दर्जेदार सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच : समीर चौघुले

    05-Apr-2025   
Total Views |

interview with sameer chaughule
 
यंदाच्या कडाक्याच्या उष्णतेचा प्रभाव कमी करता यावा, यासाठी मे महिन्यात सगळ्यांच्या मनाला थंडावा देणारा ‘गुलकंद’ हा चित्रपट दि. १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने अभिनेते आणि विनोदवीर समीर चौघुले यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही दिलखुलास बातचीत...
 
गुलकंद जितका जास्त दिवस मुरतो, तितका त्याचा गोडवा वाढत जातो. अगदी तसेच नातीगोतीही कालौघात अधिक घट्ट होत जातात; त्यात गोडवा निर्माण होतो. पण, कधीकधी या नात्यांमध्ये एकसुरीपणाही येतो. तेव्हा त्या नात्यांना नवचैतन्याची, नवलाईची आणि ताजेपणाची गरज असते. ‘गुलकंद’ हा चित्रपट हीच नवलाई, हेच ताजेपण आणि हा नात्यांचा गोडवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाला आहे.
 
तेव्हा ‘गुलकंद’ या चित्रपटाविषयी अभिनेते समीर चौघुले यांना विचारले असता ते म्हणाले की, “उन्हात थंडावा देणार्‍या गुलकंदासारखाच हा सिनेमा प्रेक्षकांना दोन-अडीच तास निखळ आनंद, हसू आणि हळूवार भावना देऊन जाईल. हा केवळ एक करमणुकीचा सिनेमा नसून, आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचे सौंदर्य उलगडणारा अनुभव या चित्रपटातून मांडलेला आहे.” हा चित्रपट करण्यामागे कारण काय, असे विचारले असता चौघुले म्हणतात की, “या चित्रपटाचा भाग होण्यामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक-निर्माते सचिन मोटे. गेली आठ वर्षे आम्ही एकत्र काम करत आहोत. ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून आमचे नाते फुलले, वाढले आणि आज चित्रपटाच्या रूपाने त्याला एका नव्या उंचीवर घेऊन जात आहोत. या दोघांवर असलेला विश्वास म्हणजेच या चित्रपटाची खरी उभारणी.”
 
आपल्या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना चौघुले यांनी सांगितले की, “माझ्यासाठी या चित्रपटाचा हिस्सा होणे ही खरेच खूप मोठी गोष्ट आहे. कारण, यात मला मकरंद ढवळे हे पात्र साकारण्याची संधी मिळाली. मकरंद हे पात्र अगदी माझ्यासारखेच साधे, सरळ, प्रेमळ आणि थोडे गोंधळलेले. प्रत्येक कुटुंबात असा एक मकरंद असतोच, जो सगळ्यांचे मन जिंकतो. प्रेक्षकांना हे पात्र आपले वाटेल, याची मला पूर्ण खात्री आहे.” सहकलाकारांसोबत काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल चौघुले म्हणतात की, “प्रत्येक कलाकाराकडून बरेच काही शिकायला मिळाले. मुख्यतः सई ताम्हणकरसोबत काम करणे, हा माझ्यासाठी एक स्वप्नपूर्तीचा क्षण होता. मी तिचा प्रचंड चाहता आहे आणि स्क्रीनवर तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तिच्यासारख्या अनुभवी अभिनेत्रीबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळाले.”
 
मराठी चित्रपटांना प्रेक्षक चित्रपटगृहात येऊन फारसा प्रतिसाद देत नाही, याविषयी छेडले असता चौघुले म्हणाले की, “आपण प्रामाणिकपणे एखादा दर्जेदार सिनेमा बनवला आणि त्याचा योग्य प्रकारे प्रचार केला, तर प्रेक्षक त्याला नक्की दाद देतात. प्रेक्षक चित्रपटगृहात येण्यासाठी आवर्जून वेळ काढतात, पैसेही खर्च करतात, तेव्हा त्यांना त्यांच्या वेळेचा आणि पैशाचा योग्य मोबदला मिळायला हवा आणि ‘गुलकंद’ तो अनुभव प्रेक्षकांना नक्की देईल, याची मला खात्री आहे.” सरतेशेवटी समीर चौघुले यांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’विषयी विचारले असता, विचार खरी ओळख निर्माण झाली, यावर समीर चौघुले म्हणतात, “ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे मला जी लोकप्रियता मिळाली, तो माझ्यासाठी आशीर्वाद आहे. ही ओळख केवळ मराठीत नाही, तर संपूर्ण भारतात पसरली आहे. पंजाब, गुजरात, दक्षिण भारत सगळीकडे हसवण्याचे हे काम पोहोचले आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, हास्य आणि कलेला भाषेचे बंधन नसते.”

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा