कांचनताई परुळेकर : सामाजिक कार्याचे एक स्वयंसिद्ध शक्तिपीठ

    06-Apr-2025
Total Views | 8

Kanchantai Parulekar
 
 
( Kanchantai Parulekar ) कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या माध्यमातून शहर व दुर्गम ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, अन्यायनिवारण व आरोग्यविषयक कार्य कांचनताई परुळेकर अत्यंत चिकाटीने करत होत्या. कर्करोगाच्या आजाराशी गेली चार वर्षे झुंज देत त्यांचे दि. 26 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय कार्याचा सविस्तर परिचय करून देणारा हा विशेष लेख...
 
हिला आरक्षण’, ‘महिला सक्षमीकरण’ आणि ‘स्त्रीमुक्ती’ हे शब्द गेल्या दोन दशकांतले परवलीचे शब्द झाले आहेत. अर्थात, या सर्वांची गरज असली, तरी खर्‍या अर्थाने सक्षमीकरणाचा मार्ग हा अर्थकारणातूनच पुढे सरकतो, हे वास्तव व व्यावहारिक सत्य आहे. बहुजन पददलित अशा समाजाची घनघोर उपेक्षा व स्त्रियांच्या उन्नतीकडे झालेले कमालीचे दुर्लक्ष ही भारताच्या अवनतीची दोन प्रमुख कारणे असल्याचे स्वामी विवेकानंदांनीही ठळकपणे अधोरेखित केलेले आहे. असे असले तरी, महिलांमधील आत्मसन्मान जागविण्याचे प्रत्यक्ष काम सद्यस्थितीत कसे केले पाहिजे, याची नमुनेदार उदाहरणे जागोजागी उभी राहणेही नितांत गरजेचे. त्यापैकीच एक म्हणजे, कोल्हापूरमधील ‘स्वयंसिद्धा’चे काम व हे काम उभे करणार्‍या कांचनताई परुळेकर यांचे स्वयंभू व्यक्तिमत्त्व. मानदंड ठरू शकेल असे आदर्शवत काम उभे करण्यामागची त्यांची तळमळ व तपश्चर्या मुळापासून समजावून घेण्यासारखी आहे.
 
बालपण व कौटुंबिक पार्श्वभूमी
 
कांचनताई परुळेकर या मुळच्या कोल्हापूरच्या. कोकणच्या मातीचा वारसा त्यांच्या आडनावातही आहे. त्यांचा जन्म 1952 सालचा. वडील मात्र लहानपणापासून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील नितवडे गावात वाढलेले. त्यामुळे कोकणची बुद्धिमत्ता व घाटावरचा कणखरपणा त्यांच्यात उतरलेला. सेवाभावी वृत्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच वडिलांकडून मिळाले. वडील बाळकृष्ण परुळेकर हे त्या काळी हरिजन सेवक संघाचे व ग्रामीण भागातील कार्यकर्ते होते.
 
वडील पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून शिलाईकाम करत. कोटाची शिलाई हे त्यांचे वैशिष्ट्य होते. घरात मितभाषी असणारे वडील सामाजिक कार्यात मात्र खूपच सक्रिय होते. इतके की, वडिलांनी राजारामपुरीत चालू केलेले व चांगले नावारूपाला आलेले ‘हाऊस ऑफ फॅशन’ हे दुकान प्रत्यक्षात मात्र त्यांच्या आईलाच चालवावे लागले. सामुदायिक शेती व गोठा चालविण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, हरिजन-सवर्ण यांचे एकत्रित कार्यक्रम घडवून आणणे, चळवळीच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविणे यातच वडील अधिक रमत होते.
 
काकाजींशी संपर्क व आयुष्याला मिळालेली कलाटणी
 
थोर शिक्षणतज्ज्ञ व माजी खासदार व आमदार डॉ. व्ही. टी. पाटील तथा काकाजी हे सामाजिक कामाची एक वेगळी दृष्टी असणारे आगळेवेगळे द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी कोल्हापुरात समाजकार्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी ‘शिक्षणातून विकास व विकासातून सामाजिक परिवर्तन’ या हेतूने गारगोटी येथे ‘मौनी विद्यापीठ’ या नावाने ग्रामीण शिक्षणाचे केंद्र उभारले होते. उद्याची स्त्री ही रणरागिणी, कर्तृत्ववान व स्वावलंबी व्हावी, म्हणून कोल्हापूरमध्ये त्यांनी महिलांसाठी ‘ताराराणी विद्यापीठ’सुद्धा उभारले होते. त्यांचे शिक्षणातील हे धडाडीचे व अभिनव प्रयोग पुढे चांगलेच नावारूपाला आले.
 
