मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन्यजीव तस्करीमधून बचाव करण्यात आलेल्या ३४० इंडियन स्टार प्रजातींच्या कासवांना जीवदान मिळाले आहे (Indian Star Tortoises Release). शनिवार दि. ५ एप्रिल रोजी या कासवांना वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूरच्या राजुरा येथील जंगलात सोडण्यात आले (Indian Star Tortoises Release). शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यामध्ये जनजागृती करुन या कासवांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. त्यामुळे या कासवांची आयुष्यभर पिंजऱ्यात राहण्यापासून मुक्तता झाली. (Indian Star Tortoises Release)
भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असणारे भारतीय स्टार प्रजातीचे कासव हे सगळ्यात जास्त तस्करी होणारे कासव आहे. या कासवाला सर्रासपणे पाळले जाते. अशाच वेगवेगळ्या तस्करीच्या घटनांमधून पकडण्यात आलेली कासवे ही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात काम करणाऱ्या वन्यजीव बचाव संस्थांकडे पिंजराबंद अधिवासात होती. या कासवांना एकत्रित करुन त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याचा कार्यक्रम वन विभागाने आखला होता. त्यासाठी २०२४ सालच्या अखेरीस रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुण्यातील बावधन येथील बचाव केंद्रात विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे, कोल्हापूर आणि डहाणू येथून ४४१ स्टार कासवांचे संकलन करण्यात आले. त्यापैकी अनेकांची शारीरिक परिस्थिती ही गंभीर होती. त्यांचा जगण्याचा दर अंदाजे ८० टक्के होता. या कासवांना वैद्यकीय सेवा, क्वारंटाइन आणि पर्यावरणीय अनुकूलन अशा सर्व टप्प्यांमधून जावे लागले. या टप्प्यांनंतर सक्षम असलेल्या ३४० कासवांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
चंद्रपूर येथील जंगलांमध्ये स्टार कासवांचा नैसर्गिक अधिवास असल्याने या कासवांना चंद्रपूरमध्ये सोडण्याचे ठरले. शुक्रवारी सायंकाळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) डाॅ. क्लेमेंट बेन यांच्या उपस्थितीत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टची टीम चंद्रपूरकरिता रवाना झाली. ९०० किलोमीटर प्रवास करुन ही टीम शनिवारी सकाळी चंद्रपूरला पोहोचली. त्याठिकाणी उपवनसंरक्षक श्वेता बोडडू यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत १०० शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मध्य चांदा येथील राजुरा वनपरिक्षेत्रातील जोगापूरच्या राखीव वनक्षेत्रामध्ये या कासवांना सोडण्यात आले. "महाराष्ट्र वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवासा राव यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत कासवांना सोडण्याचा कार्यक्रम आखल्याचे डाॅ. बेन यांनी सांगितले. या कार्यक्रमामुळे बेकायदेशीर वन्यजीव तस्करीच्या समस्येला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रातील वाढती वचनबद्धता दिसून आलीच. शिवाय शाश्वत पुनर्वसनाचा कार्यक्रम राबविल्यामुळे या प्राण्यांना पुन्हा आपल्या हक्काच्या अधिवासात परतण्याची संधी मिळाल्याचे, बेन म्हणाले.