( Siyavar Ramchandra ki jai ) निर्मितीपासून ते भव्यदिव्य सादरीकरणापर्यंत महानाट्य ही तशी आव्हानात्मकच. त्यात मग एखादे महानाट्य बालकलाकारांना सोबत घेऊन अगदी यशस्वीरित्या तडीस नेणे, हे तर शिवधनुष्य पेलण्यासारखेच. ‘सियावर रामचंद्र की जय’ हे असेच एक बालकलाकारांनी साकारलेले महानाट्य. आज श्रीरामनवमीनिमित्त खास हे महानाट्य बसवतानाचे अनुभवचित्रण...
बालरंगभूमी प्रयोगशील राहिली आहे. प्रौढ रंगभूमीप्रमाणेच तीसुद्धा परिवर्तनशील आहे. बालरंगभूमीने कात टाकली, स्थित्यंतरे तिने पाहिली आहेत, असे मी म्हणणार नाही. कारण, बालरंगभूमीचा प्रवास अतिशय संथगतीने चालत आलेला आहे. ती जास्त करून शालेय, शैक्षणिक आणि प्रायोगिक राहिली आहे. व्यावसायिक नाटके होती, आजही आहेत; पण प्रौढ रंगभूमीच्या तुलनेत फार कमी. माझ्या 30 वर्षांच्या अनुभवातून मी सांगू शकेन की, व्यावसायिक नवीन बालनाटके फारच कमी, त्यातही जुनी संहिता, जुनी नाटके घेऊन जास्त प्रयोग बघायला मिळाले आहेत आणि तेही पुणे, मुंबईकडेच. म्हणजे, इतर ठिकाणी बालनाट्ये झालीच नाहीत का? झाली. तिथेही बालनाट्ये अनेक होतात, पण व्यावसायिक म्हणून प्रयोग लावले आहेत आणि 100हून अधिक प्रयोग झाले आहेत, असे फारसे बघायला मिळालेले नाही. बालरंगभूमीचा प्रवास एखाद्या संथ नदीसारखा झालेला आहे.
खळखळत्या, समृद्ध, बाराही महिने पाणी असलेल्या नदीसारखा प्रवास का बरं झाला नसेल? मुळातच नाट्यकलेत सर्व कलांचा समावेश असल्यामुळे ती कठीण. बालरंगभूमी थोडी दुर्लक्षिलेलीसुद्धा आहे. आणि मुलांना घेऊन नाटक करण्यासाठी निराळे कौशल्य लागते, ते दिग्दर्शकाला सहज आत्मसात करणे आव्हानात्मक. बालनाट्य बसवताना दुप्पट ऊर्जा लागते, संयम लागतो आणि हे सगळे असूनसुद्धा नाटकाचे प्रयोग किती होतील, खर्च निघेल का, हे खात्रीनिशी सांगता येत नाही. शिवाय, बालनाट्य कला सादर करणे म्हणजे खर्चिक काम आहे. वेळ तुम्ही जितका जास्त द्याल, तेवढा कमीच. असे सगळे असूनसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये, गावांमध्ये अगदी एखाददुसरी नाट्यसंस्था असेल, जी सातत्याने बाल नाटक करत आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी बालरंगभूमी राज्य नाट्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गेले होते, तेव्हा 19 बालनाट्ये होती आणि यावर्षी त्यांची संख्या वाढली आहे. म्हणजे बालनाट्य सादरीकरण वाढले आहे.
आता विषय कोणते निवडले जात आहेत आणि प्रस्तुतीकरणाची पातळी खालावत आहे का उंचावत आहे, हा चर्चेचा विषय ठरेल. पण, बालनाट्याचे महत्त्व लोकांना अधिकाधिक पटायला लागले आहे आणि नवीन पिढीही त्याकडे वळत आहे. एक काळ असाही पाहिला आहे, जेव्हा पालक म्हणायचे, आम्हाला आमच्या मुलांना नाटकाच्या शिबिरात घालायचे नाही. कारण, त्याला मोठे झाल्यावर अभिनेता थोडीच बनवायचे आहे! पण, आता ही मानसिकता बदलत चालली आहे. आता नाटकाच्या शिबिरात मुलांना पाठवण्याची अनेक कारणे आहेत.
