‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या विचाराने कार्यरत ‘नाना पालकर स्मृति समिती’ गंभीर आजाराने ग्रासलेल्या गरीब व गरजू रुग्णांना प्रामाणिकपणे व ध्येयासक्त वृत्तीने वैद्यकीय मदत देण्यास समर्पित आणि वचनबद्ध आहे. गेली 57 वर्षे अविरतपणे समिती रुग्णसेवेचे कार्य करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक असलेले नारायण पालकर उपाख्य नाना पालकर यांच्या निधनानंतर त्यांचे रुग्णसेवेचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आज अनेक कार्यकर्ते समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘नाना पालकर स्मृति समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. परेश नवलकर यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी ओंकार मुळ्ये यांनी साधलेला संवाद...
‘नाना पालकर स्मृति समिती’ सुरू करण्यामागचा विचार आणि आज सुरू असलेले एकूण कार्य हा प्रवास कसा होता?
नाना पालकर हे व्यक्तिमत्त्वच मुळात अतिशय संवेदनशील होते. ते कवी होते, लेखकही होते. त्यांची बरीच पुस्तके आहेत. मात्र, त्यांपैकी एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘इस्रायल-छळाकडून बळाकडे.’ पण, रुग्णसेवा करणे हे त्यांच्या अंगी रुजलेच होते. त्यामुळे संध्याकाळी रुग्णालयात जाणे, रुग्णांची विचारपूस करणे, त्यांना काय हवे-नको त्याबाबत विचारपूस करणे, या सर्व गोष्टी ते आपुलकीने करायचे.
दि. 1 मार्च 1967 रोजी नानांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दि. 1 मार्च 1968 रोजी ’नाना पालकर स्मृति समिती’ची स्थापना झाली. मुख्यत्वे डॉ. माधवराव परळकर आणि डॉ. अजित फडके यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या समितीला 57 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईबाहेरून आलेल्या रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी, याकरिता गेली 57 वर्षे कार्यरत आहे. परळ येथे असलेल्या दहा इमारतींत (रुग्णसेवा सदन) एकूण 76 रुग्ण आणि प्रत्येकी दोन नातेवाईक अशी राहण्याची व्यवस्था आहे. 16 खाटांचे डायलिसिस सेंटर सुरू झाले आहे. त्याचबरोबर पॅथोलॉजी लॅब, फिजिओथेरपी सेंटरची सुविधा आहे. ’नाना पालकर स्मृति समिती’चा विस्तार पाहिल्यास बोरिवली, ठाणे, कोपरी, सांताक्रुझ याठिकाणीसुद्धा केंद्रे उघडण्यात आली आहेत. एकूण 50 डायलिसिस मशिन्स सध्या उपलब्ध आहेत.
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात ‘नाना पालकर स्मृति समिती’चे वेगळेपण काय?
मुंबई बाहेरून येणार्या रुग्णांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे अभिप्राय पाहिल्यास, त्यांना या ठिकाणी आपुलकीची भावना मिळते. तसेच, हे आपलेच घर असल्यासारखे त्यांना वाटते. रुग्णांशी ठेवलेला संपर्क हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. इथून गेलेले रुग्ण सेवकांशी, पदाधिकार्यांच्या आजही संपर्कात आहेत. बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम अशा लांब-लांबहून येणार्या रुग्णांशी इथल्या कार्यकर्त्यांनी संपर्क टिकवून ठेवले आहेत. अशा आपुलकीने होणारी सेवा शक्यतो इतरत्र कुठे पाहायला मिळणार नाही. स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येकजण इथे आल्यावर कौतुक करतो. ‘नाना पालकर स्मृति समिती’च्या कुठल्याही केंद्रात या गोष्टी पाहायला मिळतील.
‘नाना पालकर रुग्णसेवासमिती’बद्दल काय सांगाल?
‘नाना पालकर रुग्णसेवा समिती’ हा एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. बोरिवली, सांताक्रुझ, ठाणे आणि परळ या चारही ठिकाणी तो कार्यरत आहे. या माध्यमातून कार्यकर्ते समितीशी जोडले जातात. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत स्वेच्छेने सेवा करू पाहणारे या ट्रस्टच्या माध्यमातून समितीशी जोडले गेले आहेत आणि अद्यापही जोडले जात आहेत. संस्थेच्या विस्ताराकरिता आणि समाजात पोहोचण्याकरिता ‘नाना पालकर रुग्णसेवा समितीकडून विशेष सहकार्य कायम मिळत आले आहे.
