कम्युनिस्टांच्या अवकृपेने आता 'उडता केरळ'

    06-Apr-2025
Total Views | 12

Udta Kerala displeasure of the Communists
 
( Udta Kerala displeasure of the Communists )  ‘लव्ह जिहाद’विरोधात पहिल्यांदा आवाज उठवणार्‍या केरळमध्ये आता ‘ड्रग्ज जिहाद’नेही उच्छाद मांडला आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेमध्ये, खरेदी-व्रिकी गुन्ह्यांमध्ये केरळचा पहिला क्रमांक आहे. अभ्यासकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक ठिकाण किंवा महाविद्यालये तर सोडाच, शाळांमध्येही ड्रग्जने थैमान घातले आहे. ‘उडता पंजाब’ नव्हे, तर ‘उडता केरळ’ ही दुःखद जाणीव करून देणारा हा लेख.
 
14 वर्षांच्या मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले, म्हणून तिच्या आईबाबांनी तिला रुग्णालयात नेले. उपचार सुरू असतानाच भयंकर वेदनेने ती वारली. मृत्यूच्या अहवालात कारण होते की, अत्यधिक अमली पदार्थांचे सेवन केल्याने तिची मेंदूची नस फाटली होती. तसेच त्या बालिकेवर अनेक वेळा अत्यंत क्रूर पद्धतीने बलात्कार करण्यात आला होता. या मुलीचे आईबाबा दोघेही पोलीस अधिकारी. ही घटना आहे केरळची. केरळमध्ये या घटनेवरून वादळ उठले. भारतीय जनता पक्षाने जाहीर केले की, केरळमध्ये अमली पदार्थांचा विळखा वाढत आहे. यावर केरळच्या कम्युनिस्ट सरकारने भाजपचा दावा नाकारला होता. पण, आज तीन वर्षांनी केरळ हा नशेबाजांची राजधानी झाल्याचे दिसते. नशेचा अत्यधिक वापर होतो, म्हणून पंजाबला ‘उडता पंजाब’ म्हटले गेले होते. पण, केरळची स्थिती पाहून वाटते की, पंजाब नाही, तर ‘उडता केरळ’ आहे.
 
केरळच्या पोलीस तसेच अबकारी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, केरळमधील नशेचा भयंकर बाजार आणि परिणाम उघड झाले आहेत. त्यानुसार केरळमध्ये यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये 588 अल्पवयीन व्यक्तींनी राज्यातील ‘नशामुक्ती केंद्रा’मध्ये उपचार घेतला. दुर्दैव असे की, त्यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होते. तसेच, 2024 साली ‘नशामुक्ती केंद्रा’त उपचार घेणार्‍या बालकांची संख्या 2023 सालच्या तुलनेने 45 टक्क्यांनी वाढली. केरळमध्ये 2024 साली ‘नार्कोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोट्रॉफिक सब्स्टन्स अ‍ॅक्ट’च्या अंतर्गत 27 हजार, 530 गुन्हे दाखल करण्यात आले, तर राज्यातील 472 पोलीस स्थानकांमध्ये 1 हजार, 377 ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होते, याची नोंद करण्यात आली. केरळ पोलिसांनी दि. 22 मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात 7 हजार, 38 आरोपींना अटक केली, तर 7 हजार, 307 खटले दाखल करण्यात आले. ‘ऑपरेशन डी-हंट’ या नावाने राज्यभर कारवाई करण्यात आली आणि एकूण 2 हजार, 288 फरार व्यक्तींना अटक करण्यात आली. ही मोहीम 21 दिवस चालली. या मोहिमेदरम्यान 3.952 किलो हेरॉईन, 461.523 किलो गांजा आणि 5 हजार, 132 एमडीएमए गोळ्या जप्त करण्यात आल्या.
 
