( Dedicated workers key to BJP success in struggle chdrashekhar bawankule ) कार्यकर्त्यांना घडविणारे हात सतत माझ्या पाठीवर असावे, ही भावना माझी आहे. पक्षाचा विस्तार कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे, विश्वासाचे आणि चेतनेचे ध्यासपर्व आहे. आज भाजप स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या वाढीसाठी अनेक विषय, प्रकल्प, आंदोलने, प्रवास, संवाद आठवले.
जपच्या विस्तार, वाढ आणि यशाचा प्रवास अतिशय खडतर, कलात्मक, परस्पर मानवीय संवेदनांचा आहे. आजच्या यशासाठी कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या खचल्या. त्यांच्या कष्टाला माझे कायम नमन आहे. आज स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या वाढीसाठी अनेक विषय, प्रकल्प, आंदोलने, प्रवास, संवाद आठवले. मी अध्यक्ष झाल्यापासून अनेकदा महाराष्ट्राचा प्रवास केला. कार्यकर्ते, पदाधिकार्यांना ताकद दिली. त्यांच्या डोळ्यांत पक्षवाढीची जिद्द पाहिली. त्यांचा अंगार अनुभविला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभेतील अभूतपूर्व यश मिळवले.
1980 ते 2025 या कालखंडातील भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील 45 वर्षांतील वाटचाल अनेक वैशिष्ट्यांनी भारलेली आहे. पक्षाची स्थापना झाल्या झाल्या काही महिन्यांतच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या भाजपने स्वतंत्रपणे व ‘कमळ’ निशाणी घेऊन लढल्या. पक्षाने 14 जागा जिंकल्या. तेव्हापासून सुरू झालेली भाजपची महाराष्ट्रातील वाटचाल म्हणजे विस्तार आणि यश यांची संघर्षपूर्ण गाथा आहे.
गेल्या 45 वर्षांमध्ये राज्यात दहा वर्षे सत्ता राबविण्याची संधी भाजपला मिळाली. आता जुलै 2022 पासून राज्यात शिवसेनेच्या साथीत भाजप पुन्हा सत्तेत आहे. भाजपचा पूर्वावतार असलेल्या जनसंघाची स्थापना महाराष्ट्रात 1953 साली झाली होती. 1977 साली जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षामध्ये जनसंघाचे विसर्जन होईपर्यंतच्या 25 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील जनसंघाचे अस्तित्व मर्यादितच होते. विधानसभेतील जनसंघाचे प्रतिनिधित्व पाच आमदारांच्या पलीकडे कधीही गेले नाही. 1957 साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या लाटेत जिंकलेल्या दोन जागांव्यतिरिक्त महाराष्ट्रातून जनसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेवर कधीही झाले नाही. वेगवेगळ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतून निवडून येणारे विधान परिषदेतील आमदार हाच जनसंघाचा विधिमंडळातील चेहरा होता. काही मोजक्या, हाताच्या बोटांवर मोजता येणार्या नगरपालिकांमध्ये जनसंघाची सत्ता होती. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर जनसंघाचे अस्तित्व सूक्ष्मदर्शकाखाली शोधूनसुद्धा सापडण्यासारखे नव्हते. 1977 मध्ये अस्तित्वात आलेल्या जनता पक्षात सामील होणार्या जनसंघाची ही स्थिती होती. आणीबाणी विरुद्ध केलेले आंदोलन आणि इंदिरा गांधींविरुद्धचा असंतोष यामुळे जनता पक्षाच्या निशाणीवर निवडून आलेल्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे आठ खासदार होते, तर त्यानंतर 1978 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे 28 कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले, पण जनता पक्षच अल्पजीवी ठरली. दि. 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली.
महाराष्ट्रव्यापी प्रसार पुणे, नागपूर, नाशिकसह महाराष्ट्रातील बहुतेक सर्व महानगरपालिका, अनेक नगरपालिका, जिल्हा परिषदेत भाजपला कोणत्या ना कोणत्या रूपात सत्तारूढ होता आले. ग्रामपंचायतींपासून ते केंद्र सरकारपर्यंतची सर्वस्तरावरील सत्ता राबविण्याची संधी भाजपला या काळात कधी ना कधी मिळाली. 1977 पर्यंत महाराष्ट्राच्या पाच-सहा जिल्ह्यांपुरताच मर्यादित असलेला जनसंघ भाजपच्या रूपाने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पसरला. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचा कधी ना कधी राज्याच्या विकासासंदर्भात विविध विभागांमधील असमतोल हा विषय तर भाजपनेच राज्याच्या विषयपत्रिकेवर आणला. या संदर्भातील दांडेकर समितीची नेमणूकदेखील भाजपने निर्माण केलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर झाली होती. या समितीच्या कामकाजात भाजपने पुढाकार घेऊन भाग घेतला. विशेषतः कोकण, विदर्भ व मराठवाडा यांचे सार्वत्रिक मागासलेपण अधोरेखित करण्यासाठी भाजपने अतोनात कष्ट घेतले.
2014 नंतरचे चित्र
2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील अनेक वर्षांची प्रस्थापित राजकीय समीकरणे मोडीत निघाली. नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सत्ता बदलण्याच्या केलेल्या आवाहनाला महाराष्ट्रानेही भरभरून प्रतिसाद दिला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. दि. 31 ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लक्षावधी भाजप कार्यकर्त्यांसाठी हा क्षण ऐतिहासिक होता. 2014 ते 2019 अशी सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात सत्तेत होते. या काळात भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायतीपासून महापालिकांपर्यंत सर्वत्र यशाचा झेंडा फडकावत ठेवला. 2019च्या निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही शिवसेनेच्या दगाबाजीमुळे भारतीय जनता पक्षाला राज्यात सरकार स्थापन करता आले नाही.
