
मुंबई : मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते
डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून आजाराशी झुंज देत
असलेल्या डॉ. उजवणे यांनी ६२ व्या वर्षी मीरारोड येथील एका खासगी रुग्णालयात
अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीवर
शोककळा पसरली आहे.
चार दिवस सासूचे, दामिनी, वादळवाट यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून
त्यांनी घराघरात आपली छाप पाडली होती. सकारात्मक तसेच खलनायकी भूमिका
साकारताना त्यांचा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांच्या मनात ठसला. अभिनयावरील
निष्ठा आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे ते अनेकांच्या लाडके कलाकार बनले होते.
डॉ. उजवणे यांच्यावर शनिवार, ५ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.
अभिनयासोबत आरोग्य आणि आर्थिक लढाई
काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर डॉ. उजवणे यांच्या आरोग्यावर मोठा
परिणाम झाला होता. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा त्रासही जाणवू लागला.
उपचारांदरम्यान त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आणि २०२२ साली त्यांच्या
मित्रांनी सोशल मीडियावरून आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. अनेक चाहत्यांनी
आणि सहकलाकारांनी त्यांना साथ दिली होती.
नागपूरपासून मुंबईपर्यंतचा प्रवास
नागपूर येथे जन्मलेले डॉ. उजवणे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते. मात्र,
अभिनयाची ओढ त्यांना मुंबईकडे घेऊन आली. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी
अभिनय प्रवास सुरू केला. शुभम भवतु हा त्यांचा संवाद प्रेक्षकांच्या विशेष
लक्षात राहिला. त्यांनी ११०हून अधिक चित्रपट आणि १४०हून अधिक मालिकांमधून आपली
भूमिका साकारली.
डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण
झाली आहे. त्यांच्या आठवणी, काम आणि व्यक्तिमत्त्व कायमच स्मरणात राहील.