कांचनताई लहानपणापासून प्रभावी वक्त्या होत्या. वयाच्या 13व्या वर्षी पाटगावच्या हजारो धरणग्रस्तांच्या पुढे भाषण करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली होती. त्यावेळी व्यासपीठावर स्वतः काकाजी व आमदार रत्नाप्पा कुंभार होते. माणसांची पारख असणार्‍या काकाजींनी या चुणचुणीत व बुद्धिमान अशा बालवयातील कांचनला हेरले. बंडखोर, पण स्वतंत्र व विचारी व्यक्तिमत्त्व असणार्‍या कांचनला त्यांनी व त्यांच्या पत्नी सरोजिनी देवी यांनी आपले मुलगी मानले. यात जातपात, भावकी आड आली नाही, कारण वारसा कर्तृत्वाचा चालवायचा होता!
 
शिक्षण व नोकरीचा टप्पा
 
कांचनताईंनी इंग्रजी साहित्यात ‘एम.ए.’ पूर्ण करून पुढे ‘डी.एड.’सुद्धा केलेले आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ‘एनसीसी’ अधिकारी म्हणून काम सुरू केले. ‘एनसीसी’मध्ये असताना ‘बेस्ट ऑल राऊंड लेडी कॅडेट’ व ‘बेस्ट शुटर’ असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळविणार्‍या त्या एकमेव महिला आहेत. तेथे दोन वर्षे त्यांनी काम केले. बरोबरीने चालू असणारे शिक्षण पूर्ण झाल्यावर कांचनताई यांनी ताराराणी शाळेत शिक्षिकेचे दहा वर्षे काम स्वीकारले. त्यानंतर 1978 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिपिक म्हणून रुजू झाल्या. 14 वर्षे काम केल्यावर 1992 मध्ये शाखाधिकारिपदावरून ‘स्वयंसिद्धा’ची धुरा हाती घेण्यासाठी म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अशी एकूण 26 वर्षे त्यांनी नोकरी केली.
 
1968 मध्ये काकाजींनी आपल्या संपूर्ण जंगम मालमत्तेचा न्यास केला व ‘सरोजिनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळा’ची स्थापना केली. आपली सगळी संपत्ती त्यांनी या मंडळाकडे सुपूर्द केली. ताराराणी विद्यापीठातील मुलींच्या विकासासाठी व एकूणच समाजातील महिलांच्या उत्कर्षासाठी या न्यासातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येऊ लागले. 1992 मध्ये ‘स्वयंसिद्धा’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमास बँकेच्या नोकरीतून मुक्त झालेल्या कांचनताईंच्या पुढाकाराने सुरुवात झाली. 1969 मध्ये सरोजिनीदेवी यांचे, तर 1995 मध्ये काकाजींचे निधन झाले.
 
‘स्वयंसिद्धा’ची सुरुवात
 
महिलांनी फावल्या वेळात काही उद्योग करून उद्योजक बनावे, या हेतूने कांचनताईंनी सुरुवातीला महिलांची एक बैठक बोलाविली. त्यात आपल्याला बनविता येतील, अशा वस्तू महिलांनी बनविल्या आणि शाळेत पालकसभेच्या दिवशी या वस्तूंची विक्री केली. यातून महिलांना आत्मविश्वास मिळाला. यातूनच पुढे स्वतः काहीतरी करू पाहणार्‍या धडपड्या महिलांसाठीचे ‘स्वयंसिद्धा’ हे व्यासपीठ उभे राहिले. स्त्रियांना स्वकर्तृत्वाने घरात व समाजात स्थान मिळवून देण्यासाठी ‘स्वयंसिद्धा’ चळवळ आकाराला आली.
‘स्वयंसिद्धा’ हे नावच पुरेसे बोलके आहे. हे महिला मंडळ नसून महिलांना स्वावलंबी बनविणारी चळवळ आहे. ज्या महिलेला मार्गदर्शनाची गरज आहे, अशी कोणतीही महिला एक रुपया भरून नावनोंदणी करू शकते. ‘महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणारी संस्था’ अशी संस्थेची हळूहळू ओळख वाढत गेली. विकल्या जाऊ शकणार्‍या वस्तू बनविणार्‍या काही महिला यामुळे संस्थेशी जोडल्या गेल्या, ज्या पुढे प्रशिक्षिका बनून इतरांना प्रशिक्षण देऊ लागल्या.
 
