Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ हा बनावट असल्याचा दावा केला जात आहे. नेमकं काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?
नेमकं काय आहे प्रकरण?
केरळमधील एका खाजगी मार्केटिंग कंपनीत वाईट कामगिरी करणाऱ्या कर्मचार्यांना चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्मचार्यांना कथितपणे दोरीने बांधलेल्या कुत्र्याप्रमाणे गुडघ्यावर रांगण्यास आणि जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडल्याची बाब समोर आले आहे. खाजगी कंपनीवर हे आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या मार्केटिंग फर्ममधील समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोरी वापरून एका व्यक्तीला कुत्र्याप्रमाणे जमिनीवर रांगायला भाग पाडताना दिसत आहे. माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, कर्मचार्यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की ज्यावेळी ते त्यांना ठरवून दिलेले टार्गेट पूर्ण करू शकले नाहीत, तेव्हा कंपनीच्या व्यवस्थापनाकडून त्यांनाही अपमानास्पद शिक्षा देण्यात आली.
दरम्यान स्थानिक वृत्त वाहिन्यांनी या प्रकाराचे व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर राज्य कामगार विभागाने कामाच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या अशा अपमानास्पद वागणुकीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्याचे कामगार मंत्री व्ही, शिवनकुट्टी यांनी देखील या घटनेच्या चौकशीचे तसेच जिल्हा कामगार अधिकार्यांना तात्काळ घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी हे दृश्य "धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे" असल्याचे म्हटले आहे आणि केरळसारख्या राज्यात कोणत्याही किंमतीत ते स्वीकारले जाऊ शकत नाही असे म्हटले आहे.
अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना क्रूर आणि अपमानास्पद वागणूक दिली, ज्यामध्ये कुत्र्यांसारखे त्यांच्या गळ्यात पट्टा बांधून मिरवणूक काढली जात होती, जमिनीवर असलेल्या भांड्यातून पाणी पिण्यास भाग पाडले जात होते, जमिनीवरून नाणी चाटायला लावली जात होती. त्यांची शरीरावरीस कपडे काढायला सांगितलं जात होते, शिक्षा म्हणून त्यांच्या तोंडात मीठ भरले जात होते.तेथील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दैनंदिन विक्री लक्ष्य पूर्ण न करणाऱ्यांसोबत असे किळसवाणे प्रकार केले जात होते. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केल्यास किंवा निषेध केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी ताकीद देण्यात आली होती.
मात्र दुसरीकडे पोलिसांचे म्हणणे आहे की, "माजी व्यवस्थापकाचा कंपनी मालकाशी वाद झाला होता आणि त्याने हा व्हिडिओ नवीन प्रशिक्षणार्थींसोबत शूट केला आणि दावा केला की हा त्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. व्हायरल हा व्हिडिओ चार महिन्यांपूर्वी शूट करण्यात आला होता. आता संबंधित व्यवस्थापकही कंपनी सोडून गेला आहे."व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, केरळच्या कामगार विभागाने कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या कथित छळाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कर्मचाऱ्याऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत, ज्यांनी या घटनेसाठी माजी व्यवस्थापकाला जबाबदार धरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी कलूर येथे आहे आणि ही घटना पेरुम्बवूर येथे घडली. तसेच यात एक ट्विस्ट असा आला ,जेव्हा व्हिडिओमध्ये दिसत असलेल्यांपैकी एका व्यक्तीने मीडियाला कंपनीत अश्याप्रकारे कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अत्याचार झालेला नाही, त्यांचा छळ करण्यात आलेला नाही, याचबरोबर त्या व्यक्तीने दावा केला की, 'मी अजूनही फर्ममध्ये काम करतो. हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा आहे आणि त्यावेळी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने जबरदस्तीने बनवला होता. नंतर व्यवस्थापनाने त्याला नोकरी सोडण्यास सांगितले आणि आता तो व्हिडिओचा वापर फर्मच्या मालकाची बदनामी करण्यासाठी करत आहे.त्याने पोलिस आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनाही हेच निवेदन दिल्याचे वृत्त आहे.
राज्याचे कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी माध्यमांना सांगितले की, 'मी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत', उच्च न्यायालयाचे वकील कुलथूर जयसिंग यांच्या तक्रारीच्या आधारे राज्य मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, केरळ राज्य युवा आयोगानेही हस्तक्षेप करत कथित छळाच्या घटनेत स्वतःहून गुन्हा दाखल केला. आयोगाने जिल्हा पोलिस प्रमुखांना या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. आयोगाचे अध्यक्ष एम शजर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सुसंस्कृत आणि लोकशाही समाजात अस्वीकार्य असलेल्या अशा पद्धतींविरुद्ध कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे. भारतात कामगार सुरक्षा कायद्याअंतर्गत, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता, छळ करणे यांसारख्या गोष्टी गुन्हे मानले जातात, ज्यात कायद्यानुसार कारवाई तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रकरणात अहवाल आल्यानंतरच खऱ्याखोट्याचा उलगडा होईल.