( Ramnavmi ) 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत रामजन्मभूमीवर साकार झालेल्या भव्य दिव्य राममंदिराच्या आनंदोत्सवाप्रीत्यर्थ, जानेवारी 2024 साली प्रारंभ झालेल्या ‘नित्यविजयी रघुनंदन’ या लेखमालेची प्रस्तुत लेखाने यशस्वी सांगता होत आहे. गेल्या 15 महिन्यांतील 65 लेखांतून ‘संतसाहित्यातील रामदर्शन’ घडविण्यात आले. ही लेखमाला रामकृपेचाच शब्दाविष्कार आहे. ‘आमुचा राम राम घ्यावा’ या संतवचनाने मी या लेखमालेची कृतार्थ मनाने सांगता करतो. जय श्रीराम!
आदौ रामतपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।
वैदेहीहरणं, जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम्।
बालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनम्।
पश्चाद्रावण कुम्भकर्णहननं एतद्धि श्री रामायणम्॥
आज श्रीरामनवमीचा परमपावन दिवस. सारे जग रामनामाने दुमदुमून गेले आहे. अशा पावन दिनी गेले 15 महिने अव्याहत सुरू असलेल्या माझ्या प्रस्तुत लेखमालेची यथासांग समाप्ती होत आहे. संकल्पपूर्तीचा, साधनासफलतेच्या सिद्धीचा आनंद काही विलक्षण असतो. तो शब्दगोचर नसतो. असाच अनामय आनंद मी आज या ‘नित्यविजयी रघुनंदन’ लेखमालेचा समारोप करताना अनुभवत आहे. 65 लेखांची ही रामदर्शन लेखमाला मी श्रीरामचरणी अर्पित करतो. ‘राम कर्ता, राम करविता’ या आत्मभावातून मी या लेखमालेचा दि. 7 जानेवारी 2024 रोजी श्रीगणेशा केला होता. अयोध्येमध्ये 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर निर्माण झालेल्या भव्य दिव्य श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या ऐतिहासिक घटनेनिमित्ताने ही लेखमाला दै. ‘मुंबई तरुण भारत’ने माझ्याकडून लिहून घेतली. श्रीरामकृपेने ती यशस्वीरित्या पूर्णत्वास गेली आहे.
15 महिन्यांच्या या साप्ताहिक लेखमालेत एकूण 65 लेख प्रकाशित झाले. त्यामध्ये 13व्या शतकातील संत निवृत्ती-ज्ञानेश्वर-नामदेवांपासून थेट 19व्या शतकातील नामयोगी गोंदवलेकर महाराज यांच्या ‘रामपाठ’पर्यंतच्या संतसाहित्यातील रामदर्शनाचे, लेखांच्या मर्यादित शब्दांत अवलोकन केले. तसेच, विविध रामायणे, रामकथाकार, वेगवेगळ्या प्रदेशातील रामकथेचे प्रादेशिक शब्दाविष्कार यांचेही आपण शब्ददर्शन केले. गुरू गोविंदसिंहांचे ‘रामावतार’, आसाममधील माधव कंदली यांचे ‘रामायण’, रामकथेचा विश्वविख्यात मर्मज्ञ डॉ. कामिल बुल्के, मुल्हेर (नाशिक)चा गोस्वामी तुलसीदास शिष्य दास जनजसवंत या व अशा लेखातून बरीच नवी, अपरिचित, दुर्लक्षित माहिती मिळाल्याचे वाचकांचे फोन आले आणि लेखमाला वाचक बारकाईने वाचतात, याचा मनस्वी आनंद झाला. सर्व वाचकांना व आवर्जून फोन, ई-मेल, व्हॉट्सअॅप करणार्या सर्वांना मनःपूर्वक साधुवाद!
विश्वसाहित्यात अनेक कथा व महाकाव्ये अजरामर झालेली आहेत.
त्यात मिल्टनचे ‘पॅराडाईज लॉस्ट’, कवी होमरचे ‘ईलियड’ ही प्राचीन ग्रीक काव्ये, अशा काही अभिजात रचना प्रसिद्ध आहेत. पण, आदि महाकवी वाल्मिकींद्वारा लिखित ‘रामायण’ ही जगातील सर्वश्रेष्ठ व कालातीत महाकाव्यकथा आहे. तिचा विश्वसंचार व देशोदेशीच्या सांस्कृतिक जीवनावरील अमीट प्रभाव, रामकथेच्या सर्वश्रेष्ठतेचे द्योतक आहे. इंडोनेशिया या मुस्लीम धर्मी देशातील रामकथेचे स्थान, रामकथेच्या लोकविलक्षण प्रभावाचे उत्कट व थक्क करणारे दर्शन आहे.
