( superhero of ocean ) समुद्री सस्तन प्राणी पृथ्वीवरील काही अद्भुत आणि गूढ प्रजाती आहेत, ज्या अतिशय कठीण परिस्थितीतही जिवंत राहण्याची विलक्षण क्षमता दाखवतात. अंटार्क्टिकाच्या बर्फाळ समुद्रांपासून खोल महासागराच्या तळापर्यंत, या प्राण्यांनी स्वतःला अशा प्रकारे विकसित केले आहे की, ते अशा ठिकाणीही जिवंत राहू शकतात, जिथे इतर जीवसृष्टीला संघर्ष करावा लागतो. या लेखात आपण समुद्री सस्तन प्राण्यांच्या भौतिक, शारीरिक आणि वर्तनात्मक वैशिष्ट्यांवर एक नजर टाकू, ज्यामुळे ते महासागराचे खरे ‘सुपरहिरो’ ठरतात.
व्हानात्मक पर्यावरणातील संघर्ष यांमुळे समुद्र हा सर्वांसाठीच वावर करण्यासाठी कठीण ठरतो. समुद्री सस्तन प्राण्यांना उणे-शून्य तापमान, प्रचंड पाण्याचा दाब, कमी ऑक्सिजन आणि मर्यादित अन्नस्रोत यांचा सामना करावा लागतो. मात्र, हे प्राणी यादरम्यान अशा प्रकारच्या युक्त्या अंगीकारतात की ज्या आपल्याला थक्क करतील. उष्णता टिकवण्यासाठी त्यांच्या शरीरात चरबी आणि शरीरावर लोकरीसारखे आवरण असते. फ्रिजमध्ये असलेल्या थंड पाण्यासदृश तापमानात उष्णता टिकवण्याचे कौशल्य या प्राण्यांनी कमावले आहे. 2014 मध्ये आर. डब्ल्यू. डेव्हिस यांच्या अभ्यासाने या प्राण्यांच्या विलक्षण डुबकी घेण्याच्या क्षमतेचा शोध घेतला. सीलसारख्या प्राण्यांकडे चरबीचा जाड थर (ब्लबर) असतो, जो उष्णता गमावण्यापासून त्यांचे संरक्षण करतो.
सील आणि सीऑटर यांच्या लोकरांमध्ये (घनदाट केसांचे आवरण) हवेचे छोटे थर साठून राहतात, ज्यामुळे ते अधिक उबदार राहतात. मोठ्या व्हेल प्रजातींमध्ये हा ब्लबर उष्णता टिकवण्याबरोबरच दीर्घ प्रवासासाठी आणि प्रजनन हंगामासाठी ऊर्जास्रोत म्हणूनही उपयुक्त ठरतो.
तुम्हाला माहिती आहे का, की व्हेल्स आणि डॉल्फिन्ससारखे सागरी प्राणी एके काळी जमिनीवर राहणारे प्राणी होते? एम. डी. उहेन यांच्या 2007च्या अभ्यासानुसार, उत्क्रांतीच्या 300 दशलक्ष वर्षांनंतर हे प्राणी पुन्हा समुद्राकडे वळले. सुरुवातीला, त्यांच्या पूर्वजांनी जमिनीवर जगण्यासाठी अनुकूलता विकसित केली होती. परंतु, बदलत्या पर्यावरणाने आणि जगण्यासाठीच्या गरजांनी त्यांना परत पाण्यात आणले. काळानुसार, त्यांनी पोहण्यासाठी सडपातळ शरीर, फिन्स आणि शेपटी विकसित केली. ते दीर्घकाळ श्वास रोखून ठेवण्यासही सक्षम झाले.
त्यांची हाडेदेखील खोल पाण्यातील दाब सहन करण्यासाठी अनुकूल झाली. हा अद्भुत प्रवास दर्शवतो की, जीव कसे संपूर्णपणे बदलू शकतात आणि नवीन अधिवासांमध्ये जगण्यासाठी सक्षम होतात. सागरी प्राणी उत्क्रांतीची ताकद आणि लवचिकता यांचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांची कहाणी समजून घेतल्याने जमिनीवरील आणि पाण्यातील जीवनातील गुंतागुंतीचे संबंध समजायला मदत होते.
शरीर रचनेतील अद्वितीयता अर्थात समुद्री जीवनासाठी त्यांच्या शरीररचनेत अनोख्या बदलांचा समावेश आहे. गोलसर शरीर, यांमुळे डॉल्फिन आणि व्हेलसारख्या प्राण्यांचे टॉर्पेडोसारखे शरीर पाण्याचा अवरोध कमी करून वेगाने पोहण्यास मदत करते. त्याचबरोबर फिन्स आणि शेपटी ही त्यांच्या पंखांप्रमाणे अंग हाताळण्यासाठी आणि ताकदवान शेपटी जोरदार गतीसाठी उपयोगी ठरते.
