मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्याप्रमाणे जगातील तब्बल ७० देशांवर आयातशुल्क लागू झाले आहे. या देशांमध्ये भारताचाही समावेश असल्यामुळे भारतावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार आपण करणे महत्त्वाचे ठरते. या आयातशुल्क वाढीमुळे येणार्या काळात भारतावर काय परिणाम होणार, त्यातूनही भारताला कशा संधी निर्माण होऊ शकतात, याच विषयावर माजी मुख्य आयकर आयुक्त आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, पर्यावरण विषयांच्या अभ्यासक संगीता गोडबोले यांच्याशी साधलेला विशेष संवाद.
अमेरिकेने हे आयातशुल्क का लादले आहे?
आयातशुल्क लादले गेले आहे, याचे कारण म्हणजे आताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला नुकसानीपासून वाचवण्यासाठी उगारलेले अस्त्र आहे. त्यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या मोहिमेचा हा भाग आहे. त्यांच्या मतानुसार अमेरिकेचा फायदा आतापर्यंत सगळ्यांनी घेतला, आता आम्हाला अमेरिकेला मोठं करायचं आहे, यासाठी त्यांनी उचललेलं हे पाऊल आहे. ही घटना ‘न भूतो’ अशी म्हणता येईल, परंतु ‘भविष्यति’ असे म्हणता येणार नाही,कारण ट्रम्प यांची सर्वच कार्यपद्धती ही बेभरवशी आहे. असे दिसत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेला यातून काय फायदे-तोटे असू शकतात?
अमेरिकेने हे आयातशुल्क लादताना भारतातील, सेमीकंडक्टर, तांबे, ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित गोष्टींवर, फार्मा क्षेत्र यांवर अद्याप आयातशुल्क लादलेले नाही. भारतावरच नाही, तर भारताच्या शेजारी देशांवरही अमेरिकेने आयातशुल्क लादले आहे. यात बांगलादेश, मलेशिया, कंबोडिया यांसारख्या भारताच्या शेजारील देशांवरही आयातशुल्क लादले गेले आहे. याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. जसे की, भारतावर तुलनेने कमी आयातशुल्क आहे, परंतु बांगलादेशातील कापड उद्योगावर जास्त आयातशुल्क आहे. तर त्याचा फायदा भारताला उठवता येऊ शकतो. परंतु, भारताने त्यांच्या इतकी उत्पादनवाढीची क्षमता दाखवली पाहिजे. त्यासाठी तयारी आवश्यक आहे, तरच भारताला याचा फायदा घेता येऊ शकतो.
भारत या स्थितीचा फायदा घेण्यासाठी अमेरिकाकेंद्रित उत्पादनांची निर्यात वाढवून फायदा घेऊ शकतो का? त्यासाठी ‘पीएलआय’सारख्या योजनांचा आधार घेता येऊ शकतो का?
भारत हे नक्कीच करु शकतो, त्याचा आयफोननिर्मितीसारख्या वस्तूंच्या निर्यातीत फायदादेखील झाला आहे. परंतु, एवढ्यावरच समाधान न मानता भारताने याचा फायदा करुन घेत या क्षेत्रातील उद्योगांची क्षमता वाढवली, तर जास्त चांगले होईल. आपल्याकडे निर्माण होणार्या स्टार्टअपची क्षेत्रे बघितली, तरी काही क्षेत्रांपुरतीच मर्यादित राहिलेली दिसतात. परंतु, नावीन्यतेला प्रोत्साहन देणारी अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे काम करण्यासाठी भारतीयांनी पुढे आले पाहिजे. जेणेकरुन तीही क्षेत्रे भारतासाठी खुली होतील. भारताने या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मला वाटते.
या परिस्थितीत भारताला कुठल्या क्षेत्रांत संधी आहे, असं आपल्याला वाटतं?
भारताला या आयातशुल्कवाढीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पहिलं क्षेत्र म्हणजे शेती. शेती क्षेत्राला यापुढील काळात मागणी येऊ शकते, तर त्या क्षेत्राला त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी भारत सरकारने या क्षेत्रात गुंतवणूक केली पाहिजे. शेती क्षेत्रातील अनावश्यक गोष्टी म्हणजे खतांचा अनावश्यक वापर यांसारख्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत. नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याबरोबरच या क्षेत्रातील लॉजिस्टिक्स, साठवण क्षमता यासर्वच गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे. दुसरे क्षेत्र म्हणजे कापड उद्योग. हा उद्योग भारताची शतकानुशतकाची ओळख आहे, परंतु मध्यंतरीच्या काळात थोडे हे क्षेत्र मागे पडले होते. तरी आता त्याला उभारी येण्यासाठी भरपूर वाव तयार झाला आहे. त्यामुळे त्याचा फायदा भारताने करून घेतला पाहिजे. त्यानंतरचे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातही भारताला येत्या काळात मोठा वाव निर्माण होऊ शकतो. परंतु, परत या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ यांच्यावर काम करणे गरजेचे आहे, हे नक्की नमूद करायला हवे.
यापुढील काळात बदलत्या आर्थिक, राजकीय वास्तवात भारताला आपले प्रभावक्षेत्र तयार करण्यासाठी कुठल्या संधी उपलब्ध आहेत आणि कुठल्या क्षेत्रांवर भारताने लक्ष केंद्रित करायला हवं?
भारताने विचार केला, तर सर्वात पहिले जिथे भारताचे वर्चस्व, प्रभावक्षेत्र सहज निर्माण होऊ शकतं, अशा ‘बिमस्टेक’, ‘सार्क’ या दोन महत्त्वाच्या मंचांचा वापर चालू करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. इथे भारताचे स्वतःचे क्षेत्र होऊ शकते. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ब्रिक्स’ या मंचावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे. हा मंच भारताचा प्रभाव विस्तारायला मदत करू शकतो. अमेरिकेसोबत आपला प्रभाव तयार करायचा असेल, तर या मंचाचा वापर करणे गरजेचे आहे.
आता यापुढील समीकरणांत भारताचे स्थान कसे असेल?
भारत आजही जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकिक कायम राखेल. भारताला या पुढील काळात अनेक संधी उपलब्ध होतील आणि भारताचे आजचे नेतृत्व हे देशाला प्राधान्य देणारे आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली भारत नक्कीच वेगाने प्रगती करेल.