( RPF Sub-Inspector Rekha Mishra ) हरवलेल्या हजारो मुलांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविणार्या मुंबईच्या धाडसी महिला आरपीएफ उपनिरीक्षक रेखा मिश्रा यांच्याविषयी...
भारतीयांसाठी स्वप्नांचे शहर म्हणजे मुंबई. दरवर्षी लाखो तरुण-तरुणी आणि विविध वयोगटांतील नागरिक देशभरातूनच रोजीरोटीच्या शोधात ही मायानगरी गाठतात. काही यशस्वी होतात, तर काहींची फसवणूकही होते. अशावेळी आपले घरदार, सोडून मुंबईत पळून आलेले अनेक तरुण-तरुणी आणि बालक दिशाहीन होतात. सैरभैर स्थितीत शहरात नव्या संधींच्या शोधत फिरत असतात, तर काही संधीसाधू अशा बालकांना आपल्या जाळ्यात अडकाविण्याच्या तयारीत असतात.
रेल्वे हे अनेकांना प्रवासाचे सोपे आणि गतिमान साधत वाटते. त्यामुळे अनेक बालक रेल्वे स्थानक आणि नजीकच्या परिसरात आढळून येतात. अशा भरकटलेल्या बालकांच्या आणि तरुणांच्या आयुष्यात आशेचा किरण बनल्या, त्या आरपीएफ महिला उपनिरीक्षक रेखा मिश्रा. मध्य रेल्वेच्या ‘मिशन नन्हे फरिश्ते’च्या माध्यमातून रेखा मिश्रा यांनी आजतागायत दोन हजारांहून अधिक लहान, हरविलेल्या मुलांची पालकांशी भेट घडवून आणली आहे.
रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 1986 साली झाला. रेखा मिश्रा यांचे वडील सुरेंद्र नारायण मिश्रा हे भारतीय लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी असून, त्यांचे दोन भाऊही भारतीय लष्करात सेवा बजावत आहेत. रेखा मिश्रा यांचे आजोबा सूर्य नारायण मिश्रा हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे राष्ट्रसेवेचे बाळकडू रेखा यांना कुटुंबातून मिळाले.
2015 साली रेखा मिश्रा ‘रेल्वे संरक्षण दला’त रुजू झाल्या. लखनौ येथे त्यांचे प्रशिक्षण झाले आणि पहिली पोस्टिंग थेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाली. आता रेखा यांना ‘रेल्वे सुरक्षा दला’त दहा वर्षे झाली असून, त्या सध्या मुंबई मंडळाच्या मुलुंड रेल्वे स्थानकात कार्यरत आहेत. कर्तव्यावर असताना रेखा आणि त्यांचे सहकारी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर फिरणार्या आणि हरवलेल्या बालकांना नेमकेपणाने हेरतात. सन 2018 पर्यंत रेखा मिश्रा आणि त्यांच्या टीमने मुंबईत पळून आलेल्या शेकडो मुलांना ओळखले होते.
रेखा मिश्रा आपल्या अनुभवांविषयी सांगताना म्हणतात की, “बॉलीवूड चित्रपटातील कलाकारांना भेटण्यासाठी किंवा फेसबुकवर भेटलेल्या लोकांना भेटण्यासाठी किंवा कौटुंबिक वातावरणाला कंटळून बरीचशी मुले घर सोडून मुंबईत पळून येतात.” या कामात हातखंडा असलेल्या रेखा मिश्रा यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीच्या सुमारे दोन हजार मुलांना मदत केली असून, या मुलांचे भविष्य अंधःकारमय होण्यापासून वाचविले आहे.
रेखा सांगतात की, “माझ्या कर्तव्यादरम्यान मला ‘महिला शक्ती टीम’मध्ये महिला शाखेत काम करण्याची संधी मिळाली. या काळात मी महिला सुरक्षा आणि बालबचावासाठी काम केले आहे. ‘महिला एटीएचयू टीम’ म्हणजेच मानवी तस्करीविरोधी युनिट्सच्या सुरक्षेसाठी आणि तस्करीविरोधी पथकासाठीही ‘स्मार्ट सहेली गट’ म्हणून काम केले आहे.”
रेखा यांची एकूणच कार्यशैली आणि बालकांना आईप्रमाणे हळूवारपणे समजून घेण्याची कला, यामुळे बालके अधिक मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधतात. मुंबईचे ग्लॅमर पाहून अनेक मुले-मुली घरातून पळून शहरात दाखल होतात. अशा मुलांना चुकीच्या दिशेने जाण्यापासून रोखणे आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणे, हे आता काम नव्हे, तर एक छंद बनल्याचे रेखा सांगतात.
असाच एक किस्सा रेखा यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना उद्धृत केला. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील एक मुलगी चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईत आली होती. ती दहावीत शिकत होती. ती दिसायला सुंदर होती. तिला चित्रपटात काम मिळेल आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आईवडिलांचा आधार बनेल; यातूनच तिला गरिबीवर मात करता येईल, असे कोणीतरी सांगितले. पण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर पोहोचल्यावर तिची दिशाभूल केली गेली. सैरभैर झालेली आणि थोडी घाबरलेली ती तरुणी वारंवार स्थानकाच्या आत-बाहेर जा-ये करत होती.
दरम्यान, रेखा यांनी त्या मुलीला पाहिले आणि जवळ बोलावले. रेखा यांनी त्या तरुणीची आपुलकीने चौकशी केली. तेव्हा तिने घरातून पळून मुंबईत का आली, याचे कारण सांगितले. सर्व माहिती घेऊन रेखा यांनी त्या मुलीला ‘एनजीओ’च्या माध्यमातून ‘बाल कल्याण केंद्रा’त नेले आणि त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना मुंबईला बोलावले. मुलगी सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनादेखील आनंद झाला. रेखा यांनी स्वतःच्या पैशांतून तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी तिकिटे काढली आणि प्रवासखर्च देऊन घरी पाठवले.
रेखा मिश्रा यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने 2018 साली त्यांना महिला आणि बालकांसाठी केलेल्या विशेष कामगिरीसाठी ‘नारीशक्ती विशेष पुरस्कारा’ने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, रेखा यांनी यावेळी पुरस्कारस्वरूप मिळालेली एक लाख रुपयांची रक्कमही लहान बालकांसाठी काम करणार्या ‘चाईल्डलाईन’ या ‘एनजीओ’ला दान केली.
‘चाईल्डलाईन’ ही संस्थादेखील हरवलेल्या आणि फसवणूक झालेल्या लहान बालकांची सुटका करुन त्यांची काळजी घेते. आज रेखा मिश्रा याच्या धाडसाचे आणि कार्याचे कौतुक आणि प्रसार व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पाठ्यपुस्तकात रेखा मिश्रा यांच्या नावावर इयत्ता दहावीच्या पुस्तकात धडादेखील आहे. रेखा मिश्रा यांच्या हातून भविष्यात ही अशीच उल्लेखनीय कामगिरी घडो, यासाठी अनेकानेक शुभेच्छा!
गायत्री श्रीगोंदेकर