पण, त्यातले सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, नाटक तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवते. जीवनकौशल्यांचा विकास करते. तांत्रिक बाजू, जसे की नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यांत नवनवीन बदल होताना दिसत असल्यामुळे आणि याचा वापर बालनाट्यात छान पद्धतींनी करू शकत असल्यामुळे आपण नाटक बसवतानाही मजा येते.
आजही एकांकिका जास्त बसवल्या जातात, दोन अंकी नाटके कमी, पण मनाचे धारिष्ट्य आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर बालमहानाट्यसुद्धा बघायला मिळेल. पण, त्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीही नाही. ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकाचा इथे आवर्जून उल्लेख करता येईल. पण, त्यानंतर मुलांना घेऊन बालमहानाट्य झाले असेल, ते एकच, ‘सियावर रामचंद्र की जय,’ ज्याचे लेखन-दिग्दर्शन आणि निर्मिती माझी आहे. 75 बालकलाकारांचा समावेश, 175 लाईट्स, दहा नवनिर्मित गाणी, जी लहान मुलांनी गायली आहेत, सात गाण्यांवर नृत्य, शिवाय, प्रभू श्रीरामाची कथा. त्यामुळे नाटक रंगते.
या नाटकाचे चार हाऊसफुल प्रयोग झाले आणि दि. 26 एप्रिलला तुपे नाट्य मंदिर, पुणे येथे पाचवा प्रयोग आहे. व्यावसायिक दर्जाचे सादरीकरण बालकलाकार करतात आणि प्रेक्षक हे नाटक उचलून धरतात, हा एक भाग झाला, पण इथे मला खरे तर याव्यतिरिक्त मुलांवर काय परिणाम होतो, हे सांगावेसे वाटते. कुठल्याही कलेचा परिणाम कलार्जन करणार्या मुलांवर मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक पातळीवर कळत-नकळत होत असतो, तसाच बालनाट्याचा त्यात काम करण्यार्या मुलांवर होतोच. पण, नाटकात काम केल्यानंतर होणारा परिणाम आणि महानाट्यात काम केल्यावर होणारा परिणाम वेगळा आहे. महानाट्यात भव्यता आहेच, पण त्याहीपेक्षा त्याचे प्रस्तुतीकरण हे जास्त सांघिक आहे.
कलाकारांची संख्या अधिक, त्यामुळे आव्हानेही वेगळी. महानाट्य यशस्वी ठरते, कारण ते भव्य दिव्य असते. नृत्य आणि संगीताचाही जास्त प्रमाणात वापर असतो. मांडलेला विषय हा जनसामान्यांना रुचेल, समजेल असा असतो. बरेच वेळेला तो पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक असतो. पण, बालकलाकार जेव्हा महानाट्य सादर करतात, तेव्हा त्यांच्या मनावर वेगळा परिणाम होतो, जो सर्वसाधारण नाटकांतून होत नाही.
उदाहरणासाठी ‘सियावर रामचंद्र की जय’ हे बालनाट्य घेऊया. सर्वप्रथम, विषय प्रभू श्रीरामाचा; त्यामुळे त्याची गाथा ते नाटकाच्या माध्यमातून समजून घेतात आणि ‘लार्जर दॅन लाईफ इमेज’ त्याचे प्रस्तुतीकरणही भव्य असल्याकारणाने ते प्रभावी पद्धतीने पोहोचते. नाटकात 75 मुले, पाच ते 15 अशा वेगवेगळ्या वयोगटांतली; त्यामुळे एकमेकांबरोबर जुळवून घेऊन काम करायला नाटक शिकवते. नाटकाचा कालावधी मोठा, दोन तास पंधरा मिनिटांचा. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऊर्जा कायम ठेवून काम करायला शिकवते. महानाट्याच्या तालमीही खूप होतात.
