accumulation God grace
याकारणें गा तुवां इया।
सर्व कर्मा आपुलिया।
माझ्या स्वरूपीं धनंजया।
संन्यासु कीजे॥
अर्जुना, या कारणास्तव आपली सर्व कर्मे तू माझ्या स्वरूपी अर्पण कर॥18-1260॥
परी तोचि संन्यासु वीरा।
करणीयेचा झणें करा।
आत्मविवेकीं धरा। चित्तवृत्ति हे॥
(ज्ञानेश्वरी अध्याय-18 श्लोक-1261॥)
अर्थ : हे वीरा अर्जुना, परंतु तो त्याग कदाचित तू कृत्रिम करशील, तर तसे करू नकोस हो. तर तो संन्यास असा कर की कर्म करीत असताना तू आपली चित्तवृत्ति आत्मविचाराकडे लाव.॥18-1261॥
आपल्या ध्यानावरील लेखात ‘मी कोण?’ या प्रश्नावर आपण विवेचन वाचले आहे. तो विचार मनात धारण करून एकाग्र होणे म्हणजे धारणा व त्या धारणेतून ध्यानात चित्त तदाकार होणे, तोच आत्मविचार.
समाधीचे पंचमहाभूतात्मक प्रकार
आपला देह हा पंचमहाभूतात्मक आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या मिश्रणाने बनलेला आहे. ते अत्यंत बलशाली आहेत. म्हणून मृत्यूनंतर साधारण मनुष्याचा मृतदेह यातल्या कोणत्यातरी एका तत्त्वाकडे, आपापल्या धार्मिक नियमानुसार सुपूर्द केला जातो. पण, आत्मविचारात एकरूप झालेल्या प्रगत व्यक्ती जिवंत असतानाच या पंचमहाभूतांपैकी एका महाभूतात आपला देह विलीन करतात व ज्या तत्त्वात ते विलीन होतात, त्या तत्त्वानुसार त्या समाधीचा प्रकार ठरतो व आत्मरुपात ते तेथे जनसामान्यांना आत्मबोध देण्यासाठी असतात. आपण सांसारिक गोष्टी सांगत राहातो, तो आपला दोष. श्रद्धावानांना तेथे त्यांचे दर्शन होते. (अतिचिकित्सक व्यक्तींना नाही). याच संदर्भातून दत्तावतारी स्वामी समर्थ म्हणतात, ‘तू भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,’ योगिक संकल्पनेप्रमाणे दत्तात्रयांचे स्थान आपल्या पाठीच्या खालच्या मणक्याच्या ठिकाणी मूलाधार चक्रात आहे आणि स्वामी समर्थ ‘स्मर्तूगामी’ म्हणजे ‘जो त्यांचे स्मरण करेल, त्याच्या पाठीशी’ असा त्याच्या वचनांचा अर्थ घ्यावा.
आपण इतिहासात बघतो सजीव भूमीमध्ये प्रवेश करून घेतली जाते, ती भू-समाधी. श्री संत ज्ञानेश्वरांनी व इतिहासातील अनेक संतमहात्म्यांनी अशी संजीवन समाधी घेतली. श्री प्रभू रामचंद्रांनी व एकनाथासारख्या संतमहात्म्यांनी नदीपात्रात प्रवेश करून जलसमाधी घेतली. ‘मनशक्ती प्रयोग केंद्र’ लोणावळ्याचे आद्यप्रवर्तक विज्ञाननिष्ठ स्वामी विज्ञानानंद यांनी प्रकाश समाधी घेतली.
श्रीकृष्णाने आपला देह योगमायेने वैकुंठाला नेला, त्यात वायूचा संबंध असावा. त्यास बघण्यासाठी शंकरासह स्वर्गलोकीचे सर्व देव आले असता, त्यांनापण ते कळाले नाही. कारण, वायू हा दिसत नाही, जाणवतो. ती वायूसमाधी म्हणता येईल. त्याचा उल्लेख चौदा श्लोकीमध्ये स्पष्टपणे केलेला आढळतो.
