हृदयविकार : समज आणि गैरसमज

    07-Apr-2025
Total Views | 15
 
 ( Heart disease )
 
( Heart disease ) जगभरातील वाढते हृदयरोगाचे प्रमाण हे सर्वस्वी चिंताजनक. बदलत्या काळात जागतिकीकरणामुळे, स्पर्धात्मक युगामुळे मनुष्याची जीवनशैली बदलली. आहार-विहार, आचार-विचार यांमध्ये आमूलाग्र बदल घडून आले. या बदलत्या जीवनशैलीमुळे बर्‍याच आजारांना निमंत्रण मिळताना दिसते. त्यात हृदयरोग हा अग्रक्रमावर आहे. हृदयरोगाचे अनेक प्रकार असून, अनेक कारणांमुळे हृदयरोगाचा धोका संभवतो. वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणेही पाहायला मिळतात. अशा वेळी रुग्णाला योग्य डॉक्टर आणि योग्य सल्ला मिळाला नाही, तर अनर्थ होण्याची शक्यता असते. तेव्हा आज ‘जागतिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने हृदयविकाराची कारणे, लक्षणे आणि एकूणच उपचार पद्धती यांसारख्या विषयांवर प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांनी केलेले हे विशेष मार्गदर्शन...
 
गभरात एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराने होतात. कर्करोग, एड्स, संसर्गजन्य रोग, अपघात, खून यांसारख्या सर्व कारणांनी मृत्युमुखी पडणार्‍या लोकांपेक्षा हृदयविकाराने निधन होणार्‍यांची संख्या अधिक आहे. पूर्वी हा आजार वयस्कर व्यक्तींमध्येच आढळत होता, पण आता या आजाराची पाळेमुळे अगदी तरुण पिढीमध्ये आढळतात. किंबहुना, भारतात 35 ते 50 या वयोगटात हृदयविकाराचा झटका येणार्‍यांचे प्रमाण 40 टक्के टक्के आहे. जेव्हा एखाद्या घरी कर्त्या पुरुषाला किंवा स्त्रीला हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा आर्थिकदृष्ट्या संपूर्ण कुटुंब आजारी पडते, अस्वस्थ होते.
 
बर्गर, पिझ्झा, चायनीज पदार्थ, फास्ट फूड, बटर संस्कृतीमुळे लठ्ठपणा हा वाढत चालला आहे. तळलेल्या पदार्थांमुळे मधुमेह, अतिरक्तदाब आणि हृदयविकार शरीरात हळूच प्रवेश करतात. नुडल्स, पिझ्झा, चॉकलेट्स, केक, चिप्स, सोबत कोल्डड्रिंक्स रिचवत टीव्ही पाहणे, हायफाय फॅशन झाली आहे. अशा या बैठी जीवनशैलीमुळे आणि भरपूर कॅलरीजच्या सेवनाने हृदयविकाराचे प्रमाण वाढते.
 
हृदयविकारास कारणीभूत घटकांचे प्रमाण भारतीयांमध्ये जास्त आहे. म्हणजे धूम्रपान, तंबाखूचे सेवन, उच्च रक्तदाब, मधुमेहाचे प्रमाण, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव या सर्व गोष्टी भारतीयांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. याव्यतिरिक्त काही विशिष्ट अशा धोक्याच्या घटकांचे प्रमाण फक्त भारतीयांतच आढळते. जसे की, ‘होमोसिस्टिन’चे अधिक प्रमाण, ‘फायब्रोजेन’चे अधिक प्रमाण, विशिष्ट प्रकारची चरबी ‘ट्रायग्लिसराईड’चे अधिक प्रमाण, ‘इन्सुलिन रेझिस्टंटस’ आदी. बर्‍याच पाहण्यांमध्ये असे आढळून आले की, पुरुषांपेक्षा स्त्रियांची घरात आणि घरातील घटकांशी आणि घटनांशी भावनात्मक गुंतवणूक जास्त असते. त्यामुळे नोकरी करणार्‍या स्त्रियांना बाहेरील आणि घरातील समस्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागते. अशा स्त्रियांना अतिरक्तदाब आणि हृदयविकाराचे प्रमाण जास्त असते.
 
