मुंबई : सायबर गुन्हेगारी रोखणे तसेच सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, ७ एप्रिल रोजी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आझाद मैदान पोलीस स्थानकातील उत्कर्ष सभागृहात मुंबई पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गृह राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीसांच्या नवीन मोटर सायकल, इंटरेप्टर व्हेईकल, फॉरेन्सिक लॅब व्हॅन, निर्भया पथकाच्या व्हॅन यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आल्या.
हे वाचलंत का? - दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट! 'त्या' डॉक्टरांचा राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असून हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे. महाराष्ट्र हा सायबर गुन्हेगारी नियंत्रणामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई पोलीसांची सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता मोठी आहे. सायबर गुन्ह्याच्या एका प्रकरणात १२ कोटी रुपये वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. भविष्यातील सायबर गुन्ह्यांचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दलाने आतापासूनच अनेक उपक्रम हाती घेतले असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी महत्वाचे असलेले अत्याधुनिक तीन सायबर लॅब उभारण्यात आले आहे. डिजिटल अरेस्टसारख्या प्रकरणांमध्ये चांगले सुशिक्षित लोकही पैसे देत असल्याचे दिसते. त्यामुळे सुशिक्षित असलेल्या डिजीटल अशिक्षितांनाही शिकवण्याची गरज असून त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. यासाठी मुंबई पोलीस विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगत या उपक्रमात साथ देणारे अभिनेते आयुष्यमान खुराणा आणि निर्माते साहित कृष्णन यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
महिलांविषयीच्या गुन्ह्यांच्या नोंदणीत वाढ
केंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कायदे हे खऱ्या अर्थाने भारतीय असून गुन्हे प्रकटीकरण, पुरवा याविषयीच्या कायद्यामुळे आता गुन्ह्यांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. महिलांमध्येही आता बदल होत असून पुर्वी समाजिक दबावांमुळे महिलांविषयीच्या गुन्ह्यांची नोंदणी कमी होती. आता त्यात वाढ झाली, ही एक चांगली बाब आहे. महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठी आणि महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा यासाठी पोलीस स्थानकांमध्ये महिला व बाल सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे महिलांविषयीचे गुन्हे नोंदवताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही याची खात्री आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुंबई पोलीस दलाकडून १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे पालन
शासनाने प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कार्यक्रम आखुन दिला होता. या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट पालन मुंबई पोलीस दलाने केले आहे. पोलीस दलाचा कायाकल्प झाला आहे. याशिवाय राज्यात महिला पोलीस स्थानक उभारण्याऐवजी प्रत्येक पोलीस स्थानकामध्ये महिला पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नेमणूक करून पोलीस दलाचे कामकाज जास्तीत जास्त महिलाभिमुख करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुढील कामांचे लोकार्पण :
पार्क साईट पोलीस ठाणे इमारतीचे डिजिटल स्वरुपात लोकार्पण
निर्भया प्रकल्पांतर्गत महिला व बाल सहाय्यता कक्षांचे लोकार्पण
व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) प्रणालीचे उदघाटन
पोलीस ठाणे 'एक्स' हॅंडल सुविधा कार्यान्वयन व लोकार्पण
'मिशन कर्मयोगी'चे कार्यान्वयन
'सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३०'च्या जनजागृतीकरीता व्हिडिओ लोकार्पण