भारतापलीकडील रामायण असा विचार करताच, नजर आपसूकच आग्नेय आशियाकडे वळते. पण, रामकथेच्या संस्कृतीसंपन्न परंपरेने सातासमुद्रापार अगदी युरोपीय अभ्यासकांना, साहित्यिकांनीही भुरळ घातली. म्हणूनच केवळ फ्रेंच किंवा जर्मनच नव्हे, तर इटालियन, पोलिश, रशियन भाषेतही रामायणाचे अनुवाद प्रसिद्ध झाले आणि ती युरोपीय जनमानसानेही मनस्वी स्वीकारलेले दिसतात. त्यानिमित्ताने युरोपीय जनमनातील रामकथेच्या रामरंगाचा मागोवा घेणारा हा लेख...
रामायण म्हणजेच रामाचा प्रवास. रामाच्या जोडीने तो सीतेचा, लक्ष्मणाचा आणि काही प्रमाणात हनुमान, भरत आणि अगदी रावणाचाही प्रवास आहे. संस्कृतमधील सर्वप्रथम ‘वाल्मिकी रामायण’ असो, मध्ययुगीन ‘तुलसी रामायण’ असो किंवा मराठीमधील अलीकडील सुरेल असे ‘गीतरामायण’ असो, रामकथेची भूल भारतीय जनमनावरून कधीही उतरेल, असे वाटत नाही. भारताच्या सीमांबाहेरील आग्नेय आशियातील थायलंड, कंबोडिया इत्यादी देशांमध्येही रामकथेचे अस्तित्व चिरकाळ आहे. आज मात्र आपण युरोपमधील रामकथेच्या प्रभावाबद्दल थोडेसे जाणून घेऊ.
युरोप हा खंड ५० देशांनी मिळून बनलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहता, त्यातील काही देश आपल्या महाराष्ट्रापेक्षाही लहान आहेत. या खंडात जर्मन, फ्रेंच, रशियन, इंग्रजी इत्यादी एकूण २४ अधिकृत भाषांना मान्यता आहे. त्यामुळे युरोपीय जनमनातील रामकथेचा शोध घ्यायचा असेल, तर तो या विविध भाषांद्वारे घ्यावा लागतो.
रामायणाची युरोपीय भाषांतरे
जर्मनी
जर्मनीमध्ये संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीसंबंधी अध्ययन आणि अध्यापनाचा गेल्या दोन शतकांचा इतिहास आहे. रामायणही त्याला अपवाद नाही. त्यामुळे रामायणाची जर्मन भाषेत एकापेक्षा जास्त अंशतः किंवा पूर्ण भाषांतरे झाली आहेत. जे. मेन्राड यांनी १८९७ मध्ये रामायणाच्या पहिल्या म्हणजेच बालकांडाचे भाषांतर केले. त्या पुस्तकाच्या प्रारंभी रामायणाच्या सात कांडांचा उल्लेख आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त बालकांडाचीच प्रत उपलब्ध आहे. या प्रतीवरून जाणवते की, भाषांतरकाराने हे काम अतिशय सखोलपणे केलेले आहे. सविस्तर प्रस्तावनेनंतर प्रत्येक अध्यायाचे भाषांतर केलेले दिसते. शिवाय, श्लोकांच्या भाषांतराखाली सविस्तर तळटीपाही वाचायला मिळतात. मेन्राड यांचे सर्व कांडांचे असे अभ्यासपूर्ण भाषांतर उपलब्ध असते, तर संशोधक आणि जिज्ञासूंना त्याचा मोठाच लाभ झाला असता, असे वाटते.
अन्डीन वेल्ट्श्स यांनी रामायणाचे केलेले जर्मन भाषेतील आणखी एक भाषांतर उपलब्ध आहे. २००६-२००८ या कालावधीत त्यांनी हे भाषांतर केले आहे. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या चित्तवेधक अशा संस्कृत महाकाव्यांची त्यांना जेव्हा ओळख झाली, तेव्हा त्यांना राहवेना. त्यामुळे राल्फ गिफिथ यांच्या १८७४ आणि मन्मथ नाथ दत्त यांच्या १८९४ सालच्या इंग्रजी भाषेतील अनुवादांच्या आधाराने त्यांनी रामायणाचे हे भाषांतर केले. हे पुस्तक छापील प्रतीव्यतिरिक्त ई-पुस्तक आणि एम.पी.३ याही प्रकारात उपलब्ध आहे.
डर्क ब्युशनर यांनीही जर्मन भाषेत रामायणाच्या सातही कांडांचे भाषांतर केले असून, त्यात सविस्तर टिप्पणी आणि चित्रेसुद्धा आहेत. भाषा जरी जर्मनच असली, तरी ते स्वित्झर्लंड येथील ‘गोविंदा’ नावाच्या प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले आहे.