आजकालच्या ‘मॉडर्न’ जमान्यात स्त्रियांमध्येसुद्धा धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम हृदयावर होतो. महत्त्वाचे म्हणजे, बर्‍याच स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात. ती एक गरज असली, तरी काही वर्षांनंतर त्याचे परिणाम दिसून येतात. बर्‍याच संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्या स्त्रिया बर्‍याच काळासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतात, त्यांच्यात हृदयविकाराचे प्रमाण जास्त असते. त्याशिवाय आपल्या देशातील स्त्रियांची उंची आणि आकारमान (बी.एम.आय.) हे पाश्चिमात्य स्त्रियांपेक्षा कमी असते, त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आकार व व्यास हा खूप कमी असतो. थोडक्यात, रक्तवाहिन्या या आकाराने छोट्या असतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांत होणारा थोडाही अवरोध (ब्लॉक) हा जास्त दुष्पपरिणाम करू शकतो. तसेच व्यायाम आणि शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे स्त्रियांच्या हृदयात रक्तवाहिन्यांचे जाळे कमी आढळते, त्यामुळे हृदयविकाराची तीव्रता स्त्रियांमध्ये जास्त जाणवते.
 
युवकांमधील हृदयविकाराचे वाढते प्रमाण
 
सध्या सर्वांधिक मृत्यू तंबाखू सेवनाने आणि धूम्रपानामुळे होणार्‍या आजारांमुळे होतात. धूम्रपान हे आरोग्याला अपायकारक आहे. हे युवकांना माहीत असूनसुद्धा ’कळतं, पण वळत नाही’ या उक्तीप्रमाणे आजचा युवक हा धूम्रपानाच्या अधीन झाला आहे. ब्राऊन शुगर, कोकेन, मॉर्फीन, हेरॉईन यांसारख्या नशिल्या पदार्थांमुळे युवकांच्या आरोग्यावर व हृदयावर विपरीत परिणाम होतो
 
युवकांमध्ये मद्यपानाचे प्रमाण खूप वाढले आहे. ‘सोशल ड्रिंकिंग’ या गोंडस नावाखाली सुरू झालेले मद्यपान ‘अ‍ॅण्टी-सोशल’ कधी होते, हे बरेचदा युवकांना कळतच नाही.
 
काही प्रचलित गैरसमज यांच्यामुळे युवक संभ्रमित अवस्थेत नकळत मद्यपानाच्या व्यसनाकडे वळतो. दारु, बिअरमुळे वजन वाढते, रक्तदाब वाढतो. हृदयाच्या स्नायूनवर परिणाम होऊन स्नायू कमजोर होतात. त्यामुळे हृदयाचे आकारमान वाढून पम्पिंग क्षमता कमी होते. त्याला ’डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ म्हणतात.
 
आपण भारतीय उच्च संस्कृतीपासून भरकटून विकृतीकडे चाललो आहोत. ‘योगविलासा’पासून भरकटून ‘भोगविलासा’कडे जात आहे.
 
आपण आपल्या आचार-विचार, आहार-विहार यांबद्दल चोखंदळ असले पाहिजे. आधीच अति प्रमाणात अनुवंशिक असलेल्या हृदयविकाराला या सर्व व्यसनांनी आणि इतर बाबींनी झपाट्याने वाढायला हातभार लागतो.
 
बायपास शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्याल?
 
दोन ते तीन महिने छातीला बांधायला एक पट्टा दिला जातो. तो वापरला की हाडाची हालचाल कमी होते. जखम भरायला आणि दुखणे कमी व्हायला मदत होते.
 
