( Vidarbha Markanda Temple ) नागपूरपासून 150-200 किमी अंतरावर असणार्या चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांकडे आपण आजही ‘सांस्कृतिक पर्यटन’ या दृष्टिकोनातून बघत नाही. विदर्भाचा हा भाग आजही महाराष्ट्र आणि भारत या दोन्हींच्या दृष्टिकोनातून पर्यटनासाठी खूप मागे असलेला भाग आहे. ताडोबामध्ये असलेल्या वाघांपलीकडे आपला या जागेशी परिचय नाही. निसर्गाने भरभरून वरदान दिलेल्या या भागावर महान आणि पराक्रमी वाकाटक राजघराण्यापासून ते जगन्नाथाची बंद पडलेली रथयात्रा सुरू करणार्या नागपूरकर भोसल्यांपर्यंत अनेक पराक्रमी राजांनी राज्य केलेली ही भूमी आहे. गौण्ड राजांनी इथली संस्कृती जपली आणि सांभाळली. या अतिशय सुंदर भागामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक आणि कलात्मक इतिहास या सर्वच दृष्टीने फारसे लोकांना परिचित नसलेले, परंतु एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर म्हणजेच मार्कंडा मंदिर.
र्कंडा मंदिराकडे जाण्याआधी ते मंदिर तिथेच का आहे, याचा थोडासा भौगोलिक आढावा आपण घेऊया. मध्य प्रदेशमधून निघणारी वैनगंगा नदी ही इथून वाहात वाहात पुढे जाते. पण, बरोबर याच गावाच्या ठिकाणी ही दक्षिणवाहिनी नदी काही काळ उत्तरवाहिनी होते. अशा पद्धतीने नदीचे बदलणारे प्रवाह, संगमाच्या जागा इत्यादी ठिकाणी त्यांचे नैसर्गिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन वेगवेगळ्या मंदिरांची निर्मिती झाली. नैसर्गिकरित्या महत्त्वाच्या जागी बांधलेल्या मंदिरांची उदाहरणे आपल्याला भारतभर बघायला मिळतात; त्यातीलच हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर.
वैनगंगा नदीकाठी मार्कंडा मंदिर, यमधर्म मंदिर, मृत्युंजय मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मृकुंडऋषी मंदिर, उमा शंकर मंदिर, दशावतार मंदिर, हनुमान मंदिर, शक्तिदेवी मंदिर, विश्वेश्वर मंदिर अशा 19-20 मंदिरांचा संग्रह मिळून हे संपूर्ण मंदिराचे प्राकार आपल्याला दिसते. छोट्याशा खेड्यात वसलेला हा भव्य मंदिरसमूह केवढा भव्य आहे, याची कल्पना अगदी आत जाईपर्यंतदेखील आपल्याला येत नाही. या मंदिरसमूहातल्या सर्वांत मोठ्या आणि महत्त्वाच्या मार्कंडा मंदिराबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मंदिर बघितल्या बघितल्या मध्य प्रदेशमधल्या चंदेल राजांनी बांधलेल्या खजुराहोच्या परिपूर्ण मंदिरांची आठवण आपल्याला होते.
मार्कंडा मंदिराची निर्मिती नक्की कुणी केली, याबद्दल आजही अनेक अभ्यासक वेगवेगळे निष्कर्ष मांडतात. पण, परमार नावाच्या राजांनी इथे मंदिर बांधले असावे, असा एक महत्त्वाचा विचारप्रवाह अभ्यासकांमध्ये दिसतो. या मंदिराला जगती किंवा ओटा आता दिसत नाही, जे खजुराहोतल्या मंदिरांचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. अभ्यासकांच्या मते, मधल्या काही शतकांमध्ये ही जगती जमिनीखाली गाडली गेलेलीसुद्धा असू शकते.
या मंदिराचे अधिष्ठान किंवा पाया हा अतिशय देखणी कलाकुसर केलेल्या वेगवेगळ्या पट्ट्यांनी सजलेला आहे. मंदिराचे अधिष्ठान ते छतापर्यंतची जी बाह्य भिंत असते, त्याला मंदिरस्थापत्याच्या परिभाषेत ‘मंडोवर’ असे म्हणतात. या मंडोवरावर ज्या भागांवरती शिल्प असतात, त्यांना ‘जंघा’ असा शब्द आहे. मंडोवरावर शिल्पांच्या एकावर एक किती रांगा आहेत, यावरून त्याचे वर्णन ठरते. मार्कंडा मंदिराच्या मंडोवरावर एकावर एक अशा शिल्पांच्या तीन रांगा आपल्याला दिसतात. त्यामुळे याला आपण ‘त्रिजंघायुक्त मंदिर’ असे म्हणू शकतो. समृद्ध जंघायुक्त मंदिरे ही खजुराहोचीदेखील आहेत. कदाचित म्हणूनच या सगळ्या गोष्टींमुळे मार्कंडा मंदिर हे खजुराहोच्या मंदिरांची आठवण आपल्याला करून देते.