ही सगळी आकडेवारी पाहिली की वाटते, साक्षरतेमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला केरळ अमली पदार्थांच्या व्यसनामध्ये कसा गुरफटला गेला?
काही लोकांच्या मते, समुद्र आणि जमीन या दोन्ही मार्गांनी केरळमध्ये प्रवेश सहजशक्य आहे. तसेच, केरळमधले बहुसंख्य लोक या ना त्या कारणाने आखाती देशांत नोकरी करतात. त्यामुळे केरळमध्ये बहुसंख्य लोकांच्या हातात पैसा खुळखुळतो. नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जाही सुधारला आहे, मुक्त स्वातंत्र्य आणि हवे ते विकत घेण्याची भोगविलासी वृत्ती वाढली आहे. त्यातच भौतिकतेला उच्च मानून धार्मिक रितीप्रथा यांच्याबाबतीत दुय्यम भूमिका घेणारे कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून हाती आलेला पैसा अमली पदार्थाच्या नशेत उडवणारे लोक केरळमध्ये तयार झाले. दुसरे असे की, केरळ हे विदेश पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ. पर्यटनासाठी येणार्‍या विदेशी लोकांपैकी अनेकजण अमली पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे अमली पदार्थांची खरेदी-विक्री सर्रास होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, केरळ हे काही वर्षांपासून मुस्लीम दहशतवादाचे केंद्र बनू पाहात आहे.
 
‘पीएफआय’ या दहशतवादी संघटनेचे इथे भक्कम जाळे आहे. त्यामुळे दहशतवाद पोसण्यासाठीही इथे अमली पदार्थांचा उपयोग केला जातो. याचसंदर्भात ‘कॅथोलिक ख्रिश्चन संस्थे’च्या ’सायरो-मालाबार कॅथोलिक चर्च’च्या ‘पलाई’चे बिशप जोसेफ कल्लारांगट यांचे म्हणणेही विचारात घ्यायला हवे. मागे ते म्हणाले की, “जिहादी हे गैर- मुस्लीम युवकांना बरबाद करण्यासाठी ड्रग्जचा वापर करत आहेत. त्यांनी ‘ड्रग्ज जिहाद’ सुरू केला आहे.”
 
बिशप यांच्या विधानाला केरळच्या कम्युनिस्ट पक्षाने कडाडून विरोध केला आणि अर्थातच, काँग्रेस पक्षानेही विरोध केला. या दोन्ही पक्षांचे म्हणणे होते की, बिशप हे ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. केरळच्या मुस्लिमांनीही बिशपचा निषेध केला. आंदोलने वगैरे झाली. मात्र, भाजप पक्षाने आणि समविचारी संघटना संस्थांनी बिशपच्या विधानाचे समर्थन केले.
बिशप कल्लारांगट यांच्या म्हणण्याचा मागोवा घेतला तर काय चित्र दिसते, तर अनेक घटनांमध्ये ड्रग्ज विक्री करताना पकडल्या गेेलेल्या गुन्हेगारांमध्ये एक समान धागा आहे. प्रत्येक घटनेत दोन-तीन मुस्लीम पुरुष आणि त्यांच्यासोबत एक हिंदू युवती किंवा महिला ड्रग्ज विक्री करताना सापडले आहेत.
 
नेमके प्रत्येक गुन्ह्यात सापडलेली हिंदू महिला तिच्या सोबतच्या मुस्लीम पुरुषाची प्रेयसी होती. उदाहरणार्थ, मट्टुम्मल हाऊसमधून ई. के. मोहम्मद अनस आणि एन. पी. शिजिंदस यांना पोलिसांनी पकडले, तेव्हा त्यांच्यासोबत अमली पदार्थांच्या अधीन गेलेली 24 वर्षांची अनु कृष्णा सापडली. चक्करक्कल मोवेनचेरीच्या आरती गिरीश या महिलेला पोलिसांनी एर्नाकुलममध्ये पकडले. तिच्यासोबत बिलाल मोहम्मद होता. कन्नूरमध्ये अपर्णाला 158 ग्रॅम ‘एमडीएमए’ अमली पदार्थासहित पकडले. तेव्हा तिच्याबरोबर यासीर आणि त्याचा भाऊ रिजवान तसेच दिलशीद होता.
 