रुग्णांनी घरीसुद्धा डॉक्टरने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करावे. जरुरीपुरतीच विश्रांती घ्यावी. अनावश्यक पडून राहू नये. जेवण हलकेच जेवावे. चमचमीत पदार्थांचा अतिरेक करू नये, फळे, शक्तिवर्धक पेये यांचा जेवणात समावेश करावा.
 
धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे टाळावे. चालण्याचा आणि श्वसनाचे व्यायाम योग्य प्रमाणात करावे आणि हळूहळू त्यांचे प्रमाण वाढवावे. साधारपणपणे एका महिन्यात सहसा रुग्ण आपली सर्व दिनचर्या पूर्वीसारखी करू शकतो. नंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायाम वाढवावा. आपल्या वयोमानाप्रमाणे आणि तब्येतीप्रमाणे व्यायाम निवडावा. पोहणे, मैदानी खेळ (हलक्या स्वरूपाचे) रुग्ण पूर्वीच्याच उत्साहाने करू शकतो.
 
योग, योगासने केल्याने मानसिक ताणतणावसुद्धा कमी होऊ शकतो. यादरम्यान डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जखमांची मलमपट्टी करणे, टाके काढणे यांसारख्या गोष्टी सर्जनकडून करणे आवश्यक असते. रक्तदाब मोजमाप, मधुमेहाचे नियंत्रण, रक्त पातळ करण्याच्या गोळ्या, कोलेस्टरॉल नियंत्रण, आहाराचे, व्यायामाचे मार्गदर्शन वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेणे आवश्यक असते. सुरुवातीच्या दोन-तीन महिन्यांत आपल्या आजाराचा जास्त बाऊ न करता, योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
 
बायपास शस्त्रक्रियेनंतर हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे रुग्ण जीवन व्यवस्थित जगू शकतो. दीड-दोन महिन्यानंतर आपल्या कामावर, नोकरीवर जाऊ शकतो. 90 ते 95 टक्के रुग्णांमध्ये पूर्वी होणारा त्रास, छातीत दुखणे, दम लागणे पूर्णपणे बंद होते. त्यांचे आयुष्य वाढण्यास आणि जीवनाचा दर्जा चांगल्याप्रकारे जीवन जगण्यासाठी बायपासमुळे मदत होते.
 
‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’चे फायदे
 
‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ ही औषधोपचार पद्धती अत्यंत सुरक्षित व कमी वेळात होणारी आहे. (अर्धा तास)
 
यात कुठेही चिरफाड करण्याची, ना भूल देण्याची आवश्यकता असते. रुग्ण हा पूर्ण वेळ शुद्धीवर असतो. त्यामुळे जनरल अ‍ॅनेस्थेशिया देण्याचे जे धोके असतात, ते टाळता येतात.
 
मुख्यतः वयस्कर लोकांमध्ये ही फारच उपयोगाची गोष्ट आहे.
 
ज्यांना हृदयविकारासोबत बाकी आजारसुद्धा आहेत; उदा. दम्याचे विकार, किडनीचे आजार, हाडांचे आजार किंवा फार वयस्कर अशा लोकांना बायपास सर्जरीचा किंवा चार-सहा तास अ‍ॅनेस्थेशियाचा त्रास होऊ शकतो, अशा रुग्णांना ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ वरदान ठरू शकते.
 
बायपास सर्जरीमध्ये लावण्यात आलेल्या ग्राफ्टमध्ये जर अवरोध निर्माण झाला, तरी त्याचीसुद्धा ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ करता येते. त्याला ’ग्राफ्ट अ‍ॅन्जिओप्लास्टी’ असे म्हणतात.
 
जर रुग्ण फारच सिरिअस असेल, शॉकमध्ये असेल किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा रक्तदाब कमी झाला असेल, अशा वेळी ज्या आर्टरीमुळे हृदयविकाराचा झटका आला आहे, त्या आर्टरीची ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ केल्यास रुग्ण वाचू शकतो किंवा त्याचा रक्तदाब स्थिर होऊ शकतो.
 
