
( Chief Ministers Relief Fund and Charity Hospital Help Desk ) आरोग्यदायी जीवन ही मनुष्य प्राण्याची गरज. बदलत्या काळानुसार आरोग्यसेवा देणार्या आणि घेणार्या अशा दोन्ही वर्गांच्या प्राथमिकता बदलत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या ग्रामीण भागांत वैद्यकीय सेवा आणि तातडीने उपचार देणे, हे आव्हानात्मकच. विशेषकरुन ‘नाही रे’ वर्गाकरिता उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. यासोबतच आर्थिकदृष्ट्या गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्ष’ सक्षमतेने कार्यरत आहे. असंख्य नागरिकांना या वैद्यकीय कक्षाने नवे जीवन दिले आहे. खेड्यापाड्यांत, वाडीवस्तीवर गरजू नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नवनव्या योजना आणि उपक्रम या कक्षाच्या माध्यमातून राबविले जात आहेत. आज ‘जागतिक आरोग्य दिना’निमित्ताने महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेत वरदान ठरलेल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत, ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्षा’च्या कामगिरीचा आढावा घेणारा हा लेख...
सर्वप्रथम ‘जागतिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. ‘जागतिक आरोग्य संघटने’ची (थकज) स्थापना दि. 7 एप्रिल रोजी झाली. ‘डब्ल्यूएचओ’च्या स्थापना दिनानिमित्त ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली. आरोग्य दिनाचा उद्देश जगभरातील देशांमध्ये समान आरोग्य सुविधांचा प्रसार करण्यासाठी लोकांना जागरुक करणे, आरोग्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आणि जागतिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे आणि त्या कल्पनांवर काम करणे, हा आहे. या दिवशी आरोग्य सेवा, सुविधा आणि काळजी या विषयांवर जनजागृती मोहीम राबविली जाते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्षम व आरोग्यदायी भारत घडविण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या घोषणेच्या माध्यमातून राज्यातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार करत आहे. यात प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळेच ‘आयुष्मान भारत’ व ‘महात्मा जोतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजना’ या योजनांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविल्या जात आहेत. त्यात रु. पाच लाखांपर्यंतच्या उपचाराचा खर्च सरकारमार्फत करण्यात येतो. याच धर्तीवर राज्यातील संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्ष’ गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे.
आरोग्यदायी जीवनाचे महत्त्व आजारी पडल्यावरच कळते, अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. निरोगी आणि सुदृढ समाजासाठी प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम स्थितीत असणे आवश्यक असते. उत्तम आरोग्याची ही निकड ओळखूनच महाराष्ट्र शासनाने आरोग्यसेवेला प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्या, यासाठी आरोग्य विकास क्षेत्रासाठी राज्य शासनाने आर्थिक तरतुदीत भरीव वाढ केली आहे. चालू वर्षी 3 हजार, 827 कोटी रुपये एवढा निधी आरोग्यसेवेसाठी मंजूर करण्यात आला आहे.
आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारचे एकूणच काम पाहात असताना माझी अशी धारणा आहे की, प्रशासनात काम करताना संवेदनशीलता फार गरजेची आहे. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून काम केले, तर त्याचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत नक्कीच मिळतो. राज्यात आरोग्यसेवा आणखी बळकट करण्याचा आणि सर्वदूर पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी अनेकविध उपाययोजना राबविल्या आहेत. मला आशा आहे की, आरोग्यसेवा लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. आरोग्यासंबंधी मूलभूत उपाययोजना राबविण्यासाठी आम्ही ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्ष’च्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत.
राज्यभरात आरोग्य शिबिरे
राज्यातील एकही गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्षा’च्या माध्यमातून राज्यभरात आरोग्य शिबिरे राबविली जात आहेत. राज्यातील अनेक रुग्ण पैशांच्या कमतरतेमुळे उपचार घेऊ शकत नाहीत. त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी राज्यात गटनिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. यात गरीब वस्ती, तांडे, बैठ्या वसाहती, आदिवासी पाडा यांचा समावेश आहे. या शिबिरांमध्ये रुग्णांची प्राथमिक आरोग्य चाचणी केली जात असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. यांसह रुग्णावर आवश्यकतेनुसार पुढील उपचारही ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्षा’च्या माध्यमातून केले जाणार आहेत.
