नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
दंतेवाडा पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ मोहिमेस यश
07-Apr-2025
Total Views | 12
नवी दिल्ली (Naxal free India) : छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये विविध संघटनांचे सक्रिय सदस्य आहेत, ज्यांनी नक्षलवादाच्या नावे होणारा हिंसाचार, शोषण आणि कठीण जीवनाला कंटाळून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक गौरव राय म्हणाले की, नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यावेळी त्यांनी फसव्या आणि अमानवी माओवादी विचारसरणीबद्दल निराशा व्यक्त केली. त्यांनी जंगलात राहण्याचा त्रास आणि बंदी घातलेल्या संघटनेतील अंतर्गत संघर्ष हे आत्मसमर्पण टाकण्याची कारणे असल्याचे सांगितले. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी माओवाद्यांच्या जनमिलिशिया, रिव्होल्युशनरी पार्टी कमिटी (आरपीसी) आणि जनता सरकार विंग, दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना (डीएकेएमएस) आणि चेतना नाट्य मंडळी (सीएनएम) येथे कार्यरत होते.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये आमदई परिसरातील जनमिलिशिया कमांडर म्हणून काम करणारा आणि डोक्यावर ३ लाखांचे इनाम असलेला राजेश कश्यप, १ लाख रुपयांचा इनामी आणि जनता सरकार विंग पथकाचा प्रमुख कोसा माडवी तसेच ५० हजार रुपयांचा इनामी सीएनएमचा सदस्य छोटू कुंजम याचा समावेश आहे.
आतापर्यंत ९५३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफकडून नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी सतत संपर्क, संवाद आणि सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा व्यापक प्रचार करून प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत २२४ बक्षीस मिळालेल्यांसह एकूण ९५३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.