ज्यांना एक किंवा दोनच आर्टरीमध्ये मर्यादित ब्लॉक आहे, त्यांना ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ फार उपयोगी असते.
 
तरुण रुग्णांवर सहसा ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ करण्यात येते. बायपास सर्जरी टाळता येत असल्यास टाळावी किंवा लांबवावी.
 
‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ दुसर्‍यांदा किंवा तिसर्‍यांदासुद्धा करता येते. परत परत केल्याने रुग्णाच्या जीविताला काही धोका होत नाही. पण, परत परत जर बायपास सर्जरी करण्याचा प्रसंग आलाच, तर धोका फार वाढतो.
 
यात रक्त देण्याची आवश्यकता नसते. रुग्णाला दोन-तीन दिवसांत सोडण्यात येते. बायपासच्या रुग्णाला कमीत कमी आठ-दहा दिवस रुग्णालयामध्ये ठेवावे लागते आणि तीन-चार बाटल्या रक्तसुद्धा द्यावे लागते.
 
‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’बद्दल काही गैरसमज...
 
हृदयविकाराचा झटका आल्याबरोबर ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’करू नये किंवा रुग्णाला काही काळ स्थिरावल्यावरच ती करावी. सत्य परिस्थिती : जितक्या लवकर ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ केली, तितक्या लवकर रुग्ण स्थिरावतो आणि त्याला या प्रक्रियेचा जास्तीत जास्त फायदा होतो. त्याच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते.
 
‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ ही तात्पुरती प्रक्रिया आहे, पुढे बायपास करावीच लागते. सत्य परिस्थिती : 95 टक्के लोकांमध्ये ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’चे यश हे आयुष्यभर राहते. उरलेल्या पाच टक्के लोकांमध्ये जर पुन्हा अवरोध झाल्यास त्यासाठी पुन्हा ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ करता येते.
 
‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ फार धोकादायक प्रक्रिया आहे. सत्य परिस्थिती : ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ ही फार सुरक्षित प्रक्रिया आहे. हृदयरोगतज्ज्ञ ज्यांनी यात विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे, अशा तज्ज्ञांच्या हातून या प्रक्रियांची रिस्क अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी असते आणि सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या रुग्णालयामध्ये ही रिस्क शून्य टक्के असते, असे म्हणायला हरकत नाही. महत्त्वाचे म्हणजे, योग्य रुग्णाची निवड, योग्य साहित्यांची निवड, चांगल्या रुग्णालयाची निवड आणि निष्णात डॉक्टर यांचा संगम म्हणजे यशस्वी अ‍ॅन्जिओप्लास्टी!
 
कोरोनरी अ‍ॅन्जिओप्लास्टी
 
‘कोरोनरी अ‍ॅन्जिओप्लास्टी’ ही हृदयविकाराच्या आजाराचे निदान करणारी सर्वोत्तम तपासणी आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रत्येक रुग्णाची अ‍ॅन्जिओग्राफी करणे महत्त्वाचे आहे.
 
रक्तवाहिन्यांमध्ये किती अडथळा आहे, त्यावर उपाय काय, अ‍ॅन्जिओप्लास्टी की बायपास सर्जरी करावी लागेल, यांची सर्व उत्तरे अ‍ॅन्जिओग्राफीमार्फतच मिळतात.
 
‘कोरोनरी अ‍ॅन्जिओग्राफी’ या तपासणीमध्ये जर कोरोनरी आर्टरीला अवरोध (ब्लॉक) असल्याचे निदर्शनास आले, तर या अवरोधाच्या ट्रिटमेंटसाठी गेल्या 25 वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती विकसित झाली असून तिचे नाव आहे ’कोरोनरी अ‍ॅन्जिओप्लास्टी.’
 
