मुंबई : तुम्हाला सिरीज पाहायची आवड असेल तर, आत्ताच एक ट्रेंडिंग ला असलेली सिरिज तुमच्या वॉच लिस्ट मध्ये समाविष्ट करा. तुम्हीदेखील कोरियन ड्रामांचे चाहते असाल किंवा अजूनही तुम्हाला त्या जगात शिरकाव करायचा असेल, तर नेटफ्लिक्सवर सध्या चर्चेत असलेली ही नवीन सीरिज तुमच्यासाठी परिपूर्ण ठरू शकते. 'WHEN LIFE GIVES YOU TANGERINES' हे नाव ऐकून जरी साधंसं वाटत असलं, तरी या के-ड्रामाने सध्या ओटीटीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
ही सिरीज कोणत्याही हिंसाचार, विकृती किंवा अश्लीलतेपासून दूर असून, एक साधी, सौम्य आणि मनाला स्पर्श करणारी प्रेमकहाणी सांगते. आणि हेच याचं वेगळेपण ठरतं. फॅमिली ड्रामाच्या या सिरीजला IMDB वर मिळालेलं ९.३ चं रेटिंग हेच तिच्या यशाचं मोठं प्रमाण आहे. या कथेत प्रेम, कविता आणि काळाचं एक भावनिक चित्रण 'WHEN LIFE GIVES YOU TANGERINES' ही कथा १९५० ते २००० या कालखंडावर आधारित आहे. कथेमध्ये ऐ-सिन नावाची मुलगी कविता लिहिते आणि तिच्या आयुष्यातील ग्वान-सिक नावाचा मुलगा तिच्यावर मनापासून प्रेम करतो. त्याचं प्रेम हे दिखाव्याचं नाही, तर रोजच्या साध्या गोष्टींमधून व्यक्त होणारं असतं. या कथेतून एक महत्त्वाचा संदेश दिला जातो की खरं प्रेम महागड्या भेटवस्तूंमध्ये नसतं, तर त्या छोट्या आठवणींमध्ये, छोट्या कृतींमध्ये दडलेलं असतं.
प्रत्येक एपिसोड एका ऋतूशी निगडित असून, त्या ऋतूंप्रमाणे पात्रांचं नातं कसं घडतं, कसं बदलतं, याचं सूक्ष्म आणि सुंदर चित्रण यात दिसून येतं. अभिनेता किम वॉन -सेओक च्या अभिनयाने तर प्रेक्षक भारावून गेले आहेत.
रेटिंगमध्ये मागे टाकले नेटफ्लिक्स वरील सर्व हिट ड्रामे
या सिरीजचे एकूण १६ भाग असून ती सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगला उपलब्ध आहे. 'स्क्विड गेम' (८.५), 'क्विन ऑफ टिअर' (८.२) आणि 'लवली रनर' (८.६) या लोकप्रिय के-ड्रामांना मागे टाकत, 'WHEN LIFE GIVES YOU TANGERINES' ही सिरीज IMDB वर ९.३ रेटिंग मिळवून टॉपवर पोहोचली आहे.
जर तुम्ही अजून पाहिलं नसेल, तर ही योग्य वेळ आहे. ही सिरीज केवळ मनोरंजन नाही, तर ती एक भावनिक प्रवास आहे – जिथे प्रेम, वेळ, नातं आणि मनोव्यापार यांचा सुंदर मिलाफ आहे. तुम्ही जर एक दर्जेदार, हृदयस्पर्शी कथा पाहण्याच्या शोधात असाल, तर 'WHEN LIFE GIVES YOU TANGERINES' ही सिरीज तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.