केरळची सत्य घटना पाहू. अल्ताफ आणि शिल्पा या दोघांना पोलिसांनी पकडले. अल्ताफचे चहाचे दुकान होते. तिथेच तो अमली पदार्थ विकत असे, तर सुशिक्षित चांगल्या घरची शिल्पा एका खासगी कंपनीत कामाला होती. चहा पिण्यासाठी ती अल्ताफच्या दुकानात जाई. अल्ताफने तिच्याशी मैत्री वाढवली. चहा पिता पिता शिल्पाला अमली पदार्थांचे व्यसन लावले. व्यसनामुळे शिल्पाची नोकरी सुटली. नोकरी नाही, घरातून पैसे मिळणार नाहीत, म्हणून मग अमली पदार्थ मिळावेत, म्हणून शिल्पा अल्ताफच्या सांगण्यानुसार अमली पदार्थ विकू लागली. नशेमध्ये असलेल्या शिल्पाचे शारीरिक शोषण तर होत होतेच, त्याशिवाय तिच्यामार्फत अल्ताफ ड्रग्ज विकू लागला. शिल्पाचा वापर करून अल्ताफची आर्थिक स्थिती सुधारली. इतकी की, त्याने चहाचे दुकान बंद केले. शिल्पा ड्रग्ज विकायची, त्या पैशावर अल्ताफ मजा करायचा. ‘लव्ह जिहाद’ नव्हे, ‘लस्ट जिहाद व्हाया नार्को जिहाद’ स्पष्ट करणार्‍या अनेक घटना केरळमध्ये घडल्या.
 
तसेच अमली पदार्थांमुळे नैराश्य आल्याने त्यातून गुन्हा घडलेल्या भयंकर घटनाही केरळमध्येच आहेत. केरळच्या आशिकला अमली पदार्थांचे भयंकर व्यसन लागले. त्याने त्याच्या आईचा सुबैदाचा निर्घृण खून केला. खून का केला, हे सांगताना तो म्हणाला, “व्यसनामुळे त्याचे आयुष्य बरबाद झाले होते. आईने आपल्याला जन्म दिला नसता, तर व्यसन करत फिरलो नसतो. त्यामुळे जन्म देणार्‍या आईचा सुबैदाचा त्याने खून केला.” तर काही महिन्यांपूर्वीच केरळमध्ये अफ्फान नावाच्या युवकाने त्याच्या आजी, काका, काकी, छोटा भाऊ आणि प्रेयसी यांचा खून केला. हा अफ्फानही अमली पदार्थांच्या व्यसनाने आणि नैराश्याने ग्रस्त होता.
 
अशीच एक घटना. 28 वर्षीय शानिदला जाणवले की, पोलीस त्याचा पाठलाग करत आहेत. त्याच्याकडे दोन प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ड्रग्ज होते. पोलिसांना पुरावा सापडू नये, म्हणून त्याने ड्रग्जसहित प्लास्टिकच्या पिशव्या गिळल्या. मात्र, काही वेळातच त्याला त्रास होऊ लागला. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांना उपचारादरम्यान त्याच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या. डॉक्टरांनी शानिदकडे शस्त्रक्रियेची परवानगी मागितली. पण, त्याने ती नाकारली. डॉक्टरांनी त्याच्या पित्याकडे शस्त्रक्रियेची परवानगी मागितली, तर पित्यानेही शानिदच्या शस्त्रक्रियेला परवानगी दिली नाही. शेवटी शस्त्रक्रियेला विलंब लागल्याने शानिद मेला.
 