यामध्ये मांडीच्या धमनीमधून ‘गाइडिंग कॅथेटर’ नामक नळी कोरोनरी आर्टरीच्या मुखाजवळ ठेवण्यात येते. त्यातून एक नळी पुढे सरकवतात. गायडिंग वायर ही अत्यंत सूक्ष्म, स्टीलची बनलेली नळी असून तिचा पृष्ठभाग गुळगुळीत केलेला असतो. तिचा व्यास 0.014 इंच इतका छोटा असतो. तिची लांबी 180 सेंमी असते आणि तिचा सुरुवातीचा भाग हा फारच लवचिक व आर्टरीला इजा न करणारा असतो.
 
नळीची हालचाल मॉनिटरवर व्यवस्थित दिसते आणि बाहेरून या नळीची हालचाल नियंत्रित करण्यात येते. अशाच नियंत्रित हालचाली करून हृदयरोगतज्ज्ञ ही नळी अवरोध असलेल्या आर्टरीमध्ये शेवटपर्यंत आत ढकलण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ही नळी अवरोधापलीकडे जाऊन स्थिरावेल.
 
मग या नळीच्या साहाय्याने या नळीवरूनच ‘डायलेटेशन कॅथेटर’ नामक एक छोटी नळी ब्लॉकपर्यंत नेण्यात येते. या कॅथेटरच्या पुढील टोकास एक लांबुळका फुगा असतो. क्ष-किरण यंत्राच्या साहाय्याने समोरच्या मॉनिटरवर बघून, योग्य ठिकाणी ठेवून त्याला फुगविण्यात येते. काही वेळानंतर मग फुग्यातील दाब कमी करण्यात येतो. असे दोन-तीन वेळा करण्यात येते.
 
ब्लॉक हा मुख्यतः चरबीने बनलेला असल्यामुळे या बलूनद्वारे दाबला जातो आणि आर्टरी पूर्ववत होऊ शकते. मग नळी, बलून कॅथेटर आणि गायडिंग कॅथेटर काढून घेण्यात येतात.
 
जर ब्लॉक हा कडक असेल, कॅल्शियमयुक्त असेल, तर बलून जास्त दाबाने फुलवितात किंवा एक विशिष्ट पद्धतीचा बलून वापरतात. त्याला ‘कटिंग बलून’ म्हणतात. याच्या पृष्ठभागावर सूक्ष्म असे ब्लेड लावण्यात आलेले असतात, जेव्हा हा बलून फुलविण्यात येतो, तेव्हा या ब्लेडद्वारे कडक अवरोध कापला जातो आणि मग तेथे अ‍ॅन्जिओप्लास्टी केली जाते.
 
त्यानंतर त्याच जागी अवरोधाच्या आकारमानाप्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अ‍ॅन्जिओप्लास्टीप्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसविण्यात येतो.
 
बायपास शस्त्रक्रिया म्हणजे काय?
 
जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अधिक प्रमाणात किंवा सर्वच रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध (ब्लॉक) असेल किंवा मुख्य धमनीमध्ये ब्लॉक असेल किंवा ज्या ब्लॉकची ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ करणे अशक्य किंवा धोकादायक आहे, अशा वेळी वैद्यकीय औषधोपचारांसोबत बायपास सर्जरीचा सल्ला दिला जातो.
 
‘बायपास सर्जरी’ म्हटले की हृदयात धस्स व्हायला होते. पण, आता बायपास शस्त्रक्रिया खूप सोपी आणि सहज झाली आहे. पूर्वीइतका वेळ पण लागत नाही, त्रासही होत नाही, टाकेही कमी पडतात, सुधारणाही लवकर होते, रुग्णालयातून सुटीपण लवकर होते. शस्त्रक्रियेत गुंतागुंत व मृत्यूचे प्रमाणसुद्धा फार कमी झाले आहे. बायपासनंतर जीवनाचा दर्जाही उंचावतो, काही त्रासाशिवाय जगता येते.
 
हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळ्याच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडणे, जेणेकरून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवले जाईल, यालाच ’बायपास सर्जरी’ असे म्हणतात. बायपास सर्जरीमध्ये अडथळ्यांना बायपास करण्यासाठी ज्या रक्तवाहिन्यांचा वापर केला जातो, त्यांना ’ग्राफ्ट’ असे म्हणतात.
 
