देदीप्यमान ज्योती म्हणून अहिल्यादेवींचे नाव चिरस्थायी, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे प्रतिपादन
06-Apr-2025
Total Views | 13
मुंबई : भारतातील मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या, सुराज्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या इतिहासाच्या पानातील एक नक्षत्र म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. देदीप्यमान ज्योती म्हणून अहिल्यादेवीचे नाव चिरस्थायी आहे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्ताने गेल्या वर्षभरात विविध कार्यक्रमांतून त्यांचे प्रेरणादायी चरित्र आणि अलौकिक योगदानाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच मालेतील एक प्रकट कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समिती, मुंबई महानगराच्या वतीने दादरमध्ये आयोजित करण्यात आला होता. रविवार, ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता राजा शिवाजी विद्यालय प्रांगण, दादर (पूर्व) येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला.
उपस्थिताना संबोधत सरकार्यवाह पुढे म्हणाले, "तीनशे वर्षांपूर्वी जन्मलेली विरांगना तिच्या कर्तृत्व, मातृत्व, आणि नेतृत्वास सतत प्रणाम करायची इच्छा होते. भारतात अशा अनेक विरांगना होऊन गेल्या. त्यांचे स्मरण केल्यास नवचैतन्य प्रत्येकात तयार होते."
रामराज्य, स्वराज्य, सुराज्य आणि धर्मराज्य याची सांगड घालत सरकार्यवाह पुढे म्हणाले, रामराज्य ही केवळ कल्पना नव्हती, ती वास्तविकता होती. इतिहासात पाहिलं तर स्वराज्य आणि सुराज्याचा उल्लेख आहे. राजधर्म आणि राजनीति काय असते हे या उदाहरणातून कळतं. राजसत्ता आणि कायदा याच्या आधारे सुराज्य चालते. धर्म राज्यात प्रत्येक व्यक्तीने धर्माचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर अध्यात्म शक्ती सुदृढ आणि उन्नत करणेही आज आवश्यक आहे. धर्मधिष्टित राज्याची देदीप्यमान ज्योती अहिल्यादेवी होत्या. अशा अहिल्यादेवींच्या प्रति भारतीयांनी कृतज्ञ राहिले पाहिजे.
यावेळी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयराजे होळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया, समारोह समिती सचिव मनीषा मराठे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अॅड. सरस्वती कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रम स्थळी महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा एक चित्ररथही उभा करण्यात आला होता. २५०० ते ३००० मातृशक्ती आणि श्रोतावर्ग यावेळी उपस्थित होता.
अहिल्यादेवींचे विचार सनातन हिंदु राष्ट्रानुरूप
समारोह समितीच्या अंतर्गत ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात मातृशक्तीची संख्या प्रेरणादायी होती. अहिल्यादेवींनी जनसेवेसाठी समर्पण हीच भावना स्वीकारली होती. प्रजेसाठी त्यांचं जीवन समर्पित होतं. अहिल्यादेवींचे विचार सनातन हिंदु राष्ट्रानुरूप होते.