मुंबई : रामानंद सागर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली 'रामायण' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही अढळ स्थान मिळवून आहे. या मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मण या भूमिकांमुळे संबंधित कलाकार घराघरांत पोहोचले. अरुण गोविल यांनी रामाची, तर दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. या जोडीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून आजही त्यांचं तितकंच प्रेम मिळतं.
या लोकप्रिय जोडीला पुन्हा एकत्र पाहण्याची संधी तब्बल ३७ वर्षांनंतर प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘वीर मुरारबाजी… पुरंदर की युद्धगाथा’ या हिंदी चित्रपटात अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया हे छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. श्रीरामनवमीच्या निमित्ताने या चित्रपटाचं आकर्षक पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्यामधील त्यांचा पारंपरिक मराठमोळा लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो आहे.
चित्रपटाची निर्मिती भाऊसाहेब आरेकर यांनी केली असून दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केलं आहे. ऐतिहासिक चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी मिळणं ही आनंदाची बाब असल्याचं मत अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी व्यक्त केलं. “शहाजीराजे आणि जिजाऊसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांची भूमिका साकारताना एक मोठी सामाजिक जबाबदारी असते,” असंही ते म्हणाले.
या चित्रपटातून पुरंदरच्या लढाईत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा प्रेरणादायी इतिहास मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. स्वराज्याच्या इतिहासात ‘काळभैरव’ म्हणून ओळखले जाणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी… पुरंदर की युद्धगाथा’ या चित्रपटातून उलगडली जाणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.