2024च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 149 जागा लढवत 132 जागा जिंकल्या. सतत तीन निवडणुकीत 100च्यावर जागा मिळवण्याची कामगिरी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पक्षाने केली. हा महाराष्ट्रातील विक्रम आहे आणि अभूतपूर्व यशाची निर्मितीही झाली.
बहुस्तरीय कार्य
1980 पासून विस्तार करण्यात भाजपला जे यश मिळाले, ते सामाजिक साक्षरता, तालुका पातळीवर समाजाच्या सर्व थरांमधील नेतृत्वाची उभारणी, प्रबळ अशा इतर मागासवर्गीयांचे नेतृत्व भाजपच्या झेंड्याखाली उभे राहिले. याच जोडीला भाजपने अनेक लहान-मोठी आंदोलने केली. संघटनात्मक विस्ताराचे अत्यंत योजनाबद्ध प्रयत्न केले. कापूस उत्पादकांचे आणि शेतकर्यांच्या कर्जमुक्तीचे आंदोलन या दोन आंदोलनांनी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत भाजपची ओळख पोहोचली. भाजपने स्वतःचे तरुण दलित नेतृत्वही घडवले. महाराष्ट्रातला अन्य कोणताही राजकीय पक्ष पाण्याच्या प्रश्नांकडे लक्ष देत नव्हता, तेव्हा 1985 मध्ये भाजपने छत्रपती संभाजीनगर येथे पहिली ‘पाणी परिषद’ घेतली. ती ‘पाणी परिषद’ आणि परळी वैजनाथ येथील ‘दुष्काळी परिषद’ यातून मराठवाड्यातील ग्रामीण भागांच्या निकडीच्या प्रश्नाशी भाजपने स्वतःला जोडून घेतले.
गेल्या 25 वर्षांमध्ये असंख्य लहान-मोठ्या व्यक्तींनी कष्ट घेतले आहेत. त्या सर्वांची नोंद प्रत्येकाच्या मनात आहे. संघटन विस्ताराची ही दिशा ठरवून देण्याचे काम वसंतराव भागवत यांनी यशस्वीरित्या केले. 1980 ते 1983-84 या काळात उत्तमराव पाटील, प्रमोद महाजन, प्रभाकरपंत पटवर्धन, लक्ष्मणराव मानकर आदींनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विशेषतः उत्तमराव पाटील व प्रमोद महाजन यांनी या काळामध्ये प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचणारे दौरे दोन-तीनदा केले. अनेक नेते मंडळींनी गेली दोन-अडीच दशके पक्षाच्या उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले. याच काळात रामभाऊ म्हाळगी, हशूजी अडवाणी, श्रीधर नातू, रामदास नायक, प्रा. ना. स. फरांदे, प्रा. रामभाऊ कापसे, रामभाऊ नाईक, नितीन गडकरी यांसारख्या अनेक ज्येष्ठांनी संसद व विधिमंडळात आपल्या कर्तृत्वाने स्वतःचा व पक्षाचा प्रभावी ठसा उमटवला. पक्ष मोठा करायला खस्ता खालेल्या अनेक कर्तृत्ववान नेत्यांची नावे आहेत.
त्या सगळ्यांनी अक्षरशः घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न विलक्षण आहेत. डॉ. शांताराम बापू करमळकर, वसंतराव पटवर्धन यांच्यासारख्या अनेक कुशल संघटक कार्यकर्त्यांच्या फळीने पक्षाच्या वाटचालीत आपले मोठे योगदान दिले.
सध्या संघटनपर्वाच्या माध्यमातून पक्ष मजबूत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सोबत असल्याने 1 कोटी, 51 लाख सदस्य होत आहेत. संघटन मजबुतीकरण व विस्ताराचा हा भलामोठा पल्ला कार्यकर्त्यांच्या भरवशावर, त्यांच्या सहकार्यानेच आणि त्यांच्याच आधाराने आपण गाठणार आहोत. भाजपची यशकथा ग्रंथाचा विषय आहे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून प्रवास करताना, संवादातून, कार्यक्रम, अभियानाच्या माध्यमातून मला इतकी विस्मयकारक ध्येयनिष्ठा बघायला मिळाली की, त्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल. कार्यकर्ते सोन्यासारखे आहेत. कार्यकर्ता हाच भाजपच्या महाविजयाचा खरा शिल्पकार आहे आणि भविष्यातील प्रत्येक विजयाचे शिल्पदेखील कार्यकर्त्यानेच साकार करावयाचे आहे. हा संदेश देऊन महाराष्ट्र काबीज करण्याच्या महाविजय मोहिमेचा प्रारंभ शिर्डीत भाजपच्या महाविजय अधिवेशनाने झाला आहे. 2024 या वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुकीतून नेत्यांच्या विजयाची हमी कार्यकर्त्यांनी घेतली होती. आता, प्राणपणाने झुंजलेल्या कार्यकर्त्यांना विजयी करण्याची शाश्वती नेत्यांनी घेतली आहे, म्हणूनच 2025 हे वर्ष कार्यकर्त्यांना समर्पित केले आहे.
कार्यकर्त्यांना घडविणारे हात सतत माझ्या पाठीवर असावे, ही माझी भावना आहे. पक्षाचा विस्तार कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे, विश्वासाचे आणि चेतनेचे ध्यासपर्व आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकार्यांना आणि नेत्यांना आजच्या, स्थापना दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
चंद्रशेखर बावनकुळे
(लेखक महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री आहेत.)