पायाच्या अशुद्ध रक्त वाहणार्‍या रक्तवाहिन्या, हाताची शुद्ध रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिनी आणि छातीच्या पिंजर्‍यामधील रक्तवाहिन्या या ग्राफ्ट म्हणून वापरल्या जातात. ‘ओपन हार्ट सर्जरी’ आणि ‘बिटिंग हार्ट सर्जरी’ या ‘बायपास सर्जरी’च्या पद्धती आहेत.
 
ओपन हार्ट सर्जरी : या पारंपरिक पद्धतीमध्ये हृदय आणि फुप्फुसाची क्रिया काही काळ बंद करून हार्ट-लंग मशीनच्या माध्यमाद्वारे शरीराला रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवून हृदयाच्या रक्तवाहिन्यांना ग्राफ्ट जोडण्यात येतात. या रक्तवाहिन्या जोडल्यानंतर हार्ट-लंग मशीन बंद करून हृदय शॉक देऊन पुन्हा चालू केले जाते.
 
बिटिंग हार्ट सर्जरी : या सर्जरीमध्ये हृदयाची क्रिया चालू असते. हृदयाची गती कमी करून त्या रक्तवाहिनीवर ग्राफ्ट टाकायचा आहे, तो भाग ’ऑक्टोपस’ स्टॅबिलायझर वापरून स्थिर केला जातो आणि त्या रक्तवाहिनीवर अडथळ्याच्या पुढे ग्राफ्ट टाकला, जोडला जातो. मग हाच स्टॅबिलायझर काढून दुसर्‍या रक्तवाहिन्याच्या भागावर वापरून दुसरा ग्राफ्ट जोडला जातो. अशा तर्‍हेने वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी ग्राफ्ट टाकले जातात. या सर्व प्रक्रियेत हृदयक्रिया ही सतत चालू असते. यात हार्ट-लंग मशीनचा वापर होत नसल्यामुळे हार्ट-लंग मशीनचे रक्तावर होणारे हानिकारक परिणाम होत नाहीत. ’ऑक्टोपस’शिवाय कोणतेही साहित्य न लागल्यामुळे खर्चाचे प्रमाण कमी होते. हृदयक्रिया सतत चालू असल्यामुळे रुग्णामध्ये सर्जरीनंतर सुधारणा फार लवकर आणि चांगली होते. गुंतागुंतीचे प्रमाणसुद्धा कमी होते.
 
हृदयविकाराची लक्षणे...
 
रक्तवाहिनीतील अडथळ्यानुसार (ब्लॉकेज) हृदयविकाराची लक्षणे असतात. रक्तवाहिनी अरुंद होऊन ब्लॉक 70 टक्क्यांपेक्षा जास्त असतो, अशा रुग्णांना चालल्यानंतर छातीत दुखणे, दम लागणे किंवा अस्वस्थ वाटणे आणि थांबल्यावर दोन ते पाच मिनिटांत बरे वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. (अंजायना)
 
बरेचदा मधुमेह, अस्थमा, अतिरक्तदाब किंवा खूप वयस्क व्यक्तींमध्ये अंजायना दुखणे हे लक्षणे आढळत नाहीत. अशा व्यक्तींमध्ये चालल्यानंतर दम लागणे, थकवा येणे, ढेकर येणे, चक्कर येणे अशी कमी प्रमाणात दुखण्याची लक्षणे किंवा दुखण्याव्यतिरिक्त लक्षणे दिसून येतात.
 
काही लोकांना छातीत न दुखता, घशामध्ये किंवा मानेमध्ये दुखणे, उजव्या डाव्या दंडामध्ये वेदना होणे, पोटामध्ये किंवा पाठीमध्ये दुखणे यांसारखी लक्षणे दिसतात.
 