पण, जर्मन विद्वान केवळ भाषांतरावरच समाधानी नसावेत. कारण, जर्मनीमधील ज्येष्ठ संस्कृत विद्वान हर्मान याकोबी यांचे रामायणाचा इतिहास आणि कथा यांच्यावरचे संशोधनात्मक लेखन जर्मनीत १८९२ साली प्रकाशित झाले होते.
इटली
इटालियन भाषेमध्येही रामायणाचे भाषांतर १९व्या शतकातच झाले. ‘तुरीन विद्यापीठा’च्या संस्कृतविषयक अध्यासनाच्या प्रा. गास्पर गोरेशिओ यांनी १८४३ ते १८६७ या काळात हे महत्त्वाचे काम केले. इटलीचे राजे अल्बर्ट यांनी यासाठी आवश्यक ते अर्थसाहाय्य दिले. त्यातील पहिला खंड १८४३ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर रामायणाची चिकित्सक आवृत्ती, प्रस्तावना, इटालियन भाषांतर आणि टीपा हे सर्व असलेले पुढचे खंड टप्प्याटप्प्याने प्रकाशित झाले. एकूण १२ खंडांमध्ये हे इटालियन भाषांतर आकारास आले. रामायणाच्या चिकित्सक आवृत्तीकरिता प्रा. गोरेशिओ यांना उत्तर भारतातील आणि बंगालमधील अशी दोन वेगवेगळी हस्तलिखिते उपलब्ध होती. प्राचीनता आणि कलात्मकता या दोन्ही निकषांवर गोरेशिओ यांनी बंगाली हस्तलिखित त्यांच्या कामाचा आधार म्हणून निवडले. पॅरिसमधील ‘इंप्रेमिर नाशनाल’ यांच्याकडून ही पहिली प्रत प्रकाशित झाली. याकरिता त्या काळात खास देवनागरी अक्षरांचे ठसे निर्माण केले गेले. १९८०च्या दशकात या सर्व खंडांचे प्रकाशन ‘द इंडियन हेरिटेज ट्रस्ट’कडून पुन्हा एकदा केले गेले. यावेळी त्यात प्रस्तावनेचा आणखी एक खंड वाढला होता. यामध्ये गोरेशिओ यांनी ‘वाल्मिकी रामायणा’ची प्राचीनता, त्याचे ऐतिहासिक स्रोत, कथात्मकता यांचा मनोवेधक परिचय करून दिला होता. या खंडाचे पुढे प्रा. ऑस्कर बोट्टो यांनी इंग्रजीत भाषांतर केले.
रशिया
रशियन भाषेत सर्वप्रथम उपलब्ध झालेले रामायण हे तेथील भारतविद्यातज्ज्ञ अलेक्झांडर बरानिकोव्ह यांनी केलेले हिंदी ‘रामचरित मानस’चे भाषांतर होते. १९४८ साली हे प्रकाशित झाले. त्यानंतर १९८६ मध्ये झाकारिन आणि पोटापोव्हा या द्वयीने ‘वाल्मिकी रामायणा’तील काही भाग अनुवादित केला. कालांतराने पावेल ग्रिन्सर यांनी ‘वाल्मिकी रामायणा’च्या निर्दोष भाषांतराचे काम हाती घेतले. विशेष म्हणजे, हे भाषांतर पद्य स्वरूपात होते. पहिली दोन कांडे २००६ मध्ये एका शैक्षणिक लेखनमालेच्या अंतर्गत प्रसिद्ध झाली. तिसरे कांड २०१४ मध्ये ग्रिन्सर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. चौथ्या आणि पाचव्या कांडांचे काम सुरू असून ती लवकरच रशियन वाचकांपर्यंत पोहोचतील, अशी आशा आहे.
स्पेन
स्पॅनिश ही भाषा विविध देशांमध्ये बोलली जात असल्याने, जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांपैकी स्पॅनिश ही दुसरी भाषा आहे. असे असले तरी, स्पेन या युरोपियन देशात तिचे मूळ आहे. रोनाल्डो कुदोस अनाया या विज्ञानाच्या प्राध्यापकाने रामायणाचे स्पॅनिशमध्ये सर्वप्रथम भाषांतर केले. ‘रंगपुरी दास’ या नावाने दीक्षा घेतल्यानंतर त्यांना संस्कृत भाषेचा गोडवा लक्षात आला. त्यानंतर त्यांनी २०१४ साली स्पॅनिश भाषांतराचे काम केले. चांगले आणि वाईट, सुष्ट आणि दुष्ट यांतील फरक कळण्यासाठी रामायण जगाला पथदर्शक ठरेल, ही भाषांतरामागील त्यांची उदात्त भावना होती. रामायण ही केवळ एक कथा नव्हे, तर त्यात अनेक वैज्ञानिक संदर्भ आहेत, या दृष्टिकोनातून त्यांनी लॅटिन अमेरिकेत रामायण सर्वत्र पोहोचवायचे ठरवले. बोलिव्हिया देशातील सर्व शाळांमध्ये हे भाषांतर उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, जेणेकरून लहान वयातच तेथील मुलांना जीवनाची तत्त्वे सहजपणे समजतील, असा त्यामागील त्यांचा विचार दिसतो.
