मुंबईत पाणीटंचाई वाढणार! १० एप्रिलपासून पाणी टँकर बंद; काय आहे कारण?
08-Apr-2025
Total Views | 16
मुंबई : भर उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॉटर टँकर असोसिएशनने १० एप्रिलपासून वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा इशारा दिल्यामुळे मुंबईत पाण्याचे संकट येणार आहे.
नेमकं कारण काय?
मुंबई महापालिकेकडून विहीर आणि बोअरवेल मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये विहीर आणि बोअरवेल मालकांना एनओसी घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच एनओसी न घेतल्यास पाणीपुरवठा बंद होईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, विहीर आणि बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे १० एप्रिलपासून वॉटर टँकर असोसिएशनने संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा ३३ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. त्यात आता मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील अनेक भागांतील लोकांना वॉटर टँकरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मुंबईकरांपुढे सध्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मंत्री आशिष शेलार यांचे पत्र
मुंबईतील पाणी समस्या टाळण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. दरम्यान, आता मुंबईकरांची ही पाणी समस्या सोडवण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.