‘रामकथा’ ही केवळ भारतीयांचीच नव्हे, तर विश्वाची लोकप्रिय कथा झालेली आहे. कारण, रामकथा ही प्रेमगाथा आहे. कर्तव्यबोध आणि मानवी मूल्यांचा सुंदर वस्तुपाठ आहे. सामाजिक एकता-समरसतेचे कृतिरूप दर्शन आहे. सद्गुण समुच्चयाचे विराट देखणे शिल्प आहे. भारतीयांना लाभलेला अनमोल वसा आणि वारसा आहे. ही केवळ काव्यकथा नसून, भारताचा सांस्कृतिक इतिहास आहे. एका लोकोत्तर भारतीय महापुरुषाची शौर्यगाथा आहे. बाळशास्त्री हरिदास म्हणतात, “रामायण’ ही भारतीयांनी जगाला दिलेली अनमोल अक्षर देणगी आहे,” हरिदासाची ही उक्ती सार्थ आहे.
अलौकिक गुणसंपदा म्हणजे राम. स्वार्थत्यागाची पराकाष्ठा म्हणजे राम. नीतिधर्मावर अविचल निष्ठा व कठोर पालन म्हणजे राम. अशा सद्गुण स्वरूप रामाला आदर्श-दीपस्तंभ मानून जीवन आचरणारा कोणीही माणूस राम होऊ शकतो. रामाचे, रामनामाचे गुणगान करायचे ते याचसाठी. ‘रामो भूत्वा रामम् यजेत‘ हेच सकल संतांनी आपणास टाहो फोडून सांगितलेले आहे. तसेच, सकल संतांनी श्रीराम तोच श्रीकृष्ण, श्रीविठ्ठल आणि शिवशंकर असल्याचे अद्वैत भक्तितत्त्वाचे, ‘एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति’ महाबोधाचेही प्रतिपादन करीत सामाजिक, सांस्कृतिक ऐक्याचा संदेश दिलेला आहे. तो या लेखमालेत मी विशेषत्वाने अधोरेखित केलेला आहे.
या रामनामाच्या प्रभावामुळेच आपला देश अनेक शतके धर्मांध आक्रमकांच्या पारतंत्र्यात राहूनही कधी हरला नाही. जगाच्या इतिहासातील हे एक आश्चर्य आहे. ‘कुछ तो बात हैं, हस्ती नहीं मिटी हिन्दुस्थानकी।’ ज्या ज्या वेळी आपल्या देशावर संकटे आली, तेव्हा तेव्हा साधुसंतांनी श्रीरामाच्या पुरुषार्थी कथांचे जनजागरण करीत देशात स्वत्व, स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवले. गोस्वामी तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’, संत एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’, संत रामदासांचे ‘दास रामायण’ यांनी केलेल्या लोकजागृतीद्वारे धर्मरक्षणाचे महान कार्य केले, हे आता सर्वश्रुत, सर्वमान्य झालेले आहे.
‘यतो धर्मस्ततो जयः’, ‘सत्यमेव जयते’, ‘सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै।’, ‘तेन त्यक्तेन भुञ्जीथाः।’ या व अशा भारतीय प्राचीन महावाक्यांचे जिवंत मूर्तिमंत दर्शन म्हणजे रामायण, श्रीरामाची विजिगीषु परमपुरुषार्थी गाथा. रामकथा ही अभ्युदय आणि निःश्रेयस यांचा वस्तुपाठ-बोध आहे. म्हणूनच चिंतकांनी श्रीरामाचे वर्णन ‘मूर्तिमंत धर्म’, ‘रामचंद्रः विग्रहवान् धर्मः।’ असे केलेले आहे.
अशा परब्रह्म, परमपुरुषार्थी श्रीरामाची मला या लेखमालेच्या योगाने अक्षरसेवा करण्याचे भाग्य लाभले. आता कृतार्थ मनाने मी वाचकांना ‘आमचा राम राम घ्यावा’ म्हणतो आणि ‘नित्यविजयी रघुनंदन’ या लेखमालारूपी अक्षरपूजेची समाप्ती करतो.
किंबहुना तुमचे केले। धर्मकीर्तन हे सिद्धी गेले।
येथ जी माझे उरले। पाईकपण॥
राम जीवन हैं और मुक्ती भी हैं।
राम आज भी हैं राम कल भी।
विद्याधर ताठे
9881909775