येथे तयार होणार्‍या महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळायला हवी. त्यासाठी हळदी-कुंकू समारंभ ठेवून त्या घरी स्टॉल लावण्याची शक्कल कांचनताईंनी लढविली. त्यातून हळूहळू मागणी वाढत गेली. पुढे संस्थेच्या आवारातच दर बुधवारी हा आठवडी बाजार भरू लागला. वस्तू बनविणार्‍या महिलांची हजारांमधली उलाढाल कधी लाखांवर पोहोचली, ते समजलेही नाही. यात सहभागी होणार्‍या छोट्या छोट्या उद्योजक महिलांची संख्यासुद्धा शेकड्यातून हजारांवर जाऊन पोहोचली. अशा उद्योजकांना पाठबळ मिळण्यासाठी कांचनताईंनी 1994 मध्ये ‘स्वयंप्रेरिका औद्योगिक सहकारी संस्था’ स्थापन केली.
 
आतापर्यंत त्यांनी 58 हजारांहून अधिक शहरी महिला व 30 हजारांहून अधिक ग्रामीण महिलांना गेल्या 30 वर्षांत प्रशिक्षण दिले आहे. त्यातून दहा हजारांहून अधिक छोट्या-मोठ्या उद्योग करणार्‍या महिला कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात उभ्या राहिल्या आहेत, हे विशेष. यांपैकी अनेकींची उलाढाल लाखांच्या घरात आहे. यापाठीमागे कांचनताईंनी महिलांमध्ये पेरलेला आत्मविश्वास, चोख व्यवस्थापन व वस्तुंच्या गुणवत्तेचा आग्रह होता.
 
प्रशिक्षण हा कामाचा गाभा
 
स्वयंरोजगाराचे व अनेकविध कौशल्ये शिकण्याचे पर्याय देऊन कांचनताईंनी अनेक शहरी व ग्रामीण महिलांवरचा दहावी अनुत्तीर्णचा शिक्का पुसला. त्यासाठी ‘स्वयंसिद्धा स्कूल’ चालू केली. त्यातल्या काहीजणी तर आता चक्क प्रशिक्षिका म्हणून काम करीत आहेत. अशा व अन्य मिळून 150 प्रशिक्षिका ‘स्वयंसिद्धा’ने आत्तापर्यंत घडविल्या आहेत.
 
कांचनताईं खरे तर स्वतः एकही प्रशिक्षण घेत नाहीत. पण, एखाद्या महिलेचा त्यांच्याशी झालेला संवाद हेच तिचे पहिले प्रशिक्षण असते, समुपदेशन असते. त्यात त्या त्या महिलेचा न्यूनगंड कायमचा दूर करतात. बोला, वाचा, लिहा, करा आणि मिळवा, ही कामाची पंचसूत्री दिशा महिलांचा कायाकल्प घडवून आणते. काय झाले पाहिजे, यापेक्षा हे असे करता येते, असे प्रात्यक्षिकासह उदाहरण समोर ठेवण्यावर भर असतो. प्रश्नांकडे अडकून पडण्यापेक्षा उत्तराकडे चला, असा त्यांचा आग्रह असतो. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत महिलांमध्ये समृद्ध जगण्याची प्रेरणा निर्माण करण्यावर त्यांचा भर असतो. परप्रकाशाने तेजाळणार्‍या चंद्रापेक्षा स्वयंप्रकाशी सूर्य व्हा. कारण, तो स्वतः प्रकाश देतो व इतरांनाही आपल्या प्रकाशात उजळून टाकतो, या भाषेतले कांचनताईंचे आव्हान महिलांना आतून भिडणारे असते.
 
प्रबोधन, प्रशिक्षण आणि आत्मनिर्भरतेसाठीची वृत्तीघडण ही ‘स्वयंसिद्धा’च्या यशस्वीतेची त्रिसूत्री आहे. स्वाभिमान आणि स्वावलंबन ही संस्थेची मूल्यधारणा आहे. धडपडणार्‍या महिलांचे एक प्रेरणा केंद्र अशी आज ‘स्वयंसिद्धा’ची ओळख निर्माण झाली आहे. वैचारिक घडण, व्यवहाराची ओळख आणि आश्वासक आधार यांमुळे ते महिलांचे तिसरे घर झाले आहे.
 