याचबरोबर वर्तनात्मक सवयी या सागरी सस्तन प्राण्यांची जगण्याची रणनीती केवळ शारीरिक वैशिष्ट्यांवरच अवलंबून नाही, त्यांच्या वर्तनात्मक सवयीही महत्त्वाच्या आहेत. समुद्री स्तनधारी प्राणी, जसे की व्हेल्स, डॉल्फिन्स आणि सील्स यांचे आहार किंवा अन्न शोधणे किंवा खाणे याबाबतचे वर्तन त्यांच्या सागरी जीवनशैलीला अनुकूल असते. वर्थ (2000) यांच्या संशोधनात सागरी सस्तन प्राणी आहार कसे करतात आणि त्यांची आहार (अन्न) धोरणे कशी काळानुसार विकसित झाली आहेत, हे तपासले आहे. समुद्री प्राणी त्यांच्या शिकार पकडण्यासाठी विविध अनुकूलनांचा वापर करतात, जसे की व्हेल्समध्ये बॅलीन प्लेट्स आणि डॉल्फिन्समध्ये टोकदार दात. काही प्रजाती, जसे की किलर व्हेल्स समूहात शिकारी करून मोठ्या शिकार पकडतात, तर सील्ससारखी इतर प्रजाती एकट्याने शिकारी करतात. समुद्री प्राण्यांच्या तोंड किंवा चोच यांचा आकार आणि प्रकार त्यांच्या आहार कार्यक्षमतेत महत्त्वाची भूमिका बजावतात.
आहार घेण्याचे वर्तन प्रजाती आणि त्यांच्या पर्यावरणानुसार मोठ्या प्रमाणावर बदलते. उदाहरणार्थ, काही समुद्री प्राणी माशांना पकडण्यासाठी खोल समुद्रात जातात, तर इतर प्रजाती पृष्ठभागावरच राहतात. या आहार धोरणांचा विकास समुद्री प्राण्यांना विविध समुद्री पर्यावरणात जिवंत राहण्यासाठी मदत करतो. सागरी सस्तन प्राणी प्राणी कसे खातात, हे समजून घेणे, हे त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धन करण्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण यामुळे त्यांची उपयोगिता आणि मानवी हस्तक्षेप हे त्यांच्या खाद्यस्रोतांवर कसे परिणाम करते, यांची माहिती मिळते.
समूह शिकवण
डॉल्फिनसारखे प्राणी त्यांच्या पिल्लांना शिकारीचे तंत्र शिकवतात. त्याचबरोबर हंगामी स्थलांतर शिकवण्याचे आणि शिकण्याचे तंत्र. जसे की व्हेलसारखे प्राणी प्रजननासाठी उबदार पाण्यात स्थलांतर करतात. परस्परांसोबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ध्वनी संप्रेषणाचा वापर. कमी प्रकाशात आणि दूर अंतरावर पसरलेल्या सागरात हे सागरी सस्तन प्राणी ‘इकोलोकेशन’ म्हणजे आवाजाचा उपयोग नेव्हिगेशन आणि संवादासाठी करतात.
श्वास घेण्याचे तंत्र
समुद्रातील ऑक्सिजनची मर्यादित उपलब्धता ही आणखी एक मोठी अडचण आहे. व्हेल आणि डॉल्फिनसारख्या प्रजाती बर्याच वेळा श्वास रोखून ठेवू शकतात. हे त्यांच्या शरीरातील अनोख्या शारीरिक बदलांमुळे शक्य होते जसे की फुप्फुसांची कार्यक्षमता. प्रत्येक श्वासोच्छ्वासात फुप्फुसातील जास्तीत जास्त हवा बाहेर टाकली जाते, ज्यामुळे ऑक्सिजनची कार्यक्षम देवाणघेवाण होते. दुसरी विशेषता म्हणजे रक्तातील ऑक्सिजन साठवणूक. त्यांच्या स्नायूंमध्ये मायोग्लोबिनचे जास्त प्रमाण असते, ज्यामुळे त्यांना दीर्घकाळ ऑक्सिजन साठवता येतो. रक्तप्रवाह नियंत्रण करण्याचे कसब विशेषतः पाण्यात बराच वेळ बुडी मारताना रक्तप्रवाह केवळ आवश्यक अवयवांकडे वळवला जातो. डुबकी घेताना ते हृदयाचे ठोके मंदावतात, ज्याला ‘ब्रॅडिकार्डिया’ म्हणतात, त्यामुळे ऑक्सिजन वाचवला जातो.
वर्तनाच्या दृष्टीनेही, ते डुबक्या योग्य प्रकारे नियोजन करतात आणि ऊर्जा वाचवण्यासाठी हालचाल कार्यक्षमतेने करतात. वेडेल सील्ससारखे प्राणी बुडी मारताना त्यांच्या प्लीहा (स्प्लीन)च्या ऑक्सिजनयुक्त लाल रक्तपेशींचा साठा वापरतात. आणखी एक विशेषता म्हणजे कमी ऑक्सिजनावर जगण्याचे सामर्थ्य. समुद्री सस्तन प्राणी नेहमीच कमी ऑक्सिजनच्या (हायपॉक्सिया) स्थितीत असतात. मिलियन वर्षांच्या उत्क्रांतीमुळे त्यांच्या शरीरात अशा जीनमध्ये बदल झाले आहेत, ज्यामुळे त्यांना ऑक्सिजन कमी झाल्यामुळे होणार्या हानीपासून बचाव करता येतो.
प्रदीप चोगले
(लेखक ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी - इंडिया’ या संस्थेत सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)