जीव जात असतानाही शानिदने किंवा त्याच्या पित्याने शस्त्रक्रियेला परवानगी का दिली नाही? तर, अभ्यासकांचे म्हणणे आहे की, शानिद वाचला असता, तर शानिदचे या धंद्यातले सोबती किंवा ड्रग्ज धंद्यातील मुख्य सूत्रधार कोण, याबाबतची माहिती पोलिसांनी शानिदकडून मिळवली असती. ते टाळण्यासाठी शानिदने मृत्यू स्वीकारला. जीव दिला, पण शस्त्रक्रिया केली नाही. ड्रग्ज व्यवसायातील सूत्रधारांची दहशत किती असावी, हे स्पष्ट होते.
 
या घटनांना आळा बसावा, म्हणून सध्या केरळमधील कम्युनिस्ट सरकार अमली पदार्थ आणि नशेविरोधात जागृतीचे अभियान राबवत आहे. अमली पदार्थ धंद्याविरोधात कडक कारवाई करत आहे. केंद्र सरकारही राज्य सरकारच्या या अभियानात सक्रिय आहे. याचबरोबर केरळातील अनेक देशप्रेमी संघटना, संस्था निस्वार्थीपणे या नशेविरोधी लढ्यात उभ्या ठाकल्या आहेत. सगळ्यांना वाटते, आमचे केरळ सुरक्षित व्हायलाच हवे! ‘लव्ह जिहाद’, ‘लस्ट जिहाद व्हाया ड्रग्ज जिहाद’ थांबायलाच हवे. ड्रग्जच्या माध्यमातून भारतीय युवा पिढीची बरबादी थांबायलाच हवी. जगद्गुरू शंकराचार्यांच्या पावन स्मृतिविचारांनी पावन असलेली ही देवभूमी दहशतवाद आणि पूर्णतः नशेच्या विळख्यात जाण्यापासून वाचायलाच हवी.‘उडता केरळ’ नको, तर नव्याने ‘देवभूमी केरळ’च हवा!
 
केरळमध्ये अमली पदार्थव्यापार आघाडीवर
 
पंजाबमध्ये नशेचा व्यापार आघाडीवर आहे, असे पूर्वी चित्र होते. मात्र, नशाविरोधी गुन्हा आणि कारवाई याबाबत पंजाब आणि केरळ याची तुलना केली, तर स्पष्ट होते की, पंजाब नव्हे, आज केरळच अमली पदार्थ गुन्ह्यांबाबत आघाडीवर आहे. सरकारी आणि खासगी अहवालानुसार, केरळमध्ये मे 2024 मध्ये अमली पदार्थ संदर्भात कायद्यानुसार, 27 हजार, 701 अमली पदार्थ खरेदी-व्रिकी गुन्हे दाखल झाले, तर पंजाबमध्ये 9 हजार, 25 गुन्हे दाखल झाले. तसेच, केरळमध्ये एक लाख लोकसंख्येमध्ये 78 अमली पदार्थांसंदर्भात गुन्हे दाखल झाले, तर पंजाबमध्ये 30 गुन्हे दाखल झाले. पंजाबमध्ये गेल्या तीन वर्षांत अमली पदार्थांसंदर्भात पाच हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले, तर केरळमध्ये गेल्या पाच वर्षांत 87 हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत.
 
केरळच्या अबकारी विभागाचा धक्कादायक अहवाल
 
केरळ राज्याच्या अबकारी विभागाने काही महिन्यांपूर्वी एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये 62 हजार, 691 युवक सहभागी झाले होते. त्यांच्या सर्वेक्षणातून लक्षात आले की, त्यांच्यातील नऊ टक्के लोक वयाच्या दहाव्या वर्षापूर्वी, तर 70 टक्के लोक 15व्या वर्षापर्यंत, तर 20 टक्के लोक 19व्या वर्षापर्यंत अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकले होते. यांतील 46 टक्के लोकांनी सांगितले की, ते दिवसातून अनेक वेळा अमली पदार्थाचे सेवन करतात, तर 35 टक्के लोकांनी सांगितले की, ते तणाव, निराशा आली की अमली पदार्थांचे सेवन करतात.
योगिता साळवी
9594969638
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121