या मंडोवरावर 400 पेक्षा जास्त देवी-देवता, नायक-नायिका, सुरसुंदरी, व्याल, अष्टदिग्पाल, प्रमुख देवता, रामायण-महाभारतातले प्रसंग हे शिल्पबद्ध केलेले दिसतात. हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या बरोबर समोर एक सुंदर नंदीमंडप दिसतो. इथूनच आपण मंदिरात प्रवेश करू शकतो. मंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्तर आणि दक्षिण बाजूनेदेखील द्वारांची रचना केलेली आहे. मंडपाच्या मधोमध असलेली रंगशिळा ही इतर मंदिरांपेक्षा थोडीशी उंचीवर असलेली दिसते. इथे जाण्यासाठी छोट्या पायर्यादेखील बांधलेल्या आहेत. दुर्दैवाने मंडपाचे मूळ छत आज भग्न झालेले आहे.
आजूबाजूलादेखील चुन्याचा मोठ्या प्रमाणात वापर करून दुरुस्तीचे काम केलेले दिसते. या मंडपातून आपण अंतराळात प्रवेश करतो आणि तिथून काही पायर्या उतरून आपल्याला खाली गर्भगृहात जावे लागते आणि तिथेच वसलेला आहे मार्कंडेश्वर. मंदिराच्या अंतर्भागात अनेक सुंदर सुंदर शिल्पांची रचनादेखील केलेली दिसते. यातली बरीचशी शिल्पे कदाचित नंतरच्या काळात या ठिकाणी ठेवली असावी. या मंदिराच्या द्वाराशाखादेखील खूप लक्षवेधक आहेत.
मार्कंडा मंदिराचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे असणारी अतिशय दुर्मीळ आणि सुंदर शिल्पे. यातल्या काहींचा परिचय आपण इथे करून घेणार आहोत. शिवाचे विलक्षण चतुष्पाद सदाशिव असे एक दुर्मीळ शिल्प इथे दिसते. आठ हात आणि चार पाय अशी दुर्मीळ मूर्ती या मंदिरात आहे. सुदैवाने या मूर्तीचे आठही हात आज चांगल्या अवस्थेत आहेत. चार पाय असलेला शिव, शैव सिद्धांतातले चर्यापाद, क्रियापद, योगपाद आणि ज्ञानपाद हे चार मार्ग किंवा पायर्या सांगत असावा. अशा पद्धतीची मूर्ती खजुराहोमधील कंधार या महादेव मंदिरातदेखील आढळते.
वेगवेगळे साधक वेगवेगळ्या देवतांची उपासना करत असतात. या अनेक वेगवेगळ्या मतांमधून एकवाक्यता निर्माण करण्यासाठी आणि वेगवेगळ्या देवतांच्या उपासकांना एकत्र आणण्यासाठी काही मिश्र मूर्ती तयार केल्या गेल्या. शिव आणि विष्णू यांची एकत्रित हरिहर मूर्ती असते, हे आपल्या सर्वांना परिचित आहेच; पण याहीपुढे जाऊन ब्रह्म, विष्णू, शिव आणि सूर्य अशा चार वेगवेगळ्या देवतांना एकत्र करून एक अतिशय सुंदर मूर्ती घडवली गेली. या मूर्तीला ‘ब्रह्मेशानजनार्दनार्क’ किंवा ‘हरिहरपितामहार्क’ अशा नावाने ओळखले जाते.
या ठिकाणी ब्रह्म म्हणजे पितामह, शिव म्हणजे ईशान, विष्णू म्हणजे जनार्दन आणि सूर्य म्हणजे अर्क होय. सात अश्वांच्या रथावरती ही मूर्ती आहे, हे झाले सूर्याचे लक्षण. हातांमध्ये असणारा शंख आणि चक्र ही झाली विष्णूची लक्षणे. स्त्रुवा आणि अक्षमाला ही ब्रह्मदेवाची, तर त्रिशूळ हे शिवाचे लक्षण म्हणून इथे दाखवले आहे. या शिल्पामध्येच भुदेवीदेखील दिसते. तसेच दंड आणि पिंगळ हे सूर्याचे दोन साथीदारदेखील कोरलेले आहेत.
या शिल्पांबरोबरच या मंदिरावर रामायणातील वाली-सुग्रीव युद्ध, सीताहरण, जटायुमरण इत्यादी कथा दिसतात. तसेच महाभारताच्या युद्धातीलदेखील काही प्रसंग इथे कोरलेले आहेत. सरस्वती, गजलक्ष्मी, नरसिंह, कार्तिकेय, चामुंडा, गणपती, भैरव, नटराज आणि अनेक वेगवेगळ्या सुरसुंदरीदेखील इथे कोरलेल्या आहेत. शब्दांच्या बंधनामुळे सर्वांचीच वर्णने इथे करता येणे शक्य नाही, पण आपण हे अद्भुत वैभव एकदा स्वतःच्या डोळ्यांनी नक्की अनुभवायचा प्रयत्न करायला हवा.
इथले उत्तम स्थापत्य, सुंदर शिल्प आणि समृद्ध संकुल, कदाचित याच गोष्टींमुळे मंदिर स्थापत्य आणि मूर्ती शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. देगलूरकर या जागेला ‘चक्रवर्ती देवालय’ म्हणत असावे. महाराष्ट्राच्या एका अपरिचित कोपर्यामध्ये हे सांस्कृतिक वैभव तुमच्या-माझ्यासारख्या मंदिरांवरती प्रेम करणार्या अभ्यासकांच्या, भक्तांच्या आणि पर्यटकांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहे.
मग करणार ना या देवालयाची इच्छा पूर्ण?
इंद्रनील बंकापुरे
7841934774