फ्रान्स
रामायणाचे फ्रेंच भाषांतर २०११ साली एकूण सात खंडांत प्रकाशित झाले आहे. याचे आगळेपण म्हणजे, या भाषांतराच्या प्रत्येक पानावर कथेतील प्रसंगाला साजेसे एक देखणे ‘मिनिएचर’(छोटे) चित्र दिलेले आहे. जयपूरच्या महाराजांकडे मिनिएचर चित्रे असलेला, रामायणाशी संबंधित ५०० वर्षे जुना चित्रखजिना होता. त्यातून तसेच जगभरातून, रामकथेवरील मिनिएचर चित्रे शोधण्याचे अवघड काम डायना डि सेलर्स या फ्रान्समधील प्रकाशिकेने केले. त्यापैकी साधारण ६०० चित्रांची पुनर्निर्मिती त्यांनी केली आणि एक देखणे भव्य काम पूर्णत्वास नेले. पहाडी आणि मुघल शैलीत काढलेली ही चित्रे आहेत. ‘अज्ञानरूपी तसेच अहंकाररूपी अंधारावर प्रकाशाची मात’ असा रामायणाचा संदेश आहे, असे प्रकाशिकेचे मत आहे. तो जगभर पोहोचावा, यासाठी त्यांनी हे प्रकाशन केले, असे कळते.
पोलंड
पोलंड हा मध्य युरोपातील एक देश. स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख असलेल्या या देशाची पोलिश ही भाषा. १९व्या शतकाच्या पूर्वार्धातच रामायणाच्या काही भागांचे भाषांतर पोलिशमध्ये झाले असल्याचे काही संदर्भ सापडतात. मात्र, ते मूळ भारतीय भाषेवरून नसून, इंग्रजी भाषांतरावरून झाले, असे मानले जाते. २०१३ साली मात्र यानुस क्षिझोव्स्की या भारतविद्येतील तज्ज्ञाने मूळ संस्कृत रामायणावरून त्यातील सातही खंडांचे पोलिश भाषेत केलेले भाषांतर प्रसिद्ध झाले.
आंशिक प्रयत्न
याशिवाय, रामायणाची काही आंशिक भाषांतरेही वेगवेगळ्या युरोपीय भाषांमध्ये झालेली आहेत. उदाहरणार्थ, हिप्पोलाईट फाउख यांचे फ्रेंच भाषेतील भाषांतर पॅरिसमधील प्रकाशकाने प्रसिद्ध केले होते. त्यात पहिल्या सहा कांडांचा उल्लेख आहे. मात्र, त्यातील फक्त बालकांड आणि अयोध्या कांड यांचेच भाषांतर ऑनलाईन माध्यमांत सापडते. ते १८६४ मध्ये छापलेले आहे. तसेच ऑगस्ट विल्हेल्म श्लेगेल यांनीही पहिल्या दोन कांडांचे भाषांतर केले होते. ते लॅटिनमध्ये असून इंग्लंड येथे १८९९ मध्ये छापले गेले. याच्या सुरुवातीला ‘रामायणं वाल्मीकीयं’ असे लिहिले असून सिंहासनस्थ राम-सीता, त्यांच्यावर छत्र धरलेले दोन भाऊ आणि दोन्ही टोकांना हात जोडलेले दोन वानर असे चित्र छापले आहे. यातल्या बालकांडाला प्रदीर्घ प्रस्तावनाही आहे. क्रिस्टिआन रायडु स्टायकु यांनी रोमेनियन भाषेत बालकांड ते सुंदरकांड अशा पाच कांडांचे भाषांतर केले आहे. ते २०१६ ते २०२२ या काळात बुखारेस्ट इथून प्रकाशित झाले आहे.
