मुंबई : अमेरिकेने लादलेल्या आयातशुल्काची अंमलबजावणी सोमवार ७ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या आयातशुल्काची धास्ती शेअर बाजाराला पडून सोमवारी २९०० अंशांनी शेअर बाजार कोसळला आहे. भारतासह अनेक आशियाई बाजारही जोरदार कोसळले आहेत. निफ्टीमध्येही जोरदार धक्का बसला आहे. निर्देशांकाने ९०९ अंशांची आपटी खाल्ली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराच्या पतनाने गुंतवणुकदारांचे १९ लाख कोटी बुडाले आहेत.
सोमवारी बाजारात दिवसाच्या सुरुवातीलाच सर्वच प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सने मान टाकली आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स ८.३ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ४.२५ टक्के, भारती एअरटेल ३.४४ टक्के, आयसीआयसीआय बँकेचे ३.७८ टक्क्यांनी शेअर्स पडले आहेत, फार्मा कंपन्यांचे शेअर्स २.४ टक्क्यांनी पडले आहेत, ऑटोमोबाईल क्षेत्राचे शेअर्स ४.७० टक्के, निफ्टी मिडकॅप कंपन्यांचे शेअर्स ४.५८ टक्क्यांनी पडले आहेत. सर्वच क्षेत्रांना सोमवारी बाजार उघडल्यापासूनच भगदाड पडले आहे. गुंतवणुकदारांमध्ये यामुळे भगदाड पडले आहे.
शेअर बाजाराच्या पतनाला अमेरिकेच्या आर्थिक धोरणांतील मोठा बदल कारणीभूत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. आयातशुल्क वाढीमुळे अमेरिकेला होणारी सर्वच देशांची निर्यात महागणार आहे. याचा फटका सर्वच देशांना बसणार आहे. अमेरिकेच्या या आयातशुल्क लादण्याला चीन कडूनही जशास तसे प्रत्युत्तर देण्याची भाषा होत असल्याने जगभर व्यापार युध्दाचा भडका उडण्याची शक्यता आहे. हेही शेअर बाजार कोसळण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे. यातून शेअर बाजार कसा सावरतो हे बघणं महत्वाचं ठरेल.