मुंबई : ( Old Shiv Sainik from Bhoiwada Parel area vishvnath khatate join shivsena ) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे परळ-भोईवाडा परिसरातले जुनेजाणते शिवसैनिक विश्वनाथ (बुवा) खताते, विजय कलगुटकर आणि काशी कोळी यांच्यासह 25 ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
त्याचबरोबर भिवंडी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शिवसैनिकांच्या प्रवेशाने पक्ष संघटन आणखी मजबूत झाले असून उबाठाला जोरदार झटका बसला आहे. विश्वनाथ खताते यांची ‘बाळासाहेबांचे जुनेजाणते सहकारी’ अशी ओळख आहे. दादर-परळमध्ये शिवसेना रुजवण्यात विश्वनाथ खताते यांचे मोठे योगदान आहे.
त्यांच्यासोबत विजय कलगुटकर आणि काशी कोळी यांनीही बाळासाहेबांसोबत काम केले होते. मागील अडीच वर्षांत मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावले, यामुळे मुंबईतील मराठी कुटुंबांना हक्काची घरे मिळणार आहेत. शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन शिवसेनेत परतल्याबद्दल या ज्येष्ठ शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले.