मुंबई : (Mumbai Water Shortage Crisis) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून सध्या या धरणांत मिळून ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातच तापमानवाढीमुळे बाष्पीभवन होऊन धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट तयार झाले आहे. पावसाळ्यापर्यंत हा पाणीसाठा पुरेसा नसल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने तत्पूर्वीच राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी केली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणांतील पाणीसाठा ३३.५७ टक्क्यांवर आला आहे. मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे. यासाठी पालिकेच्या जलविभागाकडून पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. आयुक्तांच्या मंजुरीनंतर तीन आठवड्यांपूर्वी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
ऊर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे.मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याचा दाब कमी असल्यामुळे अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या भेडसावते आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\