दि. १८ एप्रिल रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात ज्ञानेश्वरांसह त्यांच्या भावंडाना त्रास देणार्या विसोबा खेचर यांची भूमिका अभिनेते योगेश सोमण यांनी साकारली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाबरोबरच, सावरकरांवरील वेबसीरिज, ओटीटी माध्यमांविषयी योगेश सोमण यांची भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने जाणून घेतली.
- तुमच्या आगामी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात प्रेक्षकांना नेमके काय पाहायला मिळणार आहे आणि या चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा नावाप्रमाणे मुक्ताई यांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. दिग्पाल यांनी ‘शिवरायष्टक’मधील पाच चित्रपट यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, आता त्यांनी ‘संतपट’ करायचा विचार मनी रुजवला आहे. यांपैकी पहिला चित्रपट म्हणजे ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई.’ या चित्रपटात मी काहीसा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विसोबा खेचर यांची भूमिका मी साकारत आहे. खेचर यांनी ज्ञानेश्वरांसह तिन्ही भावंडांना खूप त्रास दिला आणि नंतर शेवटी मुक्ताईकडूनच दिक्षा घेतली, असा माझ्या पात्राचा प्रवास आहे. हा चित्रपट दि. १८ एप्रिल रोजी प्रेक्षकांना आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
- कोणत्याही संतांचा जीवनपट एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणे, हे तसे आव्हानात्मकच. तेव्हा, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात संतांच्या जीवनचरित्राची मांडणी नेमकी कशाप्रकारे करण्यात आलेली आहे?
चित्रपटात कुठलेही साहित्य मांडताना दृश्य स्वरूपात त्याची मांडणी केली जाते. त्यावेळी अधिक महत्त्वाचे असते ते कथानक. कथानकाच्या माध्यमातून माऊलींचे विचार, एकूणच त्या चारही भावंडांचे विचार, तत्कालीन परिस्थिती, सनातनी विचार अथवा त्यांचा असलेला प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टी या चित्रपटामध्ये मांडल्या आहेत. संतांनी त्यांच्या खडतर आयुष्यातून संघर्ष करीत, लोकांना प्रेमाचा संदेश आपल्या वर्तवणुकीतून कसा दिला, हे या चित्रपटात दिसून येईल.
- संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांचे भावाबहिणीचे अतूट नाते या चित्रपटातून नेमके कसे उलगडले आहे?
मी जेव्हा माऊलींच्या आयुष्याकडे बघतो, त्यानुसार ही चारही भावंडे रक्तामांसाची जरी असली, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंची अपत्ये असली, तरी ते चारही चैतन्यस्वरूप होती, असे मला वाटते. त्या चौघांचा जन्म होणे, हाच योग होता. तो एका विशिष्ट कार्यासाठी झाला होता. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’ किंवा त्यांनी रचलेल्या स्वयंरचना या सगळ्यांसाठीच त्या चौघांचा ’जन्मयोग’ जुळून आला होता. त्यांचे बहीण-भाऊ एवढेच मर्यादित नाते नव्हते. ती चैतन्यरूपे होती आणि ती एकमेकांमध्ये छान अनुरूप होती.
- ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या आगामी चित्रपटाबरोबरच स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनावर आधारित तुमची वेबसीरिजही लवकरच ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा, त्या सीरिजमध्ये सावरकरांच्या जीवनाच्या कोणत्या पैलूंवर भर दिला आहे?