दृश्य माध्यमात रामायण
चिरंतन नीतिमूल्ये असलेली रामायण कथा जनमानसात पोहोचवण्यासाठी आधुनिक काळात इतरही काही प्रयत्न झालेले दिसतात. यातील उल्लेखनीय म्हणजे, रशियातील बालनाट्यभूमीवरील रामायणाचे सादरीकरण. रशियातील प्रसिद्ध भारतविद्यातज्ज्ञ नतालिया गुसेवा यांनी रामायणावरील या बालनाट्याची पटकथा लिहिली होती. गेनाडी पेख्निकोव यांनी यातील रामाची प्रमुख भूमिका साकारली होती. तिथून पुढे ४० वर्षे ते ही भूमिका करतच राहिले. यासाठी त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराचा मानही प्राप्त झाला. या बालनाट्याचे सर्वप्रथम १९५७ मध्ये तत्कालीन रशियात, मॉस्को बालनाट्यभूमीकरिता सादरीकरण झाले. त्यानंतर अनेक दशके हे बालनाट्य सादर होत राहिले आणि बालप्रेक्षकांनी त्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. यामुळेच २००१ मध्ये मॉस्कोमधील ‘जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रा’ने या नाटकाशी संबधित सर्वांचा विशेष सन्मान केला होता.
रशियातील रामप्रेमाची ही कहाणी इथेच थांबत नाही. रशिया-भारत सांस्कृतिक मैत्रीसाठी कार्यरत असलेल्या ‘दिशा’ नामक संस्थेने, २०१८ पासून रामलीलेच्या रूपाने रामाचा हा प्रवास निरंतर ठेवला आहे. त्यात अभिनय करणार्या तरुण रशियन अभिनेत्यांना रामकथेतील पात्रे परिचित वाटतात. या व्यक्तिमत्त्वांच्या रशियातील प्राचीन व्यक्तिरेखांशी असलेल्या अदृश्य संबंधाची त्यांना मनातून जाणीव आहे. साधारण याच काळात, दृश्य कलेमध्ये स्पॅनिश भाषेत एक वेगळाच प्रयत्न केला गेला. २०२० मध्ये रामायणाच्या कथा भागावर एक ‘पपेट शो’ अर्थात कठपुतळ्यांचा एक कार्यक्रम स्पॅनिश भाषेत सादर केला गेला. स्पॅनिशमध्ये असूनही हा कार्यक्रम तयार मात्र इंग्लंड देशात झाला. तेथील स्पॅनिशविषयक एका संस्थेमधील डेव्हिड गोंझालेझ् नावाच्या किशोरवयीन मुलाने याचे कथानक तयार केले. त्यानंतर त्याचे इंग्रजीमधून स्पॅनिशमधील रूपांतर मारिया रुईझ् हिने केले. दिवाळी साजरी का केली जाते, यामागील कारण सांगण्यासाठी कठपुतळ्यांचे हे सादरीकरण झाले. राम, सीता आणि लक्ष्मण यांची ओळख करून देऊन हा कार्यक्रम सुरू होतो. सीता स्वयंवरापासून सुरू झालेला कथाभाग राम, सीता आणि लक्ष्मण वनवास संपवून अयोध्येत परत आल्यावर संपतो.
हा कार्यक्रम तयार करताना पटकथाकार आणि इतर सहभागींना भारतीय संस्कृतीची जाणीव असावी, असे जाणवते. उदाहरणार्थ, संन्यासी रूपातील रावण सीतेसमोर येतो. त्यावेळी सीतेला उद्देशून ‘नमस्ते, भवती भिक्षां देहि।’ असे त्याचे वाक्य प्रेक्षकांना ऐकू येते. पुढे युद्धात रावणाला मारल्यावर, त्याच्याप्रति आदर व्यक्त करणारा राम दाखवला आहे. त्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिवाळी साजरी झाली, हे सांगून तेलवाती घातलेल्या समयांच्या साक्षीने हा कार्यक्रम समाप्त होतो. भारतीय सण, कपडेलत्ते, दागिने आणि मुख्य म्हणजे सांस्कृतिक मूल्यांचे आकर्षणच नाही, तर महत्त्व परदेशीय तरुणाईला पटले आहे, याची साक्षच यातून पटते. युट्यूबवर या कार्यक्रमाची चित्रफीत आपल्याला पाहायला उपलब्ध आहे.
रामायण एक सांस्कृतिक सेतू...
भारतापासून हजारो किमी दूर असूनही युरोप खंडातील रामायणाचा प्रभाव आपण पाहिला. परमपवित्र सीतेला परत आणण्यासाठी श्रीरामाने भारत आणि लंका यात बांधलेला सेतू सर्व रामप्रेमींना चांगलाच माहीत असतो. भारतभूमी आणि सुदूर युरोप यांच्यामध्ये रामायण हे जणू अशा एका सांस्कृतिक सेतूचीच भूमिका निभावते आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये!
डॉ. मुग्धा गाडगीळ
(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत-प्राकृत विभागात कार्यरत आहेत.)
९९७००५७०६२