सामाजिक, राजकीय असो किंवा सांस्कृतिक मुद्द्यांवर अमेरिकेत यापूर्वी अनेकदा आंदोलनांचा भडका उडाला. 1960 दरम्यान झालेले नागरिक हक्क आंदोलन, त्यानंतरच्या मधल्या काळात झालेले व्हिएतनाम युद्धविरोधी आंदोलन, महिला अधिकार आंदोलन, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ यांसारख्या काही आंदोलनांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. सामाजिक अन्याय, राजकीय मतभेद, आर्थिक समस्या, पर्यावरणाचे प्रश्न ही या आंदोलनांमागची काही ठळक कारणे. सध्या सुरू असलेले ‘हॅण्ड्स ऑफ’ आंदोलन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ‘डॉज’ (डीओजीई)चे प्रमुख एलॉन मस्क यांच्या धोरणांविरोधात आहे. याला आजवरचे सर्वांत मोठ्या स्वरुपात झालेले आंदोलन म्हणता येईल. अमेरिकेतील हजारो संतप्त नागरिकांनी ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात देशभरात निदर्शने केली. एक-दोन नव्हे, तर अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये 1 हजार, 200 हून अधिक ठिकाणी तथाकथित ‘हॅण्ड्स ऑफ’ निदर्शने करण्यात आली आहेत. ‘नागरी हक्क संघटना’, ‘कामगार संघटना’, ‘एलजीबीटीक्यू’, निवडणूक कर्मचारी अशा अनेक दिग्गजांसह दीडशेहून अधिक संघटनांनी या निषेधांमध्ये सहभाग घेतला. शांततेत होणार्या या आंदोलनात अद्याप कोणालाही अटक झाल्याची माहिती नाही.
अमेरिकेतील मिडटाऊन मॅनहॅटनपासून अँकरेज, अलास्कापर्यंत शहरांमध्ये आणि अनेक राज्यांच्या राजधानीत हजारो निदर्शकांनी फलकांसह रॅलीज काढल्या. या सर्व रॅलींमध्ये फेडरल एजन्सी, अर्थव्यवस्था, इमिग्रेशन आणि मानवाधिकार अशा विविध मुद्द्यांना धरून जोरदार टीका करण्यात आली. अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरील सिएटलच्या प्रसिद्ध स्पेस नीडलजवळ जमलेल्या हजारो निदर्शकांनी ‘फाईट फॉर ऑलिगार्की’ अशा आशयाचे फलक हाती घेतले होते. आंदोलकांनी ‘टेस्ला’चे मालक आणि ट्रम्प यांचे विशेष सल्लागार एलॉन मस्क यांच्यावरही आरोप केले आहेत. आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी ते जनतहिताकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांचे म्हणणे. अलीकडेच ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर एलॉन मस्क यांना ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिअन्सी’ या नवीन विभागाचे प्रमुख बनवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर असे आरोप सातत्याने होत आहेत.
याचदरम्यान एलॉन मस्क चर्चेत आले, ते त्यांनी केलेल्या हिंदूंच्या भावना दुखावणार्या एका ट्विटमुळे. खरं तर, स्वस्तिक चिन्ह हिंदूंसाठी पवित्रच. मात्र, एलॉन मस्क यांनी ज्या चिन्हाचा उल्लेख स्वस्तिक म्हणून केला आहे, ते स्वस्तिक नाही. ते नाझीद्वेषाचे प्रतीक असलेले ‘हेकेनक्रूझ’ चिन्ह होते. दि. 31 मार्च रोजी एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील एका व्हिडिओवर कमेंट करत रिट्विट केले. त्यात ‘टेस्ला’ गाडीचा मालक आणि एका अनोळखी व्यक्तीचा एकमेकांशी वाद होताना दिसत होते. त्या अनोळखी माणसाने ‘टेस्ला’ ईव्हीवर नाझी चिन्ह लावले होते. त्याबाबत एलॉन मस्क यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्या चिन्हाचा ‘स्वस्तिक’ म्हणून उल्लेख केला आणि म्हटले की, “ज्याने ‘टेस्ला’वर स्वस्तिक काढले, त्याने स्पष्टपणे द्वेषपूर्ण गुन्हा केला आहे.” प्रत्यक्षात ते नाझी हेकेनक्रूझ चिन्ह होते, जे द्वेषाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे एलॉन मस्कना चांगलेच लक्ष्य करण्यात आले होते. आपण पाहिले तर, प्रामुख्याने सिएटल, वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क या भागांत निदर्शने झाली. मात्र, याशिवाय आंदोलकांनी ठिकठिकाणी पोस्टर, बॅनरच्या माध्यमातूनही आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.
एकूणच काय तर ‘ट्रम्प नको’ म्हणून अमेरिकेत पुन्हा एकदा जनक्षोभ उसळताना दिसतो. लोकांचा रोष समजूही शकतो, पण यामागे अमेरिकन ‘डीप स्टेट’चा हात आहे, हादेखील गंभीर प्रश्न. आधीच ट्रम्प यांच्या व्यापारयुद्ध भडकावणार्या धोरणांमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला हादरे बसत असताना, अशांत अमेरिकेकडे गुंतवणूकदार पाठही फिरवू शकतात. ट्रम्पभयामुळे आधीच मलिन झालेली अमेरिकेची प्रतिमा आणखीन धुळीस मिळविण्यासाठीही ट्रम्प विरोधकांनी ही नामी संधी साधल्याची चर्चाही आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ट्रम्प हे आंदोलन कसे हाताळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.