मुंबई : बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी श्रद्धा कपूर हे एक महत्त्वाचं नाव मानलं जातं. 'तीन पत्ती'मधून पदार्पण केल्यानंतर तिने अनेक गाजलेले चित्रपट दिले असून, 'स्त्री' आणि 'स्त्री २' या दोन्ही चित्रपटांमधून तिच्या अभिनयाला विशेष दाद मिळाली. मात्र अलीकडेच या चित्रपटाच्या दिग्दर्शक अमर कौशिक यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे श्रद्धा चर्चेत आली होती.
एका मुलाखतीत अमर कौशिक यांनी श्रद्धाच्या हास्याची तुलना चेटकीणशी केली. ''श्रद्धा अगदी 'स्त्री'सारखी हसते, म्हणजेच चेटकीणसारखी,'' असं म्हणत त्यांनी हसत-हसत एक किस्सा सांगितला. हा मजकूर कोमल नाहटा यांच्या कार्यक्रमात समोर आला. हा भाग व्हायरल होताच अनेकांनी अमरवर टीकेची झोड उठवली. अनेकांनी या वक्तव्याला श्रद्धाचा अनादर असल्याचं म्हटलं आणि सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
यावर अमर कौशिक यांनी स्पष्टीकरण देत परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच 'मॅडॉक फिल्म्स'च्या २० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अमर व श्रद्धा पुन्हा एकत्र दिसले. यावेळी अमरने सर्वांसमोर श्रद्धाची माफी मागितली. त्यांनी कान पकडत आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. या क्षणाचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या साऱ्या गोंधळानंतरही श्रद्धा आणि अमर यांच्यातील मैत्रीवर कुठलाही परिणाम झालेला नाही, असं या व्हिडीओवरून स्पष्ट होते.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.