मुंबईचे देवनार, कल्याणचा दुर्गाडी नाका परिसर असो अथवा दिल्लीतील गाझीपूर, कचर्याचे भलेमोठाले डोंगर ही जवळपास सर्वच शहरांतील प्रमुख समस्या. पण, कचर्याच्या विल्हेवाटीचे हे आव्हान केवळ भारतीय शहरांपुरते मर्यादित नाही, तर परदेशातही ही समस्या भेडसावताना दिसते. पाश्चिमात्य राष्ट्र म्हटली की स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि त्यासंबंधीचे कठोर नियम, शिस्त वगैरे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहरात हे सर्व नियम अक्षरशः धाब्यावर बसवल्याचे दिसते. बर्मिंगहॅम शहरात जागोजागी कचर्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी आणि रोगराईने डोके वर काढले आहे. खरं तर बर्मिंगहॅम हे ब्रिटनमधील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर. पण, आज याच शहराची अशी दयनीय अवस्था झाली आहे. बर्मिंगहॅमच्या रस्त्यांवर तब्बल 17 हजार टन कचरा पडून आहे आणि सर्वत्र दुर्गंधीचे सावट पसरले आहे. परिणामी, स्थानिकांना आणि विशेषतः सफाई कर्मचार्यांना या पराकोटीच्या अस्वच्छतेबरोबरच उंदरांच्या दहशतीचा सामना करावा लागत आहे.
बर्मिंगहॅममध्ये कचरा हा कचराकुंडीच्या बाहेर ओसंडून वाहत असून, शहरभर जणू काळ्या पिशव्यांचा पूरच आला आहे. अस्ताव्यस्त पसरलेले कुजलेले अन्न, साठलेल्या पिशव्यांमधून रेंगाळणारे किडे ही बर्मिंगहॅमची सद्यस्थिती. त्यातच उंदरांच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिकही बेजार झाले आहेत. नागरिकांना स्वतःच्याच घरात राहणेही आता असुरक्षित वाटू लागले आहे. आता हे उंदीर काही साधेसुधे नाहीत, तर चांगले धष्टपुष्ट आणि तितक्याच मोठ्या आकाराचे. एका स्थानिक वृत्तपत्राने बर्मिंगहॅमवासीयांच्या या व्यथांना वाचाही फोडली. एवढेच नाही तर या उंदरांनी कोणाच्या गाड्यांचे नुकसान केले, तर कोणाच्या पाळीव कुत्र्यांचाही चावा घेतला. स्थानिकांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारीही केल्या. परंतु, त्यावर काही नागरिकांना असे उत्तर मिळाले की, कचरा आणि उंदरांच्या उपद्व्यापाचे हे संकट नियंत्रणात आणण्यासाठी भरपूर खर्च येईल, जो स्थानिक प्रशासनाला परवडणार नाही.
शहरातील सद्यस्थिती पाहता, बर्मिंगहॅममध्ये कचरा गोळा करणार्यांचा सध्या अनिश्चित काळासाठी संप सुरू असून, 350 हून अधिक कर्मचारी संपावर गेले आहेत. सफाईकामावर होणारा खर्च कमी करण्यासाठी कर्मचार्यांना नाोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे, अशा चर्चांमुळे कामगारांनी संपाचे हत्यार उपसले. एवढेच नाही तर कचर्याचा आणि खासकरून उंदरांच्या उपद्रवाचा हा मुद्दा येथील खासदारांकडेही मांडण्यात आला. परंतु, खासदार मंडळी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी अन्य समस्यांमध्येच व्यस्त असल्याचे दिसते. महानगरपालिकेने सुरू केलेली नवीन योजना ही सफाई कर्मचार्यांची कमाई हिरावून घेत असल्याचा दावा कर्मचार्यांकडून करण्यात आला. त्यांच्या मते, त्यांना आठ हजार पाऊंड नुकसान सहन करावे लागेल. यावर महापालिकेचे म्हणणे असे की, फक्त 17 लोकांनाच सहा हजार पाऊंडचे नुकसान होईल. अशाप्रकारे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दोन्हीकडून झाडल्या जात आहेत.
पण, रस्ते झाडायला आणि कचर्याची विल्हेवाट लावायला मनुष्यबळ उपलब्ध नाही, अशी बर्मिंगहॅमची दुरवस्था.
प्रशासकीयदृष्ट्या बर्मिंगहॅम हे एकेकाळी जगातील सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र, आज कचराकोंडी आणि उंदरांच्या हैदोसामुळे शहराची दुर्दशा झाली असून, ती रोखण्यासाठी सरकार कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. उलट सफाई कर्मचार्यांना देण्यासाठी सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे कर्मचारी कपातीच्या भूमिकेत स्थानिक प्रशासन आहे. नुकतेच नव्हे तर जानेवारीपासूनच सफाई कर्मचार्यांनी संपाची भूमिका घेतली आहे. आता सफाई कर्मचारीच संपावर गेल्याने शहरातील उंदरांना मोकळे रान मिळाले आणि बर्मिंगहॅमचा उकिरडा झाला.
सांगायचे तात्पर्य हेच की, ज्या शहराकडे एकेकाळी स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श म्हणून पाहिले जात होते, त्याच शहराची आज अक्षरशः बिकट अवस्था झाली आहे. कचर्याच्या साठलेल्या पिशव्या म्हणजे उंदरांसाठी पंचतारांकित हॉटेलच. बर्मिंगहॅम एकेकाळी ब्रिटनचे संपत्ती निर्माणाचे आणि औद्योगिक क्रांतीचे केंद्र होते. पण, आज या शहरात रस्त्यावर माणसे कमी आणि उंदरांची रेलचेल जास्त, असे भीषण चित्र. त्यामुळे ब्रिटनचे स्टार्मर सरकार आणि स्थानिक प्रशासन ही समस्या कशी मार्गी लावते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.