( Mananand or Dhananand ) पैशाने आनंद विकत घेता येत नाही, ही उक्ती आपण अगदी लहानपणापासूनच ऐकलेली. पण, तरीही शिक्षण, नोकरी-व्यवसाय हे सगळे शेवटी पैशासाठी अन् पोटासाठी! मग माणसाने नेमके जगावे तरी कशासाठी? धनानंदासाठी की मनानंदासाठी? या द्वंद्वाच्या मनोवाटा उलगडणारा हा लेख...
जच्या युगात पैसा ही माणसाच्या जीवनाची अपरिहार्य गरज. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गोष्टींसाठी पैसा लागतोच. पण, यापलीकडे जाऊन एक प्रश्न आपण वारंवार विचारतो, पैसा आणि आनंद यांचे नाते नेमके काय? आणि खरेच किती पैसा मिळाल्यावर माणूस स्वतःला ‘आता पुरेसा झाला’ म्हणू शकतो? सर्वप्रथम हे मान्य करायला हवे की, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसा माणसाच्या जीवनातील ताणतणाव कमी करतो, सुरक्षिततेची भावना देतो आणि मूलभूत गरजांची पूर्तता करतो.
परंतु, संशोधन असे सांगते की, एकदा गरजा भागल्या की त्यानंतर पैसा आनंद वाढवतोच, असे नाही. उलट, अधिक पैसे मिळवण्याच्या शर्यतीत अनेकदा माणूस आनंद गमावतो. ‘ये दिल मांगे मोअर’ अशी काहीशी माणसाची मनःस्थिती होते. त्यात गांभीर्य किती आहे, हे सांगता येत नाही. आपल्याला फक्त जास्त हवे आहे, असे नाही, तर आपल्याला इतरांपेक्षा जास्त हवे आहे. त्याचवेळी ‘त्या इतरांना आपल्यापेक्षा जास्त हवे आहे’ ही एक अंतहीन शर्यत आहे. पैशाने तुम्हाला आनंद विकत घेता येत नाही, परंतु पैशाचा अभाव तुम्हाला नक्कीच दुःख विकत देतो. पैसा आणि आनंद या तशा दोन वेगळ्या संकल्पना म्हणून पाहिल्या जातात. परंतु, बरेच लोक मानतात की, भले त्या वेगळ्या संकल्पना असल्या, तरी त्या एकमेकांशी खोलवर जोडलेल्या आहेत. भांडवलशाही गरजांच्या या अंतहीन विस्तारावरच आधारित आहे.
म्हणूनच, सर्व यशानंतरही ती इतकी अप्रिय राहिली आहे. तिने आपल्याला मोजमापापेक्षा जास्त संपत्ती दिली आहे. परंतु, संपत्तीचा मुख्य हेतू, म्हणजे पुरेसे असण्याची जाणीव हिरावून घेतली आहे. पैशाचा सुज्ञपणे वापर केल्यास, ते आनंदी, अधिक परिपूर्ण जीवनात कसे योगदान देऊ शकते, हे शेवटी विचार करण्यासारखे आहे.
पुरेसा पैसा ही संकल्पना व्यक्तिनिहाय बदलते. काहींसाठी महिन्याला एक ठराविक पगाराची व उत्पन्नाची रक्कम पुरेशी असते, तर काहींसाठी त्याहून कितीतरी अधिक असूनही समाधान मिळत नाही. याचे कारण आपल्या अपेक्षा, जीवनशैली आणि समाजातील इतरांशी होणारी तुलना असू शकते. सोशल मीडियावर इतरांचे यश पाहून आपल्यालाही अधिक मिळवायची धडपड सुरू होते. अशावेळी ‘पुरेसा’ हा शब्द कधीच गाठता येत नाही. भौतिक वस्तूंचा आनंद तात्पुरता असतो, पण अनुभवांमधून मिळणारे समाधान दीर्घकाळ टिकते. एका अभ्यासानुसार, सहली, कुटुंबासोबतचे क्षण, समाजकार्य, नवीन कौशल्ये शिकणे या सार्या गोष्टी माणसाला जास्त आनंद देतात. यामुळे पैसा खर्च करण्याची मूलभूत पद्धत, हीसुद्धा आनंदावर प्रभाव टाकते. ज्यांच्याकडे कृतज्ञतेची भावना असते, ते लोक आपल्या वर्तमान परिस्थितीतही आनंदी राहतात, तर काहीजण भरपूर संपत्ती असूनही असमाधानी असतात. यामागे मानसिकतेचा मोठा वाटा असतो. जे आहे त्यात समाधान मानणे, ही सवय माणसाला आनंद देऊ शकते.
