अधारणीय शारीरिक वेग

    08-Apr-2025
Total Views | 16
 
unbearable physical sensations is coughing
 
( unbearable physical sensations is coughing ) अधारणीय शारीरिक वेगांपैकी एक वेग म्हणजे खोकला. खोकल्याची उबळ आल्यास कोणतीही शारीरिक कृती करताना अडसर निर्माण होतो. तसेच अन्नसेवन, झोपताना आलेल्या खोकल्यामुळे झोपेवरही परिणाम होतो. तेव्हा, आज खोकल्याचे प्रकार आणि परिणाम याविषयी माहिती करुन घेऊया.
 
धारणीय म्हणजे ज्यांचे धारण करू नये किंवा जे धारण करण्यायोग्य नाही, असे. शारीरिक वेग म्हणजे नैसर्गिक शारीरिक आवेग. या वेगांमधून, संवेदनांमधून शरीरातील त्याज्य घटक शरीराबाहेर काढून टाकण्याची इच्छा उत्पन्न होते. शरीराला मेंदूकडून तसा आदेश पोहोचविला जातो आणि असा संकेत मिळाला की, तो अवयव त्या त्या त्याज्य पदार्थाचे शरीरातून निष्कासन करण्यास सज्ज होतो. पण, काही वेळेस ही संवेदना, हा वेग नको त्या वेळेस, नको त्या ठिकाणी उत्पन्न होतो आणि त्याचे निष्कासन, उत्सर्जन प्रक्रियेमध्ये विलंब होतो, बाधा येते. असे क्वचित झाल्यास शरीराला तात्पुरता त्रास होतो.
 
पण, हे अधारणीय शारीरिक वेग जर वारंवार रोखले, त्यांचे उत्सर्जन, शरीरातून निष्कासन वेळोवेळी, जशी संवेदना उत्पन्न होते, तसे (त्यावेळेस) न केल्यास, विविध शारीरिक व मानसिक लक्षणे उत्पन्न होतात. बराच काळ असे अधारणीय शारीरिक वेगांचे धारण केले आणि लक्षणे उत्पन्न होत राहिली, तर पुढे जाऊन शरीर, मन व्याधीग्रस्त होऊ शकते. बरेचदा एखादे लक्षण, आजार कशामुळे निर्माण झाला (त्याच्या मागील हेतू-कारण) याचा विचार न करताच केवळ लक्षणांची चिकित्सा केली जाते. मग अशा वेळेस रुग्णास थोडा काळ बरे वाटते, पण लक्षणे पुन्हा उत्पन्न होऊ शकतात.
 
आयुर्वेदशास्त्रात समूळ व्याधीचे, रोगाचे निर्मूलन करणे हे ध्येय असल्याने एखादे लक्षण, रोग कशामुळे उत्पन्न झाला, याची कार्यमीमांसा व हेतूंचा (कारणांचा) सखोल विचार केला जातो. तसेच निदान परिवर्तन ही चिकित्सेची पहिली पायरी आहे व तसे केल्यास अर्धा आजार त्यानेच बरा होतो. रोग उत्पत्तिकरणांमध्ये अधारणीय वेगांचे अधिक काळ धारण करणे, त्यांना रोखून ठेवणे हेदेखील आहे. आतापर्यंत खालील शारीरिक वेगांबद्दल, संवेदनांबद्दल जाणून घेतले. वायू (ॠरीशी धरून ठेवणे), मूत्र प्रवृत्ति व मलप्रवृत्तिची संवेदना रोखणे, शिंक, भूक, तहान व झोप यांची संवेदना थांबविणे व अश्रू यांना ही अचानक रोखणे, या संवेदनांबद्दल आधीच्या लेखमालेत सविस्तर विवेचन आपण वाचले आहे. आज अशाच एका शारीरिक अधारणीय वेगाबद्दल आपण वाचूया.
 
कास म्हणजे खोकला. खोकला ही संवेदना ही आहे आणि त्याचा वेग धरू नये. खोकल्याबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया. खोकल्याचे मुख्यत्वे करून दोन प्रकार आहेत. ‘सकफ कास’ म्हणजे खोकला ज्यातून कफही निघतो आणि ‘शुष्क कास’ म्हणजे कोरडा खोकला. हा खोकला सुका असतो, त्याच्याबरोबर कफ सहजासहजी सुटत नाही. खूप खोकल्यावर थोडासा दाट कफ निघतो. ‘कास खोकला’ ही शरीराची एक प्रतिक्रियाआहे, ज्याने श्वसन संस्थेतील बिघाड काढून टाकण्याचा शरीराचा प्रयत्न असतो.
 
बरेचदा असे बघायला मिळते की, ऋतू बदलला की ऋतूसंधीकालामध्ये (म्हणजे पूर्वीचा ऋतूमधील शेवटचे आठ दिवस व नवीन सीझन सुरू होतानाचे पहिले आठ दिवस) यादरम्यान बर्‍याचजणांना खोकला उठतो, त्याची उबळ येत राहते. त्यावर धुळीची, हवेतील घटकांची अ‍ॅलर्जी आहे, असे समजले जाते. बरेचदा ही अ‍ॅलर्जी दर ऋतुबदलाला होते. हळूहळू त्याची तीव्रता वाढते व चिकित्सेशिवाय पर्याय राहात नाही. काही व्यक्तींमध्ये वातावरणातील धूलिकण, रजःकणांच्या संपर्कातील जीवांणूमुळे व्हायरल इन्फेक्शन होते. श्वसन संस्थेच्या वरील अवयवांमध्ये विशेषतः  यामध्ये ‘सकफ कास’ हे प्रमुख लक्षण असते.
 
