मुंबई : बदलत्या काळासह, कलेच्या प्रांतात वेगवेगळे प्रयोग आपल्याला अनुभवयाला मिळतात. या प्रयोगांच्या माध्यमातून विविध विषयातील नवनवीन दालनं सामान्यांसाठी उपलब्ध होतात. कलेच्या प्रांतात प्रयोगशिलता जपत नवनवीन आविष्कार करणारा असाच एक तरुण म्हणजे प्रणव सातभाई. दि. ३ एप्रिल रोजी प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदीर येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या कला दालनात प्रणवच्या डिजिटल पोर्टेटच्या प्रदर्शनाचे उद्धटन करण्यात आले. सुप्रिसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी, प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. ६ एप्रिल पर्यंत प्रेक्षकांना या प्रदर्शनाचा आनंद घेता येणार आहे.
डिजिटल पोर्टेट साकारणारा कलाकार म्हणून विविध माध्यमांनी त्याच्या कार्याची दखल घेतली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे त्याने काढलेले पोर्टेट समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनाथांच्या माई सिंधुताई सकपाळ यांच्यापर्यंत त्याच्या ह्दयस्पर्शी चित्रांची अनुभूती अनेकांनी घेतली आहे. एखादे चित्र जेव्हा आपल्या नजरेसमोर येते तेव्हा आपण केवळ त्या चित्राकडे बघतो. परंतु प्रणव मात्र आपल्या कुंचल्यातून त्या चित्रामधील सौंदर्य स्थळं शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या तयार केलेल्या डिजिटल पोर्टेट्स मध्ये आपल्याला हेच बघायाला मिळते.
एखाद्या कलाविष्काराचा कसा जन्म घेतो, यामागची प्रेरणा सुद्धा विचारात घेण्याजोगी आहे. आपल्या डिजिटल पोर्टेटच्या छंदाविषयी बोलताना प्रणव म्हणतो की डिजिटल पोर्टेट हे मॅजिक आर्ट आहे. अद्याप लोकांना याविषयी माहिती नाही, या कलाप्रकाराचा प्रसार व्हावा म्हणूनच मी हे प्रदर्शन भरवत आहे. कोविडच्या काळात ज्या वेळी सगळी कला दालनं बंद होती, त्या वेळेस या डिजिटल पोर्टेटची निमिर्ती प्रणव यांनी घरीच केली. एका वर्षात एक हजार डिजिटल पोर्टेट तयार करण्याचा विश्वविक्रम प्रणवच्या नावावर आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेकांच्या शाबासकीची थाप प्रणवला मिळालेली आहे. प्रणवच्या कामाची आणखी खासियत म्हणजे डिजिटल पोर्टेटच्या निर्मितीमध्ये नवनवीन विषयांचा शोध घेत असताना, काळाच्या ओघात जी चित्रे अस्पष्ट होतात, त्यांच्या पुननिर्मीतीचे काम सुद्धा त्याने हाती घेतले आहे.
चित्र म्हणजे आठवणींचा एक सुर्वणमय ठेवा. हा ठेवा आपल्याला आपल्या समृद्ध भूतकाळाचे दर्शन घडवत असतो. चित्र म्हणजे केवळ चित्र नसून ते एक संवेदनांचे भावविश्व आहे. आजचा काळ हा डिजिटल युगाचा आहे. काळाची पाऊलं ओळखून आपल्या कामामध्ये सातत्याने परिवर्तन घडवणारे कमीच. प्रणव सातभाई हे नाव याच यादीतील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चित्रशिल्पांमध्ये नावीन्याचे रंग भरणाऱ्या या कलाकाराला दै. मुंबई तरुण भारततर्फे शुभेच्छा.