती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने त्वरित उपचार सुरू केले.
 
औषधांसाठी पैसे नसल्याची माहिती मिळताच ‘समाजभान’ या सामाजिक संस्थेने तात्काळ आर्थिक मदत केली. दरम्यान, समाजमाध्यमांद्वारे ही घटना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यापर्यंत पोहोचली. मुलीच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अवघ्या दोन तासांत १ लाख रुपयांची तातडीची मदत मंजूर केली. याशिवाय, रुग्णालयाने उपचारांचे २ लाख ९० हजार रुपयांचे बिल माफ करून मानवतेचा आदर्श ठेवला आहे.
 
वडिलांच्या अकाली निधनानंतर या १६ वर्षीय मुलीने कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. अभ्यासात हुशार असलेल्या १९ वर्षीय मोठ्या बहिणीला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि ९ वर्षीय भावाला शालेय शिक्षणासाठी प्रेरणा देत ती स्वतः गावातील बसस्थानकावर रसवंतीचा व्यवसाय करत होती. आईच्या मदतीने कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या मुलीवर आलेल्या संकटाने सर्वांचे मन सुन्न झाले होते. वेळीच मिळालेल्या उपचार आणि आर्थिक मदतीमुळे तिला नवजीवन मिळाले.

रुग्णालयाचा खर्च आणि उपचार

डोक्याला गंभीर दुखापत आणि मेंदूवरील सूज यामुळे मुलीच्या उपचारासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, रूग्णालय प्रशासनाने उर्वरीत बिल माफ केले. यामुळे मुलीच्या कुटुंबावरील आर्थिक ताण कमी झाला. भाजपाचे स्थानिक आमदार नारायण कुचे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने रूग्णालयात जावून रूग्णाची भेट घेतली. शिवाय मुलीचा पुढील संपुर्ण शैक्षणीक खर्च उचलण्याची तयारी दर्शविली.

आईने मानले आभार

सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या मुलीचे प्राण वाचले. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख, आमदार, सरपंच, सामाजिक संस्था आणि डॉक्टरांची आयुष्यभर ऋणी राहीन, अशा भावना मुलीच्या आईने व्यक्त केल्या.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121