सर्वच क्षेत्रांमध्ये वाढीचा धडाका, निफ्टीमध्येही नुकसान भरपाई
08-Apr-2025
Total Views | 7
मुंबई : सोमवारी शेअर बाजाराच्या जवळपास ३००० अंशांनी झालेल्या पतनानंतर मंगळवारी शेअर बाजाराने झोकात पुनरागमन केले आहे. तब्बल १००० अंशांची उसळी घेत शेअर बाजाराने पुन्हा एकदा गुंतवणुकादारांचा विश्वास परत मिळवला आहे. अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या आयातशुल्कवाढीमुळे होणाऱ्या परिणामांची टांगती तलवार असताना त्यातून चीनकडून त्याला दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरामुळेही जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. या वातावरणातही भारतीय शेअर बाजाराने घेतलेली उसळी लक्षवेधी ठरते आहे.
भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी १०८९ अंशांनी उसळी घेत ७४,२२७ अंशांची पातळी गाठली. निफ्टीमध्येही ३७४ अंशांची उसळी घेतली, २२, ५३५ अंशांवर निर्देशांक स्थिरावला. यामुळे भारतीय गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. क्षेत्रवार बघायला गेले तर वित्तीय सेवा कंपन्या, एफएमसीजी, आयटी, सरकारी बँका, वाहननिर्मिती, गृहबांधणी या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वधारले. आशियाई बाजारातही जोरदार वाढ दिसून आली. जपानच्या शेअर बाजाराने ६ टक्क्यांची उसळी घेतली. शांघायच्या शेअर बाजाराने १.५८ टक्क्यांची वाढ झाली. हाँगकाँग शेअर बाजारानेही १.५१ टक्क्यांची उसळी घेतली आहे.
जवळपास सर्वच प्रमुख क्षेत्रांत वाढ झाल्याचे चित्र मंगळवारी बाजारात बघायला मिळाले. यासर्व पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून अनुकुल मतं व्यक्त केली गेली आहेत. अमेरिकेकडून लादण्यात आले असले तरी आता अमेरिकेशी द्वीपक्षीय करारांसाठी देश पुढे सरसावत आहेत यामुळे या आयातशुल्काचा प्रभाव कमी होऊ शकतो. याच बरोबरीने सर्वच देश आपल्या देशांतर्गत बाजारपेठा सशक्त करण्याकडे लक्ष देत आहेत, यासर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विविध देशांतील शेअर बाजार सावरत आहेत. असे मत शेअर बाजार तज्ज्ञांकडून नोंदवलं गेलं आहे.