फक्त पैसा कमावण्याच्या नादात आपण आपले ध्येय, मूल्ये आणि नाती विसरत असतो. कोणताही व्यवसाय, नोकरी, कौटुंबिक जबाबदारी, जर ती हेतुपूर्ण आणि मनापासून केली, तर त्यातून मिळणारे समाधान खूप खोल असते. माणूस केवळ स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठीही काही करतो. तेव्हा त्याला खरी आनंदाची अनुभूती मिळते. श्रीमंत माणूस कधीकधी अमाप पैसा असलेला गरीब माणूस असतो; कारण आनंद हा केवळ पैशाच्या ताब्यामध्ये नाही, तो यशाच्या आनंदात, सर्जनशील प्रयत्नांच्या थरारात आहे. रतन टाटा (ज्यांनी उदार मनाने संपत्ती दान केली आहे, नुसती साचवून ठेवलेली नाही) याचे एक उत्तम उदाहरण आहेत. भांडवलशाही गरजांच्या या अंतहीन विस्तारावरच आधारित आहे. म्हणूनच, त्याच्या सर्व यशानंतरही ती इतकी अप्रिय राहिली आहे. तिने आपल्याला मोजमापापेक्षा जास्त संपत्ती दिली आहे. परंतु, संपत्तीचा मुख्य हेतू म्हणजे पुरेसे असण्याची जाणीव हिरावून घेतली आहे.
अत्यंत कमी उत्पन्नामुळे येणारी चिंता आणि ताण हा एक सामाजिक प्रश्न आहे. पण, दुसरीकडे अत्यंत श्रीमंतीसुद्धा वेगळ्या स्वरूपात तणाव निर्माण करू शकते. स्पर्धा, तुलना, यश टिकवून ठेवण्याचा दबाव, विश्वासू संबंधांचा अभाव इत्यादी. आपण कित्येक उद्योगपतींनी आत्महत्या केल्याचे, निराशेच्या गर्तेत गेल्याचे पहिले आहे. यासाठी आवश्यक आहे, एक संतुलित दृष्टिकोन.
किती पुरेसे? :
स्वतःला विचारण्याचा प्रश्न
हा प्रश्न प्रत्येकाच्या जीवनशैली, मूल्ये, जबाबदार्या आणि आनंदाच्या कल्पनांवर आधारित असतो. काही प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो :
माझ्या गरजा आणि थोड्याशा इच्छांसाठी किती उत्पन्न पुरेसे आहे?
मी जास्त कमाईसाठी, संपत्तीच्या नादात कोणत्या गोष्टी गमावत आहे? वेळ, आरोग्य, नाती?
माझ्या निर्णयांवर भीती आणि तुलना परिणाम करत आहेत का?
मी स्वतःला आनंदी समजतो का?
पैसा आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, हे नाकारता येणार नाही. पण, केवळ पैसा मिळवण्यामध्येच आनंद नाही, तो आपल्या नात्यांमध्ये, अनुभवांमध्ये, आरोग्यामध्ये आणि समाजाशी असलेल्या जोडणीत असतो. मग ‘किती पुरेसे?’ हा प्रश्न बाहेरून नाही, तर आपल्याच मनात उत्तर शोधणारा आहे.
म्हणूनच, पैसे मिळवा, पण त्यासाठी स्वतःचा आनंद गमावू नका. आनंदाची व्याख्या केवळ बँक खात्यातील शून्यांमध्ये नाही, तर आपण जगत असलेल्या प्रत्येक क्षणात आहे आणि शेवटी, पुरेसा पैसा म्हणजे जो आपल्याला अर्थपूर्ण, समाधानकारक आणि शांत आयुष्य जगण्यास मदत करतो, एवढाच!
डॉ शुभांगी पारकर