त्यामुळे जास्त मेहनत आणि वेळ द्यावा लागतो. ठराविक महत्त्व पूर्णतः भूमिका सोडल्यास सर्वांनाच समान काम मिळते. योग्यतेप्रमाणे आणि वय लक्षात घेऊन भूमिका दिली जाते आणि बहुतांश वेळेला एका बालकलाकाराला एकच नव्हे, तर अनेक भूमिका कराव्या लागतात. त्यामुळे भूमिका समजून घेणे, त्याकरिता पोशाख बदलून प्रवेशासाठी तयार राहणे मुले शिकतात. इथे बरेच वेळा मदतीला कोणी नसते. त्यामुळे आपला पोशाख, दागिने, वस्तूंची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकतात, आत्मनिर्भर होतात. तसेच वेळेचे भान ठेवून तयार राहायला शिकतात. बरेच वेळा दिलेली भूमिका ही दोन ते तीन मिनिटांची असते. पण, तेवढ्याशा वेळात प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडायची असते, हेही शिकतात. कपड्यांच्या घड्या करण्यापासून तर दुसर्याच्या मदतीला उभे राहण्याचेही काम करावे लागते. ‘सियावर रामचंद्र की जय’ हे नाटक रेकॉर्डेड आहे.
त्यामुळे लिपसिंक करणे अनिवार्य असते. स्वतःचा आवाज वापरून वाक्य घेणे जेवढे कठीण, तेवढेच लिपसिंक करून अचूक वाक्य बोलणेही कठीणच. मुले तेही शिकतात. नेपथ्य आणि प्रकाशयोजना भव्य दिव्य असल्यामुळे हे सगळे मुलांना डोळ्यांनी बघता येते आणि त्यांना एका श्रीमंत, महान कलाकृतीचा भाग असल्याचा आनंद मिळतो. महानाट्य जर कुठे होत असेल, तर मुलांना ते बघायला घेऊन जायलाच हवे. कारण, ते एकदा पाहिल्यावर लक्षात राहते. त्यात काम करायला मिळाले, तर ही संधी दवडू नये. मुलांना मजा तर येतेच, पण मुले नकळत अनेक गोष्टी शिकत असतात. पडेल ते काम करायचे, करून पाहायचे, मदत करायची, हातभार लावायचा, आपले सामान नीट ठेवायचे. महानाट्य म्हणजे एक सर्कस, ज्यात सगळेच कलाकार खेळाडूही. त्यांना शिस्त, वेळेचे भान, इथे कोणी मोठे नाही की छोटे नाही.
श्रीराम महत्त्वाचा, तशी खारुताईसुद्धा! सकारात्मक ऊर्जा अत्यंत महत्त्वाची आणि आपण एकत्र येऊन, मिळून-मिसळून काम करण्याची भावनासुद्धा. नाटक बसवताना सगळ्या कलाकारांना मी जबाबदारी वाटून देते. आपली भूमिका तर करायचीच आहे, पण सहकलाकारांचेही काम करायचे आहे. रंगरंगोटी, सजावट, आरास करण्याची कामेसुद्धा देते. शिवणकाम, भरतकामसुद्धा करायला देते. नृत्य येत नसेल, तर करून पाहायला सांगते. रंगभूषा, वेशभूषा स्वतःचीच स्वतः किंवा इतरांची करून द्यायला लावते. एक विद्यापीठ असते, ज्यात वेगवेगळ्या विषयांची ओळख होते.
महानाट्याला प्रेक्षकही मोठ्या संख्येने येतात. तसेच याचे प्रयोग मोठ्या नाट्यगृहापासून खुल्या मैदानातसुद्धा होतात. शेवटी कलाकार म्हणून आपण प्रेक्षकांना काय देतो, हे महत्त्वाचे आहेच, पण बालकलाकार कलेची उपासना करताना घरी काय घेऊन जातात, कुठल्या गोष्टीचे मंथन करतात आणि मिळून-मिसळून राहायचे कसे, नवीन गोष्टी शिकून घ्यायच्या, एका मोठ्या सादरीकरणासाठी एकत्र कसे यायचे, वातावरण ऊर्जावान, सकारात्मक आणि एकमेकांपासून प्रेरणा घेत कसे नाट्यमय करायचे, हे शिकतात आणि याच गोष्टी समाज घडवताना लागतात. नाटक याचे प्रभावी माध्यम ठरते. नाटकाच्या शेवटाला सगळे मिळून एकच जयघोष करतात आणि तो म्हणजे ‘सियावर रामचंद्र की जय!’
रानी राधिका देशपांडे
7767931123