सौदामन्या यथाऽऽकाशे,
यान्त्या हित्वाऽभ्रमण्डलम्। गतिर्न लक्ष्यते मर्त्यैस्तथा
कृष्णस्य दैवतैः॥
चौदा श्लोकी-श्लोक 9
यावर संत एकनाथांचे टिपण :
वीज तळपे अभ्रमंडळीं।
ते कोठोनि आली कोठें गेली।
गति नरां न लक्षे भूतळीं।
तैशी श्रीकृष्णगति जाहली
दुर्गम देवां॥85॥
वीज सकळ मनुष्यें देखती।
परी न कळे येती जाती गती।
तेवीं श्रीकृष्णाची अवतारशक्ती।
न कळे निश्चितीं देवांसी॥86॥
तेथूनिया येथें येणें।
कां येथूनिया तेथें जाणें।
हें नाहीं श्रीकृष्णास करणें। तो सर्वत्र पूर्णपणें परिपूर्ण सदा॥87॥
द्यावया आकाशासी बिढार।
सर्वथा रितें न मिळे घर।
तेवीं श्रीकृष्ण परमात्मा सर्वत्र। गत्यंतर त्या नाहीं॥88॥
ऐसा श्रीकृष्ण गेला निजधामा। परमाद्भुत ज्याचा महिमा।
अलक्ष्य लक्षेना कृष्णगरिमा।जाणोनि स्वाश्रमा निघाले देव॥89॥
एकनाथी भागवत॥ अध्याय-31 (चौदा श्लोकी-श्लोक 9)
जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे आकाशमार्गाने वैकुंठाला गेले, असे म्हणतात. त्यांनी आकाशतत्त्वाशी एकरुपता साधली, असे म्हणता येईल, ती आकाशसमाधी. अशा त्या त्या महात्म्यांच्या वेगवेगळ्या तत्त्वांशी विलीनीकरणांच्या कथा आपण इतिहासात पाहातो.
आपण यातून काय बोध घ्यायचा, तर सर्व पंचमहाभूतांकडे आदराने बघा. आपल्या प्रकृतीनुसार स्वभावधर्मानुसार आपल्या इष्ट देवतेच्या, गुरूंच्या आज्ञेनुसार ध्यानाद्वारे कोणत्याही एका विशिष्ट तत्त्वाशी जवळीक साधून त्यात देह विलीन करण्याची मनाची तयारी ठेवून आत्मविचाराच्या आनंदात देह सोडणे, म्हणजे मुक्ती किंवा पुढचा प्रवास ईश्वरार्पण करून त्याच्या इच्छेनुसार घडू देणे, म्हणजे ‘योगभ्रष्ट’ या पदवीला जीव पोहोचतो व पुढील मार्ग ईश्वरप्रेरणेने मिळतो. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
प्राप्य पुण्यकृतां
लोकानुषित्वा शाश्वतीः समाः।
शुचीनां श्रीमतां गेहे
योगभ्रष्टोऽभिजायते॥
भगववरदसशशता
(अध्याय 6 श्लोक-41)
अर्थ : योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणार्या लोकांना अर्थात स्वर्गादि उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणार्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो.
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां।
तो जाला सोहळा अनुपम्य॥1॥
आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग जाला॥ध्रु.॥
(1458 ॥ सार्थ तुकारामगाथा जगद्गुरू संत तुकाराम महाराज)
एकदेशीं होतों अहंकारें आथिला। त्याचा त्यागें जाला सुकाळ हा॥2॥
फिटलें सुतक जन्ममरणाचें।
मी माझ्या संकोचें दुरी जालों॥3॥
नारायणें दिला वस्तीस ठाव।
ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥4॥
तुका म्हणे दिलें उमटोनि जगीं। घेतलें तें अंगीं लावूनियां॥5॥
अर्थ : मी माझ्या स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले व तो सोहळा फारच अनुपम्य आहे. त्रिभुवनामध्ये आनंद दाटला गेला आहे आणि सर्वत्र आत्मभाव निर्माण झाल्यामुळे आनंदाचा भोग प्राप्त झाला आहे. माझ्या ठिकाणी देहाभिमान निर्माण झाला. त्यामुळे मी संकुचित झालो होतो, आता देहाभिमानाचा त्याग केल्यामुळे सर्वत्र सुकाळ झाला आहे. आता जन्म-मरणाचे सुतक फिटले. मी माझ्या संकुचित बुद्धीमुळे हरीपासून दूर झालो होतो. पण, नारायणानेच त्याच्या ठिकाणी आश्रय दिला व मी माझा भक्तिभाव नारायणाच्या चरणावर श्रद्धा ठेवून राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या परमार्थिक मरणाचा प्रकार आपल्या अंगी लावून घेतला व अनुभवला आहे; मगच या सर्व जगाला माझा अनुभव मी सांगत आहे.
बोध : आपण या पायरीला जाण्यासाठी यम-नियमांचे पालन करून प्रत्याहार आणि ईश्वरप्रणिधानात आपण 100 टक्के उत्तीर्ण होतो अथवा नाही, शरणागती कितपत पत्करतो, यावर सर्व अवलंबून आहे.
म्हणून योग शिकताना ईश्वरावर नितांत श्रद्धा असणे गरजेचे आहे.
हरि ओम्! इति अष्टांग योग।
डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
9730014665