त्या सीरिजचे नाव आहे ’वीर सावरकर : द सिक्रेट फाईल’. एकूण चार सीझनची ही मालिका आहे. सावरकरांच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रणदिप हुड्डा यांची ‘सावरकर’ ही कलाकृती उत्तम आहे, त्याबद्दल काही वादच नाही. सावरकरांचा जीवनप्रवास हा व्यापक असल्याने तो तीन तासांच्या चित्रपटात मांडणेदेखील अपुरे ठरेल. म्हणूनच मी ठरवले की, याविषयी मालिका काढायची. या मालिकेचा पहिला भाग सावरकरांच्या जन्मापासून ते त्यांच्या लंडन प्रवासापर्यंतचा आहे. दुसरा सीझन हा संपूर्ण क्रांतिकारी आहे, ज्यामध्ये मदनलाल धिंग्रा, जॅक्सनचा वध, सावरकरांना अटक आणि दोन जन्मठेपांची शिक्षा इथपर्यंतच्या त्यांच्या जीवनकहाणीचा समावेश आहे. तिसरा भाग हा संपूर्ण सेल्युलर जेल आणि रत्नागिरीचा कालखंड आहे आणि चौथा हा हिंदू महासभा आणि गांधीहत्या यावर आधारित आहे. जवळपास ५० मिनिटांचा एक भाग अशी या मालिकेची रचना आहे. याचा पहिला भाग दि. १५ ऑगस्टला प्रेक्षकांना पाहता येईल.
- ‘ओटीटी’ माध्यमांकडे आजच्या पिढीचा आणि एकंदरच प्रेक्षकवर्गाचा ओढा विशेषत्वाने ‘कोविड’ काळानंतर वाढलेला दिसतो. तेव्हा, एका कलाकार म्हणून या माध्यम स्थित्यंतराकडे आपण कसे बघता?
प्रेक्षकांचा ओढा ‘ओटीटी’कडे वळणे, हे साहजिकच आहे. कलाकृतीचा आनंद एकट्याने घेण्यासारखा आहे. भाषण अथवा व्याख्याने आपण सगळ्यांसोबत ऐकू-पाहू शकतो. पण, जर मुळातच एखादा गंभीर चित्रपट असो अथवा निरुपण पाहणार किंवा ऐकणार असू, तर ते आपल्याला व्यक्तिगत पाहायलाही जास्त आवडते, असे मला वाटते. सिनेमा, वेबसीरिज जर मी माझ्या वेळेप्रमाणे हवी तेव्हा पाहू शकत असेन, एखादा प्रसंग रटाळ असेल, तर त्याला वगळणे, हवे तिथे थांबणे-चालू करणे, असे जर मी करू शकतो, तर साहजिकच आहे की प्रेक्षकदेखील असे करतात. ‘ओटीटी’चा ज्याप्रकारे प्रचार आणि प्रसार झाला आहे, याचा अर्थ लोकांना ते माध्यम आवडत आहे. ‘ओटीटी’ला आता नाकारता येणे शक्य नाही. उलट आपल्याला त्याचा फायदा कसा घेता येईल, हे पाहिले पाहिजे.
- कलाक्षेत्रातील मुशाफिरीसोबतच तुम्ही सामाजिक विषयांवर वेळोवेळी प्रखरपणे आपले मतप्रदर्शनही करता. पण, बरेचदा कलाकारांनी सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर भाष्य करणे योग्य की अयोग्य, अशा चर्चा रंगताना दिसतात. तर याविषयी नेमके तुमचे मत काय?
मी एका विचारधारेचा पाईक आहे. माझा व्यवसाय किंवा जगण्याचे साधन म्हणून मी कलाक्षेत्रात काम करत असतो. पण, तरोीही मी लहानपणापासून एका विचारधारेने मोठा झालो आहे. जर एका सामाजिक मुद्द्यावर माझे काही ठोस मत असेल किंवा एखाद्या विषयावर माझा अभ्यास असेल, तर मी माझे मत मांडले पाहिजे. माझ्यावर जर असे संस्कार झाले असते की, ‘आपण भले, आपले काम भले,’ तर कदाचित मी काहीच बोललो नसतो. पण, माझ्यावर तसे संस्कार झालेले नाहीत. जर एखाद्या मुद्द्यावर तुम्हाला बोलता येत असेल, पण दुसर्याचे मन न दुखावता तुम्हाला बोलता येत असेल, तर जरुर बोला! आपल्याकडे दुसर्याला दुखावण्यासाठी बोलले जाते, जे आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावर मला असे वाटते की, माझे मत मला जितके ठामपणे मांडता येत असेल, तेही कोणाचेही मन न दुखावता, तर मला ते बोलण्यात अथवा माझे मत मांडण्यात काही वावगे वाटत नाही.