‘वक्फ सुधारणा विधेयक, 2025’ संसदेत पारित होत असताना एक चकार शब्दही न बोलणारे राहुल गांधी हे विधेयक संमत झाल्यावर म्हणत आहेत, “हे संशोधन म्हणजे, संविधानातील ‘कलम 25’वर आघात आहे. हे संविधानविरोधी आहे.” त्यामुळे केंद्र सरकारने काहीही केले, जर ते देशाच्या भवितव्यासाठी उज्ज्वल असेल, तर त्याला विरोध करायचा आणि तोंडी लावायला ‘संविधान पिछडे’ वगैरे शब्द टाकायचे, हीच राहुल गांधींची भूमिका आहे.
संविधानातील ‘कलम 25’ काय, तर यानुसार लोकव्यवस्था, सदाचार वगैरे नियमाधीन राहून धर्माचे स्वातंत्र्य आहे. वैयक्तिक आवडीनुसार धर्म मानण्याचा, आचरणात आणण्याचा, प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी ते धार्मिक संस्थांचे गठन करू शकतात. ‘वक्फ सुधारणा’ केल्याने मुस्लिमांच्या धर्मानुसार जगण्या-वागण्याच्या स्वातंत्र्याला काहीच बंदी आलेली नाही. उलट ‘वक्फ सुधारणा’मुळे संविधानातील समता प्रस्थापित करणारे सर्वांत महत्त्वाचे ‘कलम 14’ आणि ‘कलम 15’ची प्रस्थापना ‘वक्फ बोर्डा’मध्ये झाली आहे. नव्या संशोधनामुळे ‘वक्फ बोर्डा’मध्ये आता दोन महिलांचा आणि मुस्लीम समाजातील मागासवर्गीय अल्पसंख्याक जातगटांचाही समावेश होणार आहे. तसेच, ‘शिया’, ‘बोहरा’ आणि ‘आगाखान वक्फ बोर्डा’लाही मान्यता आहे. याचाच अर्थ, मुस्लिमांमधील प्रस्थापित गटाची मक्तेदारी मोडून मुस्लिमांतील सर्व गटांना अधिकार देणारे हे संविधानयुक्त नवे सुधारणा विधेयक. पण, या समतेच्या संविधानयुक्त सुधारणेला राहुल गांधींनी विरोध केला. पुढे राहुल गांधी म्हणाले की, “रा. स्व. संघाचे लक्ष ख्रिश्चनांकडे जाण्यासाठी वेळ लागणार नाही.” त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘वक्फ सुधारणा’ ही रा. स्व. संघाने केली. पण सगळ्या जगाने पाहिले की, ‘वक्फ सुधारणा विधेयक’ संविधानाच्या नियमानुसार संसदेत बहुमताने पारित करून संमत करण्यात आले. या कायद्याला राहुल गांधी विरोध करत आहेत. राहुल गांधी खरे संविधानविरोधी आहेत. चावीवर चालणारा रोबोट पाहिला का? चावी दिली की ठराविक एक-दोन वाक्ये बोलणार. राहुल गांधीही असेच. देशात कुठेही काहीही होवो, त्यांच्या तोंडातून वाक्य निघणार, ते म्हणजे, ‘हे संविधानविरोधी आहे!’ दुसरे वाक्य रा. स्व. संघाच्या विरोधातले. राहुल आणि रोबोट यांमध्ये साम्य जरी असले, तरी भेदही आहे बरं का? खरा रोबोट द्वेषपूर्ण हिंदूविरोधी खोटे बोलत नाही.
हे सगळे थांबले पाहिजे!
समाजात सगळेच विकृत नाहीत. पण, काही विकृत लोकांमुळे समाजाचे स्वरूप बदलत आहे. ही विकृती येते कुठून? जन्मजात स्वभावतःच अनुवांशिक असते का? याचे उत्तर ‘हो’, ‘नाही’ किंवा ‘माहिती नाही’ असेच आहे. काही घटना अशा असतात की, ज्या ऐकून वाटते, खरेच, या असल्या घटनेतील गुन्हेगारांना संपत्ती बाळगण्याचा किंवा कोणत्याही देशाचा नागरिक म्हणून जगण्याचा हक्क नाही. नाही नाही, जगण्याचाच अधिकार नसावा. अशीच एक घटना. त्या 13 वर्षांच्या बालिकेला कर्करोगाने गाठले. उपचारासाठी बिहारहून ती बदलापूरला आली. तिच्यावर उपचार सुरू झाले. काल-परवाच केमोथेरपीदरम्यान डॉक्टरांना आढळले की, ही कर्करोगाने जर्जर झालेली बालिका गरोदर आहे. उपचारासाठी ती ज्या परिचिताकडे थांबली होती, त्यानेच तिच्यावर अत्याचार केले होते. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना. बालिका मृत्यूच्या दारात आहे; तिच्यावर अत्याचार करणार्या त्या नराधमाला दयामाया आली नाही. माणुसकी संपली नाही, माणुसकी मेलीच या घटनेमध्ये. दुसरी घटना नवी मुंबईची. आईसोबत भांडण झाले, म्हणून मोहम्मद अन्सारी याने त्याच्या तीन वर्षांच्या बालिकेचा खून केला आणि तिचा मृतदेह गोणीत भरला. हे कधी थांबेल? लैंगिक भावनांसोबतच द्वेष-मत्सराच्या भावनांना भरीस पडून समाजात अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. कायदा, शासन, प्रशासन गुन्ह्यांविरोधात कारवाई करतच असतात, पण या असल्या गुन्ह्यांना आळा कसा बसेल? दुष्ट, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दुसर्या व्यक्तीचा स्थायीभाव आपण बदलू शकत नाही. पण, आपण आपली आणि आपल्या लोकांची काळजी तर घेऊच शकतो. कुणावरही अंधविश्वास टाकणे, जिथे राहतो किंवा जिथे जायचे आहे, त्या परिसराबद्दल अज्ञान बाळगून राहणे, जगात काय चालले आहे, याविषयी तीळमात्र समजून न घेणे, आपली सुरक्षितता कशात आहे, याचे भान नसणे, यातूनच अनेकदा अत्याचार घडत असतात.
तसेच गुन्हा केल्याने कायद्यान्वये कठोर शिक्षा होते, याबाबत आपल्यासकट आपल्या भोवतालच्या लोकांमध्ये जागृती आणणे गरजेचे आहे. या सगळ्याबरोबरच गुन्हा केला, तर त्वरित भयंकर शिक्षा होणार, याची भीती गुन्हेगारी मानसिकतेला वाटेल, अशी समाजव्यवस्था निर्माण होणे गरजेचे! हे सगळे थांबले पाहिजे!
9594969638