कुठल्याही प्रकारचा खोकला जर एक ते तीन आठवडे असला, तर तो ’अर्लीींश’ प्रकारचा खोकला समजावा. तीन आठवड्यांपेक्षा जास्त आणि आठपेक्षा कमी तर ’र्डीलरर्लीींश’ प्रकारचा आणि आठ आठवड्यांपेक्षा जास्त राहिला तर त्याचे असे निदान केले जाते. काही वेळेस घशाला काही टोचत असेल, घशात काही अडकले असेल, तर ते बाहेर काढण्यासाठी नैसर्गिकरित्या साहजिकपणे खोकला येतो. कफ जर घशात अडकला असेल, तर गळा खाकरणे किंवा खोकणे, याने तो अडकलेला कफही बाहेर निघतो, बाहेर टाकला जातो. वसंत ऋतूमध्ये विशेषतः कफाचे निष्कासन अधिक प्रमाणात होऊ लागते. जसा ऊन, उष्णता, गरमी लागल्यावर बर्फ वितळू लागतो, जसे हिमालयातील बर्फ वितळून या काळात नद्या वाहू लागतात, तसेच काहीसे शरीरातही होत असते. थंडीत शरीरामध्ये दुषित कफ साठला जातो, शिजतो. वसंत ऋतूच्या आगमनाने जसजशी उष्णता वाढू लागते, तसतसा कफ सुटू लागतो. परिणामी, खोकल्याची उबळ अधिक येते. याचबरोबर काही श्वसन संस्थांच्या व्याधी आहेत. ज्यात खोकला हेही एक महत्त्वाचे लक्षण आहे. जसा डांग्या खोकला, निमोनिया, दमा,  इ.
 
‘सकफ कास’ हा कफाच्या विकृतीमुळे होतो व ‘शुष्क कास’ हा वाताच्या दृष्टीमुळे होतो. थोडक्यात काय, तर ‘कास खोकला’ हा तान्हुल्यापासून वृद्धांपर्यंत कोणालाही येतो. काही वेळेस तो तात्पुरता असतो, तर काही वेळेस अन्य व्याधींचे ते लक्षण असते. खोकल्यावर वेळीच चिकित्सा करावी लागते. शुष्क कासाची उबळ विशेष वेळेत (ठराविक वेळेत) अधिक येते, जसे रात्री झोपताना किंवा पहाटे. अन्ननलिकेत अन्न अडकले तर जेवताना ठसका व खोकला लागतो. घराबाहेर चालताचालता शिंका किंवा/आणि खोकला आला, तर गळ्यात, नाकात काही धूळ/रजःकण गेल्यामुळे खोकला आला, असे होऊ शकते. पण, अति खोकल्यामुळे पोट दुखणे, पोटाच्या दोन्ही बाजूंना कळ येणे, मूत्र प्रवृत्ती थेंबभर किंवा थोडी अधिक होणे. खोकल्याची उबळ असल्यास श्वास अपुरा पडू शकतो.
 
तेव्हा तात्कालिक दम लागल्यासारखे होऊ शकते. चेहरा लालबूंद होऊ शकतो. क्वचित प्रसंगी उलटी होते. खूप खोकल्यावर घाम येतो. डोके-घसा दुखू शकतो आणि अवेळी खोकल्यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो.त्यामुळे खोकल्याकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळेस प्रवासात असतेवेळी, कामाच्या ठिकाणी असताना, महत्त्वाची बैठक इ. असताना किंवा स्वयंपाक करतेवेळी खोकला आला, तर तो थांबविण्याचा प्रयत्न केला जातो. हे करणे म्हणजे कास या वेगाचे धारण करणे होय. हे करणे टाळावे. जर टाळले नाही, म्हणजे खोकला खोकल्याची उबळ थांबविली, रोखली, तर त्याचे रुपांतर इतर आजारांमध्ये होऊ शकते. जसे दम लागणे, जेवणावरची इच्छा जाणे, जेवणात रस न राहणे, हृदयाची विकृती उत्पन्न होणे. क्वचित प्रसंगी खोकल्याचे रुपांतर उचकी किंवा शिंक यांत होते. जेवताना असे झाले, तर अन्नकण अन्ननलिकेतून श्वासनलिकेत जाऊ शकतात. हे होणे टाळावे. खोकला हा वेग थांबविला, तर (वारंवार झाल्यास) शरीर खंगू लागते.
 
हा भार सर्व यंत्रणांमध्ये मध्ये बिघाड उत्पन्न करु शकतो. आयुर्वेदात असेही सांगितले आहे की, कास हा वेग जर रोखला (वारंवार) तर वृषण प्रदेशी शोथ (सूज) व अन्य आजार होऊ शकतात. अन्य ही सार्वदैहिक लक्षणे या एका अधारणीय शारीरिक वेगाच्या धारणाने होऊ शकतात. तेव्हा जे शारीरिक वेग, संवेदना आहेत, त्यांचे वेळीच निष्कासन करणे इष्ट! (क्रमश:)
 
वैद्य कीर्ती देव  
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
अग्रलेख
जरुर वाचा
बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका

बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका

वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असूनही पश्चिम बंगालमध्ये त्या विरोधात हिंसाचार सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात इस्लामिक कट्टरपंथींचा उन्मात शिगेला पोहोचला. हिंदूंना लक्ष्य करून कट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार टीका केली आहे. त्या राज्यात जातीय तेढ पसरवत असून बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Mithun Chakraborty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121