काही वेळा बसल्या बसल्या किंवा आरामदायी अवस्थेतसुद्धा तीव्र वेदना होणे, छातीच्या मध्यभागी डाव्या बाजूला खूप दुखून येणे, हे दुखणे 20 मिनिटे ते 30 मिनिटांच्या अधिक राहणे किंबहुना वाढतच जाणे, दोन्ही दंडामध्ये मान-घशाच्या ठिकाणी तसेच पाठीच्या मध्यभागी या दुखण्याची व्याप्ती होणे, सोबतच दरदरून घाम येणे, उलटी होणे, चक्कर येणे, खूपच थकवा येणे, ग्लानी येणे यांसारखी लक्षणे दिसतात (हार्ट अ‍ॅटॅक - हृदयविकाराचा झटका)
 
प्रत्येक व्यक्तीला वरीलप्रमाणे लक्षणे दिसतीलच, असे नाही. तरी, 70 टक्के व्यक्तींमध्ये अशी लक्षणे दिसतात.
 
हृदयविकाराचा झटका आल्यावर काय करावे?
 
जेव्हा हृदयाची कोरोनरी रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होते, रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित होतो, तेव्हा हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते. ते दुर्बल बनतात. याला हृदयविकाराचा झटका आला, असे म्हणतात.
 
योग्य उपचार लवकर मिळाले नाहीत, तर हृदयाच्या स्नायूचे न भरून येण्यासारखे कायमचे नुकसान होते. हृदयाची कार्यक्षमता कमी होते. हृदयाची रक्तवाहिनी जेवढी जास्त वेळ बंद राहील. तेवढेच हृदयाचे जास्त नुकसान होते.
 
जितक्या लवकर हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपचार होतील, त्या प्रमाणात हृदयाच्या स्नायूंची इजा व नुकसान कमी होते. म्हणूनच हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसल्यावर वेळ न दवडता औषधोपचार सुरू करणे, हे अत्यावश्यक असते.
 
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असलेल्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर आरामशीर झोपवावे. अंगावरचे घट्ट कपडे सैल करावे. फोन करून लवकरात लवकर रुग्णवाहिकेला बोलावणे, रुग्णाला रुग्णवाहिकेतूनच किंवा कोणत्याही चारचाकी अथवा ऑटोरिक्षामधूनच रुग्णालयात न्यावे. चालत नेणे किंवा दुचाकी टाळावी.
 
जर जवळपास डॉक्टरचे क्लिनिक असेल, तर डॉक्टर रुग्णवाहिका येईपर्यंत रुग्णाला ‘अ‍ॅस्पिरीन’ ही रक्त पातळ करणारी गोळी देतो. तोंडात विरघळणारी एक ‘अ‍ॅस्पिरीन’ (ऊळीिीळप-325ास) गोळी रक्तवाहिनीत अडकलेल्या रक्ताच्या गुठळी विरघळण्यास मदत करते. जर रुग्णाचा रक्तदाब नॉर्मल असेल, तर त्याला ‘सॉर्बिट्रेट’ (डेीलळीींरींश) नावाची ‘नायट्रोग्लिसरीन’ची गोळी जिभेखाली ठेवण्यासाठी देण्यात येते, जर उपलब्ध असेल तर डॉक्टर ‘क्लोपीडील’, ‘स्टाटीन्स’च्या गोळ्या आणि ‘इनॉस्कॉपॉरिन’ नावाचे इंजेक्शन चामडीच्या आत देऊ शकतो. पण, रुग्णाला लवकरात लवकर सर्व सुविधा असलेल्या ‘आयसीसीयू’मध्ये स्थलांतरित करणे आवश्यक असते.
 
डॉ. गजानन रत्नपारखी
 हृदयरोग तज्ज्ञ
 
अग्रलेख
जरुर वाचा
बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाच्या पत्नीला घेऊन झाला फरार

बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाच्या पत्नीला घेऊन झाला फरार

Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्य..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121