मुंबई: ( Amar Core Vidyalaya 44th anniversary and Aaple book release ceremony ) शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी अमर कोर विद्यालयाचा ४४ वा वर्धापन दिन शाळेचे संचालक मा.ना. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शिक्षक चळवळीतील युवा नेते आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशन तज्ज्ञ संचालक डॉ विशाल कडणे, शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, समर्थ अध्यापक विद्यालयाच्या किमया कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शाळेचे सचिव जीवन म्हात्रे, सदस्या शैलजा ठाकूर, सदस्य गावकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक साईनाथ हांडे, आणि विद्यार्थी, पालक यांच्या मोठ्या समूहासह शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या शुभप्रसंगी शाळेचे शिक्षक प्रमोद महाडीक संकल्पित व विद्यार्थी लिखित ‘आपले’ या शैक्षणिक पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. पुस्तक प्रकाशनास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्ररूपी शुभेच्छा पाठवल्या.
शाळेच्या वर्धापनदिनी प्रमोद महाडीक यांनी शाळेला या पुस्तक रूपाने अमूल्य भेट दिली. वडापावचे, चार्जरचे, अंधाराचे, पोटातील आतड्यांचे, मृत्यूचे असे विविध अंगी आत्मवृत्त लेखन तर गर्भाशयातील मुलीने आईला लिहिलेले पत्र, मुलांनी बाबांना लिहिलेले पत्र, मानवतेने मानवाने लिहिलेले पत्र, अशा नाविन्यपूर्ण पत्र लेखनाचे नमुने या पुस्तकात अंतर्भूत आहेत. शाळेचे संचालक म्हात्रे सरांनी प्रमोद महाडीक सर तसेच नवोदित विद्यार्थी लेखकांचे कौतुक केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आम्ही विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य संपादित करण्यात यशस्वी ठरलो आहोत, असा विश्वास व्यक्त केला.
शाळेचा ४४ वर्षाचा यशस्वी आलेख सन्माननीय. श्री. म्हात्रे सरांनी मांडला. उपस्थित असलेले प्रमुख अतिथी डॉ विशाल कडणे यांनी कौतुकाची थाप शाळेतील शिक्षक प्रमोद महाडीक यांना दिली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक तर केलेच पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पुस्तकात मांडलेले विचार इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तकाच्या शंभर प्रति सुद्धा घेतल्या. शाळेतील अधिकाधिक मुलांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी आणि त्यासाठी प्रशिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन डॉ विशाल कडणे दिले.
शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय पवार यांनी शाळेचा संपूर्ण ४४ वर्षाचा इतिवृत्त कथन केला, तर माध्यमिक विभागाचे साईनाथ हांडे सर यांनी ४४ वर्षाच्या वाटचालीत अमर कोर विद्यालयातील यशस्वी गाथा वर्णन केली आणि उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.