कामाचे वाढत जाणारे वैविध्य
 
महिलांनी आवर्जून लिहिते व्हायला पाहिजे, आपले अनुभव शब्दबद्ध करायला हवे, यासाठी कांचनताईंनी ‘स्वानंदसखी फिचर्स’ नावाचे व्यासपीठ तयार केले. या माध्यमातून कोल्हापूरच काय, तर अन्य जिल्ह्यांतील दैनिकांमधूनही या अनुभवसिद्ध महिलांचे विचार या ‘स्वानंदसखी’च्या माध्यमातून पोहोचू लागले. महिलांनी व्यासपीठावर जाऊन आपले विचार मांडावेत, यासाठीही महिलांना प्रोत्साहन दिले. यासाठी ‘वाणीमुक्ती प्रकल्पां’तर्गत सूत्रसंचालन व कथाकथन याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते.
 
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील निवडक 25 गावांमध्ये ‘महिला आरोग्यदूत प्रकल्प’ संस्थेने ‘हिंडाल्को कंपनी’च्या अर्थसाहाय्यातून राबविलेला आहे. या महिलांना निवासी प्रशिक्षण व प्राथमिक औषधोपचार पेटी दिली जाते.
 
सरकारी अनुदानापासून चार हात दूर
 
सरकारी अनुदानाच्या मागे धावायचे नाही, असे स्वबंधन त्यांनी संस्थेत सुरुवातीपासूनच घालून घेतले होते. शासकीय अनुदान मिळविण्यासाठीच्या खटपटी व खटाटोप करत प्रकल्पांच्या कागदपत्रांच्या जंजाळात संस्था यामुळे कधीच अडकली नाही, हे विशेष!
 
नावीन्यपूर्ण अभिनव उपक्रम व प्रेरित मनुष्यबळ हाताशी असेल, तर सुरुवातीला हाताशी पैसे नसतानाही चांगले काम उभे राहू शकते. एकदा का काम उभे राहायला सुरुवात झाली की, पाठोपाठ पैसा उभा राहात जातो. नुसता व्यावसायिक अथवा व्यापारी दृष्टिकोन न ठेवता, सेवाभावी वृत्ती कामाच्या मुळाशी हवी, हेच खरे. त्यामुळे आता संस्थेच्या कोणकोणत्या कामासाठी व किती निधी हवा आहे, अशी विचारणा चांगल्या चांगल्या व्यक्ती व संस्थांकडून होत असते, हे ‘स्वयंसिद्धा’चे खरे यश आहे.
पिढ्यान्पिढ्या परंपरेचे जोखड मानेवर बाळगणार्‍या स्त्रीने एक प्रकारचा न्यूनगंड सतत मनात जोपासलेला असतो. या न्यूनगंडातून शहरी व ग्रामीण महिलांना बाहेर काढण्याचे आव्हान कसे पेलले, असे कुणी कांचनताईंना विचारले, तर त्या सहजपणे म्हणतात, “कोणताही कठीणात कठीण धातू शेवटी वितळतोच ना? आपण त्यासाठी किती उष्णता देतो हे महत्त्वाचे!” कोल्हापूरसारख्या परंपरावादी शहरात तर हे तीन दशकांपूर्वी घडवून आणणे, हे खरेच मोठे आव्हानात्मक होते.
 
आज आता याच दिशेने महाराष्ट्रभर बचतगटांच्या चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सबलीकरणाला एक वेगळी दिशा मिळाली आहे. परंतु, हे बचतगट फक्त कर्जवाटपासाठी अथवा केवळ आर्थिक व्यवहारासाठी नसून ते एक अनौपचारिक शिक्षणाचे व्यासपीठ आहे; ती लोकशाहीची प्रयोगशाळा आहे, या कांचनताईंच्या विचारातून प्रेरणा घेऊन व्यापक अंगाने त्याकडे बघायला हवे. या बचतगटांच्या चळवळीसाठी ‘स्वयंसिद्धा’चे काम हे एका दीपस्तंभासारखे आहे. म्हणूनच या उल्लेखनीय कार्याबद्दल कांचनताई परुळेकर यांचा ‘नातू फाऊंडेशन’तर्फे वर्ष 2024 मध्ये ‘सेवागौरव पुरस्कार’ (रु. एक लक्ष) समारंभपूर्वक देऊन विशेष सन्मान करण्यात आला होता. कांचनताई या एकप्रकारे सामाजिक कार्यातील जागृत शक्तिपीठच होत्या. कांचनताईंच्या ध्येयप्रेरणेचा वसा घेत शेकडोंच्या संख्येने स्वयंसिद्ध झालेल्या त्यांच्या असंख्य महिला कार्यकर्त्या याच त्यांच्या खर्‍या अर्थाने उत्तराधिकारी आहेत.
 
 विवेक गिरिधारी
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121