विविध सेवाभावी संस्था, रुग्णालये यांच्यासमवेत सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक साहाय्य देण्याकरिता ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ निरंतर कार्यरत आहे. सद्यस्थितीत कक्षाच्या माध्यमातून 20 मोठ्या आजारांसाठी अर्थसाहाय्य दिले जाते. या 20 आजारांव्यतिरिक्त अन्य आजारांसाठी मदत करण्याचा कक्षाचा संकल्प आहे. राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्षा’च्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्था, रुग्णालये यांच्यासमवेत सामंजस्य करार केले जात आहेत. या सामंजस्य कराराला अनुसरून निर्धन रुग्णांवर पूर्णतः मोफत उपचार करण्यात येणार आहेत. करारामध्ये ठरल्याप्रमाणे काही रुग्णांचा वैद्यकीय खर्च रुग्नालय, तर काही ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ करणार आहे.
20 आजार वगळता, ज्या आजारांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’च्या माध्यमातून अर्थसाहाय्य दिले जात नाही, अशा आजारांवर रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार होणार आहेत. तसेच, उपचारासाठी आवश्यक असलेला खर्च रुग्णालयाच्या माध्यमातून केला जाणार आहे. तरी सेवाभावी संस्था, रुग्णालये, दात्यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्षा’शी सामंजस्य करार करावा आणि या महत्त्वाच्या योजनेत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मी या कक्षाच्यावतीने करतो. समाजातील दानशूर व्यक्तींनीदेखील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’स सढळ हाताने मदत करावी, जेणेकरून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’च्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना आर्थिक मदत करता येईल. राज्यातील गरजू रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कक्षाद्वारे देण्यात येणार्या सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच, या कक्षाद्वारे देण्यात येणार्या मदतीची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील संवेदनशील घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील मी करतो.
या गंभीर आजारांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’मार्फत मिळते अर्थसाहाय्य
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’च्या माध्यमातून 20 मोठ्या आजारांवर अर्थसाहाय्य दिले जाते. यात ‘कॉकलियर इम्प्लांट’ (वय वर्षे दोन ते सहा), हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडणी प्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग (केमोथेरपी-रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण (चङउ) आणि विद्युतअपघात रुग्ण या आजारांचा समावेश आहे.
‘सीएमआरएफ’ नंबरमुळे अर्थसाहाय्य प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’च्या माध्यमातून रुग्णांना सादर केलेल्या अर्जांसाठी आता थेट ‘सीएमआरएफ’ नंबर दिला जातो. यामुळे अर्थसाहाय्य मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी झाली आहे. पूर्वी रुग्णाला अर्ज सादर केल्यानंतर प्रथम ‘अ नंबर’ दिला जात असे. मात्र, आता ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्षा’कडे अर्ज सादर होताच अर्जाची छाननी (स्क्रूटिनी) केली जाते. यात काही त्रुटी असल्यास अर्जदारांना कळविले जाते. अर्जात काही त्रुटी नसल्यास थेट ‘सीएमआरएफ’ नंबर दिला जातो. यासाठी एक डॉक्टर, कॉलिंगसाठी एक व्यक्ती आणि दोन ऑपरेटर अशी टीम तैनात करण्यात आली आहे. पूर्वीच्या किचकट प्रक्रियेमुळे रुग्णांना अर्थसाहाय्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, नवीन सुधारित कार्यपद्धतीमुळे अर्थसाहाय्य मिळण्याची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक झाली आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’च्या या सुधारणेमुळे गरजू रुग्णांना अधिक जलद आणि प्रभावी मदत मिळेल, असा माझा विश्वास आहे.
एका महिन्यात 22 कोटींची मदत
राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजूंसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्षा’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य दिले जाते. मार्च महिन्यात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’मार्फत तब्बल 2 हजार, 517 रुग्णांना तब्बल 22 कोटींहून अधिकची मदत करण्यात आली असून, सर्वाधिक मदत ही मेंदू विकारांवरील उपचारांसाठी करण्यात आली आहे. मार्च महिन्यात मेंदू विकारांवरील उपचारांसाठी 471 रुग्णांना मदत करण्यात आली. तसेच कर्करोगावरील उपचारांसाठी 421 रुग्णांना, ‘हिप रिप्लेसमेंट’च्या 306 रुग्णांना, अपघातामधील शस्त्रक्रियेसाठी 247 रुग्णांना, हृदयविकारांवरील उपचारांसाठी 239 रुग्णांना, अपघातासंबंधित 184 रुग्णांना, गुडघा प्रत्यारोपण 150 रुग्णांना, बालरोगांवरील उपचारांसाठी 145 रुग्णांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्यात आले. “आर्थिक संकटात सापडलेल्या रुग्णांसाठी हा मदतीचा हात त्यांचे दुःख हलके करण्याचे कार्य करतो,” असे भावनिक उद्गार अनेक लाभार्थी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले आहेत.
