बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करण्यासाठी ७ दिवसांत अहवाल द्या! मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश
07-Apr-2025
Total Views | 10
मुंबई : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या दिवशी वेबसाईवर ताण येऊ नये तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सदर वेबसाईटचे टेस्टिंग करून वेबसाईटची क्षमता वाढवण्यासाठी आणि सायबर सुरक्षित करण्यासाठी येत्या सात दिवसांत अहवाल तयार करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले.
सोमवार, ७ एप्रिल रोजी मंत्री आशिष शेलार यांनी दहावी, बारावी निकालाच्या वेबसाईटबाबत आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा बोर्डाचे अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी आणि सचिव सदाम आंधळे या बैठकीला उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्रातील लाखो मुले एकाच वेळेस वेबसाईटवर लॉगीन करुन निकाल बघतात. अशावेळी सदर वेबसाईटवर ताण येऊन ती साईट क्रॅश होते आणि मुलांची गैरसोय होते. सदर वेबसाईट प्रणालीचे सतत लोड टेस्टिंग करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सध्याच्या वेबसाईटच्या क्षमतेचा तसेच त्या वेबसाईटची क्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत अहवाल तयार करा. सायबर सुरक्षा हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे यासाठी काय करावे लागेल याचाही अहवाल सात दिवसात द्या," असे निर्देश त्यांनी दिले.