रतन टाटा आणि ‘नाना पालकर स्मृति समिती’ अशा काही आठवणी स्मरणात आहेत का?
मुळात रतन टाटा हे व्यक्तिमत्त्वच खूप वेगळे होते. त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांशी आपले संबंध होतेच, परंतु ‘नाना पालकर स्मृती समिती’ टाटा हॉस्पिटल्सना सेवा देते, या एकमेव कारणास्तव रतन टाटा समितीच्या 50व्या वर्धापन दिनाला उपस्थित होते. माननीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासह ते व्यासपीठावर होते. “मी इथे केवळ समितीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानायला आलो आहे,” या एका वाक्यातच त्यांनी आपले भाषण पूर्ण केले आणि उपस्थितांची मने जिंकली.
स्तनाच्या कर्करोगासंबंधी सुरू असलेल्या ‘मोबाईल व्हॅन’बाबत काय सांगाल?
काही महिलांना स्तनाचा कर्करोग असतो. त्याच्या उपचारादरम्यान स्क्रिनिंग करायला ‘मॅमोग्राफी’ लागते. भारतात ‘एआय’वर आधारित ‘थर्मल कॅमेरा बेस’ ही टेक्नोलॉजी आहे. ‘कोटक समूहा’तर्फे ही ‘मोबाईल व्हॅन’ समितीला मिळाली आहे. मुंबईत विविध ठिकाणी तसेच पनवेल, ठाणे ते अगदी पालघरपर्यंत ही मोबाईल व्हॅन फिरते. दिवसाला 35-40 महिलांचे स्क्रिनिंग करण्याची क्षमता यामध्ये आहे. विशेष म्हणजे, महिलेला कुठल्याही प्रकारचा स्पर्श न करता उपचार केले जातात. आठवड्याला याची तीन ते चार शिबिरे आयोजित केली जातात.
गेल्या 57 वर्षांत समितीसमोर कोणकोणती आव्हाने आली आणि त्यावर समितीने कशाप्रकारे मात केली?
संस्था म्हटली की आव्हाने येणे अपेक्षितच आहे. कारण, त्यामुळेच संस्थेची कार्यक्षमता वाढते. काही वेळेस आर्थिक स्वरुपाचे आव्हान असते. कधी कर्मचारी म्हणून नाही, तर कार्यकर्ते म्हणून समितीशी एखाद्या व्यक्तीस जोडणे, हे एक मोठे आव्हान असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शासनातर्फे वेळोवेळी समितीला सहकार्य मिळत आले आहे.
समितीअंतर्गत सुरू असलेल्या ‘अन्नपूर्णा योजने’बाबत काय सांगाल?
आपल्याकडील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाममात्र शुल्क म्हणजे अवघ्या दहा रुपयांत आपण जेवण देतो. समितीच्या अंतर्गत ‘अन्नपूर्णा योजना’ सुरू झाली, तेव्हा आजी-माजी कार्यकर्त्यांनी त्याचा इतका प्रसार केला की, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कुठलेही शुभकार्य असले की, दाते ‘अन्नपूर्णा योजने’च्या माध्यमातून सहकार्य करतात. काही दाते असे आहेत की, ते स्वतः कर्करोगाच्या रुग्णांसोबत बसून जेवणही करतात. या योजनेचा फायदा असा झाला की, रुग्णांकरिता वर्षभराची जमापुंजी काही काळातच जमा झाली होती.
श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनातून सुरू झालेला यज्ञकुंड आजही अविरतपणे तेवत ठेवला जात आहे, याकडे कार्याध्यक्ष म्हणून आपण कसे पाहता?
या यज्ञकुंडात नवीन पिढी कशी जोडली जाईल, यासाठी जुने कार्यकर्ते, पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील असतात. नवीन लोक जोडल्याने नवीन विचार, नवीन संकल्पना येत असतात. डेटिस्ट्री किंवा फिजिओथेरपीशी संबंधित जितकी आपली केंद्रे आहेत, त्या सर्व ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आहेत. म्हणजेच कालानुरुप नवनवीन तंत्रज्ञान आणि विचार ‘नाना पालकर स्मृति समिती’ आत्मसात करत आहे.