पाच तास थांबवून ठेवले अन्...; तनिषा भिसेंच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी : रुपाली चाकणकर

    07-Apr-2025
Total Views | 35
 
Rupali Chakankar
 
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना पाच तास थांबवून ठेवले आणि त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या घटनेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
 
रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चुकांचा पाढाच वाचून दाखवला. त्या म्हणाल्या की, "रुग्णाला २ तारखेला रुग्णालयात बोलावण्यात आले होते. परंतू, अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने २८ तारखेला त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला आणि डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात बोलावले. तसेच संबंधित स्टाफला ऑपरेशन करण्याची तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यापद्धतीने स्टाफने तयारी केली."
 
हे वाचलंत का? -  पुढच्या निवडणूकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना...; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
 
रुग्णाला १० लाख रुपयांची मागणी
 
"रुग्णाला ऑपरेशन कक्षात घेऊन जाण्याआधी १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. हे सगळे रुग्णासमोरच घडत होते. त्यावेळी आमच्याकडे आता ३ लाख रुपये असून पुढच्या २ ते ३ तासांत किंवा उद्यापर्यंत उर्वरित पैशांची व्यवस्था करू, असे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाला मंत्रालयाकडून तसेच काही विभागांकडून अनेकवेळा फोन करण्यात आले. परंतू, याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही."
 
साडेपाच तासांत कोणतेही प्राथमिक उपचार नाहीत
 
"९ वाजून १ मिनीटांपासून तर अडीच वाजतापर्यंत रुग्ण रुग्णालयात होता. याकाळात त्यांना प्रचंड रक्तस्त्राव होत असतानाही रुग्णालयाकडून कोणतेही उपचार झाले नाहीत. उलट रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तुमच्याकडे असेलेली औषधे घ्या, असे डॉक्टरांनी नातेवाईंकाना सांगितले. साडेपाच तासांमध्ये रुग्णालयाने रुग्णाला सहकार्य केले नाही. या सगळ्या कालावधीत रुग्णाची मानसिकता खचली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णाला ससून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यानंतर रुग्णाचे खच्चीकरण झाले होते. त्यामुळे कोणत्याही डॉक्टरांना न भेटता तिथून १५ मिनीटांत सगळे बाहेर आले. त्यानंतर तिथून ते सुर्या हॉस्पीटलमध्ये गेले आणि तिथे त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केलेत. परंतू, डिलीव्हरी झाल्यानंतर अतिरिक्त रक्तस्त्राव आणि खचलेली मानसिकता यामुळे दोन दिवसांत रुग्णाचा मृत्यू झाला. हे सगळे भिसे कुटुंबियांनी तक्रारीत नमूद केले असून यात कुटुंबियांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत," अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
 
रुग्णालयाकडून रुग्णाची बदनामी
 
"रुग्णाचा वैद्यकीय इतिहास फक्त डॉक्टरांना माहिती होता. परंतू, ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने समिती नेमली. स्वत:ला वाचवण्यासाठी या समितीच्या अहवालात त्यांनी रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीय गोष्टी जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या. याचा मी निषेध करते आणि यासाठी रुग्णालयाला समज दिली जाईल. याबाबत भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाला पत्र दिले आहे," असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121