मुंबई: ( mohan bhagvat ) “जातीच्या बंधनातून उठून माळेप्रमाणे एकजूट व्हा. हिंदू समाजातील सर्व पंथ, जाती, समाज एकत्र आले पाहिजेत. ही संघाची दृष्टी आहे. संघाचा अर्थ सर्वांना मदत करणे आणि युवाशक्तीला योग्य दिशा देणे, असा आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी केले.
उत्तर प्रदेशातील ‘आयआयटी बीएचयू’च्या विद्यार्थ्यांशी सरसंघचालकांनी शनिवारी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. ‘आयआयटी बीएचयू’च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत सरसंघचालकांनी विद्यार्थ्यांना संघाविषयी प्रश्न विचारले. त्यावर विद्यार्थी म्हणाले, “संघ म्हणजे हिंदुत्वाचा पुरस्कार करणे आणि सनातनचे रक्षण करणे.
” त्यावर सरसंघचालक म्हणाले, “संघ संघटनेचा उद्देश हिंदू धर्म मजबूत करणे, हिंदुत्वाची विचारधारा समाजापर्यंत पोहोचवणे आहे.” यादरम्यान उपस्थित १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सरसंघचालकांसमोर योगासने आणि खेळांची प्रात्यक्षिके दाखविली. तसेच वैदिक मंत्रांचे पठणदेखील केले.