( babasaheb ambedkar legacy ) दुर्गम भागांत सेवेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी कार्यरत, संविधानजागृतीचा वसा घेतलेले मुंबईतील डॉ. सुधाकर शिंदे यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
सखाराम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाहिले होते. सुटाबुटातले देखणे साहेब, त्यांच्या भोवताली जमलेला समाज, समाजाला धीर देत त्यांना परिस्थितीवर मात करायला प्रेरणा देणारे साहेब पाहून सखाराम यांनी ठरवले की, ‘मी जरी अंगठाबहाद्दर असलो, तरी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या लेकरांना शिकवणार.’ त्यांनी घेतलेला वसा टाकला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवले. त्यांचा मुलगा कोंडाजी मात्र घरची शेती करू लागला. त्यांनीही सखाराम यांनी घेतलेला वसा टाकला नाही. त्यांनीच नव्हे, तर त्यांच्या भाऊबंदांनीही जीवाचे रान केले आणि पुढची पिढी शिक्षित झाली. त्या पुढच्या पिढीतलेच कोंडाजी यांचे सुपुत्र डॉ. सुधाकर शिंदे. ‘एमबीबीएस’, ‘डिप्लोमा इन अॅनेस्थिया’, ‘एमडी अॅनेस्थिया’ असे उच्च शिक्षण घेणारे सुधाकर हे अत्यंत समाजशील आहेत.
या समाजशीलतेतूनच ते पूर्वी ‘डॉ. आंबेडकर मेडिको असोसिएशन’चे अध्यक्ष होते, तर सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या ‘अशोक सेवा मंडळ’ या वसतिगृहाचे अध्यक्ष आहेत. तसेच त्यांची ‘सम्यक मेडिकर अॅण्ड सोशल चॅरिटेबल ट्रस्ट’चेही अध्यक्ष आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून ते दुर्गम भागांत आरोग्य शिबिरांचे आयोजन करतात. सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी साहाय्य करतात. सुधाकर यांच्या आयुष्याला प्रेरणा देणारे जर काही असेल, तर ते आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरच! बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा सामाजिक न्याय आपल्या प्रत्येक कृतीत आणि विचारांमध्ये असावा, यावर सुधाकर यांचा कटाक्ष असतो.
त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये ग्रामीण भागांत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर म्हणून सेवा केली. हे करताना समाजातले आरोग्याचे प्रश्न त्यासंदर्भातील अज्ञान-अंधश्रद्धा त्यांनी जवळून अनुभवली. या सगळ्यांसाठी आपण काम करायलाच हवे, हा निर्धार त्यांनी केला. त्या निर्धारानुसाराच ते आजही कार्यरत आहेत, तर सुधाकर आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग सांगताना म्हणतात, “मी जे. जे. रुग्णालयात ‘एमडी’चे शिक्षण घेत होतो, तेव्हा डॉ. बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर त्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होत्या. मला माईसाहेबांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्याला प्रमाण मानून, त्यासाठी निष्ठेने आरोग्यसेवेत कार्य करणारे डॉ. सुधाकार शिंदे, त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊया.
शिंदे कुटुंब मुळचे अहिल्यानगर येथील लहितखुर्द गावचे. त्यांचे बाबा कोंडाजी हे शेती करत, तर आई लक्ष्मीबाई या गृहिणी. उभयतांना सहा मुले. त्यांपैकी एक सुधाकर. कोंडाजी शेती करत; मात्र उत्पन्न नावालाही येत नसे. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल. त्या प्रतिकूलतेमध्येही सुधाकर यांच्या आजोबांनी मुलांना उच्चशिक्षित करायचे हे स्वप्न पाहिलेले. त्यामुळे सुधाकर यांनीही ठरवलेले की, आपण शिकून मोठे व्हायचे. मात्र, गावात सहावीपर्यंतच शाळा. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी दुसर्या गावी वसतिगृहात राहू लागले. वसतिगृहाचे वातावरण म्हणजे हलाखीचेच दैनंदिन जगणे होते.
आईबाबांपासून पहिल्यांदाच दूर इथे आल्यामुळे सुरुवातीला या सगळ्यांशी जमवून घेताना त्यांना त्रास झाला. पण, कितीही त्रास झाला तरी शिकायचेच, हे त्यांनी ठरवले होते. त्यानंतर दुसर्या वर्षी मग बाबुराव काकांनी त्यांना घरी आणले. काका-काकूंनी खूप जीव लावला. पुढे शिकण्यासाठी ते हरिश्चंद्र काकांकडे मुंबईला आले. तिथे वैद्यकीय शिक्षण सुरू केले. ‘जगण्यासाठी दाही दिशा’ ही म्हण आहे, मात्र सुधाकर यांनी ‘शिक्षणासाठी दाही दिशा’ शोधल्या. शिक्षणासाठी वाटेल ते कष्ट करायची तयारी ठेवली.
‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत असतानाच, त्यांना जातीय विषमतेच्या चटक्यांना तोंड द्यावे लागले. त्याच काळात त्यांचा संबंध ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिको असोसिएशन’शी आला. या माध्यमातून ते समाजातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य-हक्कांसाठी काम करू लागले. पुढे वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रशासनात काम करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी ‘एमडी’चे शिक्षण पूर्ण केले. तसेच ‘एमपीएससी’ची परीक्षा देऊन आरोग्य क्षेत्रात उच्च पदावर काम करण्याची संधी मिळवली. या सगळ्या प्रवासात त्यांची पत्नी डॉ. नंदा यांची त्यांना मोलाची साथ आहे. कोरोना काळात ते उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयाची जबाबदारी सांभाळत होते.
त्यावेळी सरकारी रुग्णालयाचे रुपांतर ‘कोविड सेंटर’मध्ये केले जात होते. सगळीच रुग्णालये ‘कोविड सेंटर्स’ झाली, तर इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना आरोग्यसेवा कोण देणार, असे सुधाकर यांचे मत. त्यामुळे त्यांनी ते ज्या रुग्णालयात अधिकारी होते, त्या रुग्णालयाचे रुपांतर ‘कोविड रुग्णालया’त होऊ दिले नाही. या रुग्णालयाच्या माध्यमातून लोकसेवा करत राहिले. त्यांनाही ‘कोविड’ने गाठले, पण ते डगमगले नाही. बरे झाल्यानंतर पुन्हा सेवेत रूजू झाले. तर असे हे डॉ. सुधाकर शिंदे म्हणतात, “दुर्गम क्षेत्रांत आरोग्यसेवा पुरवणे हे आव्हान आहे. त्यासाठी दुर्गम भागांत वैद्यकीय महाविद्यालय उभारायचे आहे. तसेच आरोग्यसेवेपासून कोणीही वंचित राहू नये, या ध्येयाने शेवटपर्यंत काम करत राहणार.” डॉ. बाबासाहेबांच्या समाजनिष्ठ विचारांचा वारसा आरोग्य क्षेत्रात जपणारे डॉ. सुधाकर शिंदे यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
9594969638