आदिवासी पाड्यांसाठी लवकरच सुरू होतोय ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ उपक्रम
राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये राहणार्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरच सुरू होणार आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’च्यावतीने राबविल्या जाणार्या या उपक्रमामुळे आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये राहणार्या नागरिकांना थेट त्यांच्या दारात वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. ‘हॉस्पिटल ऑन व्हील’मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेली फिरती रुग्णवाहिका असणार आहे. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी सेवा देतील. प्राथमिक आरोग्य तपासणी, औषधोपचार, लघु वैद्यकीय प्रक्रिया आणि आवश्यकतेनुसार गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्याची सोय यात असेल. राज्यातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये ही सेवा पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यसेवेसाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही.
468 रुग्णालयांत उपचार
या कक्षामार्फत आता राज्यातील 468 रुग्णालयांत उपचार घेणे शक्य होणार आहे. रुग्णालयांची यादी कक्षाच्या हीींिीं://लहरीळीूांशवळलरश्रहशश्रविशीज्ञ.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप/केाश/रर्लेीींणी या संकेस्थळावर उपलब्ध आहे. कक्षाने घेतलेल्या पुढाकारामुळे आणि वाढवलेल्या व्याप्तीमुळे रुग्णांना राज्यातील 468 रुग्णालयांत उपचार घेणे शक्य होणार आहे. यात सुमारे 12 हजार खाटा उपलब्ध आहेत. यात सहा हजार निर्धन वर्गासाठी, तर सहा हजार खाटा दुर्बल घटकांसाठी आरक्षित आहेत. विशेष म्हणजे, निर्धन घटकासाठी उपचार हे विनाशुल्क असणार असून, दुर्बल घटकांवरील उपचार सवलत दराने केले जाणार आहेत.
सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’
महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या मोठे राज्य आहे आणि राज्याचा कारभार हा मुंबईकेंद्री आहे. त्यामुळेच ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा’च्या कामाच्या विकेंद्रीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. मदतीसाठी विदर्भ, मराठवाड्याच्या दुर्गम भागांतून वेळ आणि पैसे खर्च करून मुंबईला खेटे मारावे लागू नयेत, यासाठी राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक साहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक साहाय्य देण्याकरिता मंत्रालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा शासननिर्णय काढण्यात आला आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात.
नव्या निर्णयामुळे नागरिकांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’च्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. संबंधित जिल्ह्यातील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’स प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, कक्षामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यास साहाय्य करणे, ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’बाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, तसेच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’मार्फत अर्थसाहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसाहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे, यांकरिता राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
यामुळे अर्थसाहाय्य देण्यात येणार्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून, उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने अर्थसाहाय्याच्या रकमेचादेखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे.
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदतकक्ष’ हा महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या कक्षाच्या कामकाजाला गती मिळाली आहे. आधुनिकतेबरोबरच सर्वदूर व्यापकता आणि गतिमान कारभार ही या कक्षाची वैशिष्ट्ये आहेत. सरकार हे जनतेचे असते आणि जनतेसाठी असते. ‘नाही रे’ वर्गाला मदत करण्यासाठी सरकारबरोबरच ‘आहे रे’ वर्गानेही हातभार लावणे आवश्यक आहे. म्हणूनच या कक्षाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच कक्षाला आर्थिक मदत देण्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प आजच्या जागतिक आरोग्य दिनी करूया!
लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चे कामकाज अधिक सुलभ व ‘पेपरलेस’ करण्यात येत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः ‘पेपरलेस’ करण्यात येणार असून, या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च टाळता येणार आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’मध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘धर्मादाय रुग्णालय मदतकक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल)’ आणि ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल)’ एकत्रित जोडण्यात येणार आहेत. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा ‘एओ क्रमांक’ आणि ‘एम क्रमांक’ एकत्र करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील, सोपी होणार आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा आहे.
रामेश्वर नाईक
कक्षप्रमुख, मुख्यमंञी सहाय्यता नीधी